माणूस ‘मोठा’ असला की त्याचे कारनामेही मोठमोठेच असतात. विजय मल्ल्या हा उद्योगपतीही असाच ‘मोठा माणूस’ आहे. त्यामुळे त्याची यशोगाथा पुस्तकरूपाने येणे यात आश्चर्यकारक काहीच नाही. या यशोगाथेतून काय आणि कसे वागू नये याचे अनेक धडे शिकता येतात.
पोटात जाळ, डोळ्यांत स्वप्नं-नवकल्पनांची भूक आणि धमन्यांत धमक. राजकारण असो वा परिवर्तनाची चळवळ किंवा उद्योगकारण, काहीही करायचे ठरविलेत तर या गोष्टी हव्यातच. विजय विठ्ठल मल्ल्या नावाच्या मातब्बराकडे या गोष्टी आहेतच; पण त्याउप्परही अनेक वेगळ्या गोष्टींनी त्यांना नादावले आहे. बेगुमान मस्तीच्या कक्षेत मोडेल असा उपजत द्वाडपणा आणि चौकटीबाहेरचे सतत काही तरी करून दाखविण्याची फाजील खाजही त्यांना आहे. उद्योजकाकडे धाडस हे असावेच लागते, मल्ल्या यांच्याकडे त्यापल्याड जाऊन खुमखुमीही आहे. यातून जे काही भलेबुरे घडू शकते, किंबहुना घडले ते आज आपण बऱ्यापकी पाहातच आहोत. मल्ल्या यांचा हाच काहीसा ज्ञात आणि बराचसा प्रकाशात न आलेला यशापयशाच्या स्वारीचा रंजक पटल ज्येष्ठ पत्रकार के. गिरिप्रकाश यांनी त्यांच्या ‘द विजय मल्ल्या स्टोरी’ या पुस्तकातून शक्य तितक्या तटस्थतेने खुला केला आहे.
मल्ल्या यांच्या हाती त्यांचे वडील विठ्ठल मल्ल्या यांनी उभारलेला मद्य उद्योग अगदी कोवळ्या वयात अकस्मातपणे आला. वयाची तिशीही गाठली नव्हती तोच त्यांच्या वडिलांच्या मृत्युपश्चात बोलावल्या गेलेल्या (ऑक्टोबर १९८३) युनायटेड ब्रुअरीजच्या विशेष एजीएममध्ये अध्यक्षपदी त्यांचा राज्याभिषेक अतिशय नाटय़मयरीत्या झाला. तरुणाईला साजेसा तो अल्लड छचोरपणा विजय मल्ल्या यांनी आजवरच्या ४२ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत जसाचा तसा कायम ठेवल्याचे निरीक्षण गिरिप्रकाश यांनी अनेक किस्से सांगत नोंदविले आहे. खेळात प्रवीण व शाळेच्या क्लबसाठी अनेक बक्षिसे जिंकून देणारा म्हणून लोकप्रिय ठरलेला विद्यार्थी, विविधांगी व्यवसायस्वारस्य असलेला उद्योजक, छद्मी डील-मेकर, तालेवार सेलिब्रिटी, पापभीरू गणेश भक्त (हनुवटीवरील दाढीची शेंडी काढून त्याची राखण गणपतीच्या सोंडेसारखी डावीकडे कललेली मल्ल्या मुद्दामहून ठेवतात असे लेखकानी म्हटले आहे.) आणि कन्नडिगा राजकारणी वगैरे मल्ल्या यांच्या व्यक्तित्वाचे अनेक कंगोरे या ‘मल्ल्या स्टोरी’मधून ओघानेच पुढे येतात.
मल्ल्या यांची खेळी कधी कन्नडिगांच्या अस्मितेला चुचकारण्यापर्यंत जाते आणि ती म्हैसूरचे सम्राट टिपू सुलतान यांच्या २०० वष्रे जुन्या तलवारीच्या खरेदीसाठी सरसावते; स्वत: मद्याच्या व्यवसायात असतानाही मद्यपान निषिद्ध मानणाऱ्या महात्मा गांधींच्या चष्मा व अन्य चीजवस्तूंच्या लंडनमधून खरेदीसाठी ते मद्याचाच पसा वापरतात आणि या आपल्या ‘राष्ट्रप्रेमा’च्या गर्वाने फुशारक्या आणि जाहिरातही ते करतात. आपल्यासारख्या सामान्यांच्या नजरेने ज्यांना विलक्षण आणि नाटय़पूर्ण अशी विशेषणे लावली जातील अशा घटना-प्रसंगांची वर्णने या मल्ल्या-गाथेत इतकी आहेत, की तोच मल्ल्या यांचा जीवनपट भासावा.
मल्ल्या हे व्यक्तिमत्त्वच असे की, यश आणि संकटे दोहोंशी त्यांची कायम सारख्याच प्रकाराने साथसंगत राहिली आहे आणि बहुतांश प्रसंगी या अडचणींचे परिमार्जन करीत कमावलेले यश हे पुढे आणखी नव्या संकटाशी सामन्याची त्यांची तयारी ठरले आहे. आजच्या तरुणाईसाठी हे कदाचित प्रेरणा वगरे देणारेही ठरेल. मल्ल्या हे रसायनच इतके अजब असल्याचे लेखक म्हणूनच सांगतो. सिनेउद्योगाशी संलग्न नसतानाही माध्यमांमध्ये तृतीयपानी सेलिब्रिटी म्हणून मल्ल्या यांचा वावर आणि त्यांच्यावरील प्रकाशझोत कायम राहिला आहे. अर्थात अशी तृतीयपानी वलयांकितता म्हणजेच प्रतिष्ठा असेही नाही, याचा नमुना मल्ल्यांकडूनच पेश झाला आहे.
विठ्ठल मल्ल्या हे मितव्ययी, माणसे जपणारे, प अन् पचा हिशेब तपासून पाहणारे, कर्मचाऱ्यांच्या गोतावळ्यातून कुणाकडूनही कसल्याही आनंद-सोहळ्याचे निमंत्रण आले तर वेळात वेळ काढून जातीने हजेरी लावणारे, हसतखेळत सर्वाची ख्यालीखुशालीची विचारपूस करणारे. त्यांचे सुपुत्र विजय मल्ल्या मात्र नेमकी उलट वर्तणूक असलेले. गिरिप्रकाश यांनी रेखाटलेले व पूर्ण सत्य असलेले त्यांचे चित्र आहे. अहंकार नेहमीच वाईट असतोच, असे नाही. कारण मल्ल्या यांची मधल्या काळातील व्यावसायिक धडाडी ही अशीच स्वार्थपरायणतेतून आणि अहंभावाने घेतलेल्या तडक निर्णयातूनच साधण्यात आली आहे. मल्ल्या यांचे हवाई व्यवसायाकडील वळण असो अथवा शॉ वॉलेस अ‍ॅण्ड कंपनीचे अधिग्रहण असो, निर्णय असाच तडकाफडकी जाग्या झालेल्या अहंभावाचा परिणाम आहे. देशातील असा उद्योगधुरीण विरळाच ज्याला एकच कंपनी दोनदा संपादित करावी लागली असेल. मल्ल्या यांना शॉ वॉलेसचे प्रथम ५५ कोटी रुपयांना आणि पुढल्या वेळी १,५४५ कोटी रुपयांना संपादन करावे लागले; परंतु या सौद्यात हात पोळले तरी मल्ल्या व त्यांच्या यूबी समूहाने भरपूर कमावलेही. कारण खरे तर ‘किंगफिशर’ वगळता, यूबीच्या ताफ्यात सध्या असलेल्या रॉयल चॅलेंज (याच नावाने मल्ल्या यांचा आयपीएल संघही आहे), हेवर्ड्स, डायरेक्टर्स स्पेशल, ऑफिसर्स चॉइस, अ‍ॅण्टिक्विटी आणि अ‍ॅण्टिक्विटी ब्ल्यू या लोकप्रिय नाममुद्रा शॉ वॉलेसकडूनच वारसारूपाने आल्या आहेत. पण मल्ल्या यांनी आपले सामथ्र्य असलेले व्यवसाय क्षेत्र सोडून भलतीकडे हातपाय मारायला सुरुवात केली आणि तेथून न संपणाऱ्या संकटांची मालिका सुरू झाली. या सर्वात अर्थातच ‘किंगफिशर एअरलाइन्स’चा प्रधान वाटा आहे.

बँकांचे तब्बल ६,००० कोटींचे किंगफिशरने थकविलेले कर्ज हे मल्ल्या यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेलाही बट्टा लावणारे ठरले आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. धनको बँकांनी मल्ल्यांना ‘विलफुल डिफॉल्टर’ अर्थात पट्टीचा थकबाकीदार ठरविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ज्या कारणासाठी बँकांकडून कर्जे घेतली, तो पैसा अन्यत्रच वापरण्यात आलाच, शिवाय किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांचे विमा, कर, पीएफचे हप्तेही संबंधित विभागांमध्ये जमा केले गेले नाहीत, त्यांचे कैक महिने थकविलेले वेतन, विमानतळ प्राधिकरण, तेल कंपन्यांची प्रचंड थकबाकी वगैरे सर्व कृष्णकृत्ये पाहता मल्ल्या यांची केव्हाच तुरुंगात रवानगी व्हायला हवी होती. तरी त्यांचा अर्निबध संचार व दौलतजादा सुरूच आहे. माणूस ‘मोठा’ आहे कारण त्याचा मित्र-परिवार बँकांचे प्रमुख, धोरणकर्ते राजकारणी, सनदी अधिकारी असा अथांग पसरला आहे. मोठय़ा माणसाच्याच गाथा अशा पुस्तकरूपाने येतच असतात.
द विजय मल्ल्या स्टोरी : के. गिरीप्रकाश
पोर्टफोलिओ, नवी दिल्ली,
पाने : २०५, किंमत : २९९ रुपये.