राजीव गांधी यांची मुलगी आणि इंदिरा गांधी यांची नात म्हणून प्रियंका वढरा यांनी राजकारणात येणे ही खरे तर स्वाभाविक गोष्ट ठरली असती. वाराणसीमधून भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यात त्यांना रस आहे किंवा नाही, याबद्दलच्या बातम्या रसभरीतपणे देणाऱ्यांना गांधी घराण्यालाही भारतीय मानसिकतेने कसे घेरले आहे, हे     लक्षात यायला हवे होते. भाजपने मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी नक्की केले, तरी राहुल गांधी यांचे नाव जाहीर का होत नाही, याचीच चिंता असणाऱ्यांना प्रियंकाच्या राजकारण प्रवेशामध्ये कमालीचा रस आहे. प्रियंका यांचे इंदिरा गांधींसारखे दिसणे हाच जर त्यांचा सर्वात मोठा गुण असेल, तर तो भारतीय राजकारणात किती टिकेल, याचा विचार करण्याचीही गरज कुणाला वाटत नाही. यंदाच्या निवडणुकीत राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जन्माला आलेली पिढी पहिल्यांदा मतदान करणार आहे. त्या पिढीला   राजीव यांची आई कशा प्रकारे माहीत असेल, हाही प्रश्न कुणाला पडत नाही. प्रियंका यांना राजकारणात रस असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी तत्परतेने असे काही नसल्याचा खुलासा करून टाकला. वाराणसीतून त्यांना निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाचाच विरोध होता, या आरोपाला उत्तर देताना माझ्या कुटुंबातील    कुणीही मला आजवर रोखलेले नाही, असे सांगून या वादावर पडदा पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आणखी नवे प्रश्न निर्माण करणारा आहे. सोनिया गांधी यांना स्वत:ला राजकारणात येऊनही पद स्वीकारता आले नाही. (किंवा त्यांनी ते नाकारले!) आपल्या दोन मुलांपैकी कुणाला राजकारणात आणायचे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता. त्यांनी निर्णय मुलाच्या बाजूने दिला. हीच ती भारतीय मानसिकता. मुलीपेक्षा मुलाने कर्तृत्ववान व्हावे, यासाठी भारतीय समाज     नेहमी आग्रही असतो. मुलगा हा वंशाचा दिवा या कल्पनेला अजून पूर्णविराम मिळत नसल्याचाच अनुभव येतो. तरीही राहुल गांधी यांच्या राजकारण-प्रवेशाच्या आधीपासूनच भारतीय राजकारणात प्रियंका यांच्यासाठी एक जागा कल्पनेत निश्चित करण्यात आली होती. घराण्यांचे अनाकलनीय महत्त्व असलेल्या भारतीय मानसिकतेत राजीव यांचा वारसदार समाजानेच ठरवला होता. पण सोनिया गांधी यांनी मात्र मुलाला पुढे आणले आणि त्याच्याकडेच आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेच्या चाव्या सुपूर्द केल्या. प्रियंका वढरा यांच्या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला, असे जे सांगितले जाते, त्याचाही अर्थ उलगडून पाहायला हवा. जर सोनिया यांनी        मनात आणले असते, तर काँग्रेसमधील कुणाची त्याला विरोध करण्याची हिंमत होती? त्यामुळे विरोध पक्षाचा नसून घरातूनच असला पाहिजे, असा याचा       अर्थ होऊ शकतो. पक्षाची सगळ्या चौकांत दाणादाण उडत असल्याचे दिसत असताना प्रियंका यांनी राजकारणात उडी मारणे हे कदाचित स्वाभाविक ठरले असते. पण त्यांच्या येण्याने राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताच अधिक   गृहीत धरली गेली. दरम्यानच्या काळात प्रियंकाचे पती रॉबर्ट यांचे जे काही उद्योग प्रकाशात आले, त्याने त्या अडचणीत येणे स्वाभाविक होते. त्यातच, आजघडीला राजकारणातील आरोपांची हीन व्यक्तिगत पातळी पाहता, कोणत्याही ठोस कार्यक्रमाविना केवळ घराण्यासाठी राजकारणात उतरणे प्रियंका यांना जडच गेले असते. गांधी घराणे हेच या देशाचे तारणहार आहे, अशी हूल उठवण्यात काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला, कारण असे केल्याने पक्षही टिकतो आणि त्यातील अनेकांची सद्दीही. अशा भारतीय मानसिकतेचा उपयोग सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे केला. म्हणूनच राहुल की प्रियंका या वादात देशाने पडण्याचे काहीच कारण नाही.