तीन नव्या जलवाहिन्या टाकण्याचे आश्वासन
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गोळवली, पिसवली आणि या भागांतील देशमुख होम्स गृहसंकुलाला गेल्या काही महिन्यांपासून मुबलक पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा रास्ता रोको केले, तसेच महापालिका कार्यालयांवर मोर्चे काढले. गोळवली प्रभागाचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी प्रभागाला पुरेसा पाणीपुरवठा एमआयडीसीने करावा म्हणून अनेक वेळा सर्वसाधारण सभेत विषय उपस्थित केले. तरीही कल्याण डोंबिवली महापालिका तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ दाद देत नसल्याने अखेर त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेण्यात आली असून एमआयडीसीने गेल्या दोन दिवसांपासून गोळवली, पिसवली, देशमुख होम्स गृहसंकुलाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
या भागाला तीन नवीन जलवाहिन्या देण्याचे आश्वासन दिले आहे. गोळवली, पिसवली प्रभाग महापालिका हद्दीत येतो. या प्रभागांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी कपातीमुळे गोळवली, पिसवली भागात पाणी येणे बंद झाले होते. रहिवाशांना परिसरातील डबकी, जुनाट कुपनलिकांचा आधार घेऊन पाणी भरावे लागत होते. या भागातील देशमुख होम्स या गृहसंकुलाला मागील काही महिने नळाद्वारे पाणी पुरवठा होणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक नोकरदार कार्यालयास दांडी मारून पाण्यासाठी भटकंती करीत होते.
टँकरद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु टँकरसाठी नोंदणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पाणी येत असल्याने या भागातील रहिवासी मेटाकुटीला आले होते. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत दररोज दोनशे ते तीनशे रहिवासी पाण्यासाठी मोर्चा काढून नगरसेवक पाटील यांना जाब विचारत होते. या सततच्या तक्रारींमुळे या भागातील लोकप्रतिनिधी हैराण झाले होते. महापालिका, एमआयडीसी आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर पाटील यांनी रहिवाशांच्या पुढाकाराने पाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
आंदोलन झाले तर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडेल. या भीतीने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाडगे, नगरसेवक जालिंदर पाटील, नगरसेविका सुशीला खंडागळे यांची एमआयडीसी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत जगताप यांनी गोळवली, पिसवली प्रभागाला पुरेशा
दाबाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

गोळवली, पिसवली प्रभागांत पालिका व नगरसेवक निधीतून १२ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. दोन कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. एमआयडीसीकडून मुबलक पाणीपुरवठा सुरू झाल्याने येणारे पाणी या टाक्यांमध्ये साठवण करून त्याचा वापर करण्यात येईल. वाढीव नळ जोडण्या कार्यरत झाल्यानंतर या भागाचा पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघेल.
– रमाकांत पाटील, नगरसेवक.