रोजच्या धकाधकीच्या जीवनात घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा लोकलचे धक्के खात खात आठवडाभर प्रवास केल्यानंतर कातावलेले मन आणि थकलेल्या शरिराला विश्रांतीसोबतच नव्या उभारीचीही गरज असते. यासाठी कुणी सहलीवर निघते, तर कुणी निसर्गाच्या सान्निध्यात धाव घेते. मात्र, शरीरात नवा जोम निर्माण करण्यासाठी मुंबई, ठाणे परिसरात राहणाऱ्यांना आता साहसी खेळांचा पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे. पॅराग्लायडिंग, स्कूबाडायव्हिंग, घोडेस्वारी, ट्रेकिंग अशा साहसी खेळांतून आठवडय़ाभराची मरगळ घालवणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे.
कल्याणच्या पलीकडील ग्रामीण भागात साहसी खेळांचे ‘ठाणे’ निर्माण झाले असून सुमारे २५ ते ३० संस्था दर आठवडय़ाला वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. नवीन जीवनशैलीतील साहसी खेळांची गरज ओळखून कल्याणच्या अजित कारभारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ठाण्यातील ग्रामीण भागामधील चोरेगाव-पोई दहागांव, खडवली, बदलापूरपासून कर्जतपर्यंत आणि पनवेल भागामध्ये संस्थेच्या वतीने विविध शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या निरीक्षणाखाली हे उपक्रम राबवले जातात, अशी माहिती अजित कारभारी यांनी दिली.

साहसी खेळांचे ‘ठाणे’
* पॅराग्लायडिंग, पॅरासिलिंग, माऊंटनीअरिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग, घोडस्वारी, तिरंदाजी, पाणबुडी (स्कूबाडायव्हिंग) कायाकिंग, शेफर्ड, कनोइंग अशा क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण शिबीर ठाण्यातील ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात येत आहे.
* खडवली येथील महाराष्ट्र मिल्ट्री स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
* कल्याण शहरातील काही शाळांमध्येसुद्धा संस्थेच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते.

व्यावसायिक संस्थांचीही रेलचेल
साहसी खेळांना मिळणारी पसंती पाहून अनेक व्यावसायिक संस्थाही या क्षेत्रात हातपाय पसरू लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात तीनशे रुपयांपासून ते पुढे ४० ते ५० हजारांपर्यंत शुल्क आकारून व्यावसायिक संस्था पर्यटकांना साहसी खेळाचा आनंद देतात. ठाण्यातील येऊर, बदलापूर, भिवपुरी, कर्जत, खडवली, वाशिंदसारख्या भागात अशा २५ ते ३० संस्था कार्यरत आहेत. या शिवाय हौशी गिर्यारोहकांच्या शंभरहून अधिक संस्था कार्यरत आहेत, अशी माहिती ‘अ‍ॅडव्हेंचर इंडिया’या संस्थेचे संचालक मंगेश कोयंडे यांनी दिली.