जैवविविधता अनुभवण्याची पर्यटकांना संधी

ठाणे, नवी मुंबईतील खाडीकिनाराच्या जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी राज्य सरकारने आखलेला बोटसफरीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. शासनाच्या कांदळवन विभागातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या खाडीसफरीचा आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे. ऐरोली परिसरातील दिवा जेटी येथून ही बोटसफर सुरू होणार असून यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असणार आहे, अशी माहिती राज्याच्या कांदळवन विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

नवी मुंबई, ठाणेकरांसाठी ही बोटसफर हाकेच्या अंतरावर असल्याने ठाणे खाडीकिनाराच्या जैवविविधतेचा अनुभव शासनाच्या मदतीने पर्यटकांना घेता येणार आहे. ठाणे खाडीकिनारी शासनातर्फेच आयोजित केल्या जाणाऱ्या या अधिकृत बोटराइडमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे. खाडीकिनारी पक्षी निरीक्षणासाठी पर्यटक, पक्षी अभ्यासकांचा ओढा वाढत असताना या ठिकाणी खासगी बोटचालक मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसल्याने शासनाच्या कांदळवन विभागातर्फे स्थानिक कोळ्यांना एकत्रित करून शासकीय खाडीविहाराचा प्रकल्प आखला आहे. हा उपक्रम येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. ‘पार्टिसिपेटरी इको टुरिझम प्लॅन रुल्स अ‍ॅण्ड रेग्युलेशन’ या योजनेच्या अंतर्गत परिसरातील स्थानिक कोळ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यानिमित्ताने कोळ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे या प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी भास्कर पॉल यांनी सांगितले.

खाडीसफर अशी असेल

* पर्यटकांना खाडीकिनाराच्या जैवविविधतेविषयी कोणती माहिती द्यावी याविषयी स्थानिक कोळ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यामार्फत ही सुविधा सुरू करण्यात येईल.

* कांदळवन विभागाच्या ‘मॅन्ग्रोव्ह सेल फाऊंडेशन’तर्फे बोटराइडसाठी जाणाऱ्या पर्यटकांसोबत एका गाइडचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

* या बोटराइडसाठी पर्यटकांनी संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. सध्या संकेतस्थळ तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच बोटराइड पूर्वनोंदणीसाठी संकेतस्थळ पर्यटकांना उपलब्ध होईल.

* हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार बोटराइडचे वेळापत्रक संकेतस्थळावर सांगण्यात येणार आहे.

* पाण्याची पातळी पाहून त्यानुसार दिवसातून एक वेळ बोटीने खाडीसफारी पर्यटकांना अनुभवता येणार आहे. वेळापत्रकानुसार पर्यटकांना नोंदणी करून दिवा जेटी येथून बोटराइडचा आनंद घेता येणार आहे.

खाडीकिनारीचे कांदळवन, जैवविविधता, विविध जातींचे पक्षी यांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती देणार असल्याने शासनातर्फे २५० रुपये एवढे अधिकृत तिकीट आकारण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात येत आहे. स्थानिक कोळ्यांनाच यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील पर्यटकांसाठी ही बोटराइड उपलब्ध होत आहे.

– एन. वासुदेवन – मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग