मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरच्या गृहप्रकल्पासाठी ठाण्यातील कोलशेत परिसरात महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेल्या वृक्ष छाटणीच्या परवानगीवरून सत्ताधारी शिवसेनेत विसंवादाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेच्या ठाण्यातील एका ‘प्रतापी’ आमदाराने या वृक्ष छाटणीस जाहीर विरोध करूनही सत्ताधारी पक्षातील एकाही पदाधिकाऱ्याने या प्रक्रियेविरोधात साधा ‘ब्र’देखील उच्चारायचा नाही, असा जणू पण केला असून, या आमदाराच्या बिल्डरविरोधी प्रतापांना एकाकी पाडण्याच्या व्यूहरचनेचा हा एक भाग असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात रंगली आहे.
आमदार नाराज.. शिवसेनेचा कानाडोळा
मुंबईस्थित बडय़ा बिल्डरच्या गृहप्रकल्पासाठी सुमारे ३०० वृक्षांची तोड करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे आणण्यात आला. ठाण्यातील एका प्रतापी आमदाराचे आणि या बडय़ा विकासकाचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. घोडबंदर मार्गावरील ओवळा येथील या बिल्डरच्या एका प्रकल्पाला या आमदाराने यापूर्वी काही कारणास्तव जाहीर विरोध केला होता. भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेला हा विकासक संबंधित आमदाराच्या ‘प्रतापा’ंना फार दाद देत नसल्याने हा विरोध आणखी वाढल्याची आता चर्चा आहे. नेमके हेच हेरून वृक्ष प्राधिकरण समितीपुढे आलेल्या या प्रस्तावाला आमदाराने जाहीर विरोध करूनही शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या उपस्थितीत हा प्रस्ताव मंजूर केला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. असे असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या विरोधाला केराची टोपली दाखवत बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘.. तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करा!’
वृक्ष छाटणीची परवानगी यापूर्वीही अनेक बिल्डरांना देण्यात आली आहे. तशाच स्वरूपाची ही परवानगी आहे, असा दावा शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिली. याविरोधात कुणाचे काही म्हणणे असेल तर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करावी. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही कार्यवाही करू, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

*ठाण्यातील कोलशेत परिसरात क्लॅरिअण्ट कंपनीचा एक विस्तीर्ण भूखंड मुंबईतील बडय़ा बिल्डरने विकत घेतला असून या ठिकाणी टाऊनशिपची उभारणी केली जाणार आहे.
*यासंबंधीचे सविस्तर प्रस्ताव शहर विकास विभागाकडे सादर करण्यात आले असून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
*या गृहप्रकल्पाची उभारणी करताना विस्तीर्ण अशा भूखंडावरील वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर छाटणी केली जाणार आहे.
*पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतरही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ठाणे महापालिका अशाप्रकारे वृक्ष छाटणीला ठरावीक दर आकारून परवानगी देत असते.
*अशी परवानगी देताना एका वृक्षाच्या छाटणीमागे पाच रोपांची लागवड करणे बंधनकारक करण्यात येते. तसेच प्रत्येक वृक्षामागे २० हजारांपेक्षा अधिक दर महापालिकेस भरावा लागतो.
*गृहप्रकल्पांची उभारणी करताना नियमितपणे अशा स्वरूपाच्या वृक्षतोडीला महापालिका परवानगी देत असते.