प्रकल्प कक्षात जाऊन कामांचा आढावा; मात्र चर्चेला उधाण

ठाणे महापालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे महापालिका मुख्यालयात हजेरी लावली. ठाण्यात एका खासगी कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री थेट महापालिका मुख्यालयात पोहचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दौऱ्याविषयी राजकीय नेत्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही अनभिज्ञ होते. त्यामुळे पोलिसांसह सर्वाचीच एकच धावपळ उडाली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुख्यालयात हजेरी लावून कामाचा आढावा घेतल्याने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ठाणे येथील पाचपाखाडी भागातील लिनन या कपडय़ाच्या शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सायंकाळी ठाण्यात आले होते. या शोरूमचे उद्घाटन उरकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले. त्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यांना आग्रह केल्याची चर्चा आहे. असे असले तरी पालिका भेटीमागे मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी तर नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. दुकानापासून दोन मिनिटांच्या अंतरावर महापालिका मुख्यालय आहे. मुख्यमंत्र्यांच्या अचानक पालिका दौऱ्यामुळे पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी महापौर संजय मोरे हे शिवसेनेचे आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे महापौर की आयुक्त या दोघांपैकी कुणाच्या कार्यालयाला मुख्यमंत्री भेट देतात, याबाबत सर्वानाच उत्सुकता होती.

मात्र, या दोन्ही कार्यालयांमध्ये जाण्याचे टाळत त्यांनी महापालिकेच्या प्रकल्प कक्षाला भेट दिली. ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविले जात असून त्यामध्ये पाणी, घनकचरा तसेच अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प नेमके कशाप्रकारे राबविले जात असून त्याच्या कामावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जात आहे, याचा आढावा त्यांनी आयुक्त जयस्वाल यांच्याकडून घेतला. सुमारे दहा मिनिटे ते कक्षातील प्रकल्पांचा आढाव घेत होते. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार, महापौर संजय मोरे आणि पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका मुख्यालयात भेट दिली असून महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पालिकेत आले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीमध्ये विविध कारणांमुळे दुरावा निर्माण होऊ लागला असताना ही भेट नेमकी कशासाठी, अशी चर्चा सुरू आहे.