वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महापालिकेने इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याच्या दृष्‍टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत सर्वेक्षण लवकरच सुरु करण्‍यात येणार आहे. या नव्या प्रकल्पाला गती देण्यासाठी मंगळवारी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची अर्बन रिसर्च सेंटरमध्ये आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींसोबत  बैठक पार पडली. या बैठकीत  प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्‍याबाबत निर्णय घेण्यात आला. अशा पध्‍दतीचा प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.

आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीच्‍या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्याच येणार असून पेट्रोल पंपाच्‍या धर्तीवर शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. ही चार्जिंग स्टेशन कुठे उभारता येतील याबाबत लवकरच सर्वेक्षण सुरु करण्‍यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीवजयस्वाल यांनी बेठकीनंतर  दिली. अर्बन रिसर्च सेंटर येथे झालेल्‍या बैठकीत महापालिकेचे सल्‍लागार शरद पुस्तके, आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीचे प्रतिनिधी सुवर्नील मुजुमदार, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, डेलॉईट या कंपनीचे पार्टनर प्रानावत, वरीष्ठ प्रबंधक अमिताभ शहा, सुमित मिश्रा, मुख्‍य संशोधन अधिकारी राणे आदी उपस्थित होते.