दालनात एम. एफ. पीठावाला यांची दोन व्यक्तिचित्रे; जाणकारांकडून संवर्धन करण्याची गरज

गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने अडगळीत पडलेल्या टाऊन हॉलचे नूतनीकरण करून ठाणेकरांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक चांगले सांस्कृतिक केंद्र आणि कलादालन उपलब्ध करून दिले. याच कलादालनात जागतिक कलावर्तुळात दुर्लभ मानली जाणारी तीन चित्रे असून त्यांचीही डागडुजी करावी लागणार आहे. या दालनातील तीन व्यक्तिचित्रांपैकी दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर चित्रकार एम. एफ. पीठावाला यांची असून सांस्कृतिक ठाण्यातील ती अमूल्य अशी संपत्ती आहे.

टाऊन हॉलप्रमाणेच या दुर्लभ कलाकृतीही आतापर्यंत दुर्लक्षित अवस्थेत होत्या. टाऊन हॉलचे नूतनीकरण झाल्यानंतर येथे विविध कला प्रदर्शनांच्या निमित्ताने रसिकांचा राबता वाढला, तेव्हा काही कलावंतांचे या चित्रांकडे लक्ष गेले. ब्रिटिश राजवटीत ठाणे शहरातील महसूल विभागात पारशी समाजातील व्यक्ती मोठय़ा प्रमाणात होत्या. त्यापैकी एक असणाऱ्या खानबहाद्दूर बापूजी दिवेचा यांनी शहरवासीयांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाऊन हॉल बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र दुर्दैवाने बांधकाम सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. मात्र टाऊन हॉल उभारण्याचे मुलाचे स्वप्न वडील कावसजी दिवेचा यांनी पूर्ण केले. या दगडी इमारतीच्या बांधकामासाठी त्या काळात २३ हजार सात रुपये खर्च झाले. दिवेचा यांनी सार्वजनिक वापरासाठी हे सभागृह नंतर शासनाच्या ताब्यात दिले. त्या काळात खासगीकरणातून ठाण्यात अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. टाऊन हॉल त्यापैकी एक आहे. या इमारतीत आपल्या मुलाच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून त्यांनी एक तैलचित्र लावले. जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. पीठावाला यांच्याकडून त्यांनी ते चित्र काढून घेतले.

तीन व्यक्तिचित्रे

सभागृहात सध्या एकूण तीन व्यक्तिचित्रे आहेत. त्यातील दोन बापूजी आणि कावसजी दिवेचा या बापलेकांची आहेत. तिसऱ्या चित्रात दिसणारा लहान मुलगा कावसजींचा नातू इराच दिवेचा आहे. या तीन चित्रांसाठी त्या काळात दिवेचा कुटुंबीयांनी किती पैसे मोजले याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, पण सध्या कलावर्तुळात ही चित्रे अमूल्य आहेत. त्यामुळे टाऊन हॉलप्रमाणेच जिल्हा प्रशासनाने जाणकार व्यक्तींकडून या चित्रांचेही संवर्धन करावे, अशी अपेक्षा जे. जे. कला महाविद्यालयातील प्राध्यापक जॉन डग्लस यांनी व्यक्त केली.

गेल्या शतकातील थोर चित्रकार एम. एफ. पीठावाला यांची व्यक्तिचित्रे ठाण्यातील अमूल्य कलाकृती आहेत. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रकलेचा ठसा उमटविणारे ते पहिले कलावंत होते. १९११ मध्ये इंग्लंडमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. टाऊन हॉलमध्ये त्यांनी कॅनव्हासवर तैलरंगात रेखाटलेली व्यक्तिचित्रे आहेत. आता काळानुरूप त्याचे पोपडे उडू लागले आहेत. काचेच्या फ्रेममुळे ही चित्रे सुरक्षित आहेत. मात्र या चित्रांची लवकरात लवकर जाणकारांकडून डागडुजी करावी लागणार आहे.

– विजयराज बोधनकर, चित्रकार

आधुनिक ठाण्याच्या जडणघडणीत पारशी समाजाचे फार मोठे योगदान आहे. त्यातूनच स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजोपयोगी प्रकल्प शहरात राबविण्यात आले. टेंभीनाका परिसरातील बी.जे. हायस्कूल, सेंट्रल मैदान, वाडिया रुग्णालय आदींचा त्यात समावेश आहे. टाऊन हॉल त्यापैकी एक आहे. त्यामुळे दिवेचा कुटुंबीयांची चित्रे ऐतिहासिकदृष्टय़ाही महत्त्वाची आहेत.

– सदाशिव टेटविलकर, इतिहास लेखकु