जागतिक पातळीवर प्रथमच भारतीयांचे नाणे विजयी

जपान सरकारच्या टांकसाळ आयोजित आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन २०१६ या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी झालेल्या मुंबई टाकसाळमधील प्रसाद तळेकर आणि आतिश मंचेकर या दोन मराठी कलावंत्यांनी उज्ज्वल यश संपादन करीत जागतिक स्तरावर आपल्या कलेची मोहर उमटवली आहे. जगभरातील २२ देशांतून सहभागी झालेल्या ९१ कलाकृतीत अंबरनाथच्या प्रसाद तळेकर यांनी अंतिम फेरीत ‘खुजाराहो द टेम्पल ऑफ लव्ह’ या विषयावर एक्सलन्ट वर्कमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे या प्रसाद तळेकर यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.

नुकताच जपान येथे आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन २०१६ या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथमच भारतीय तरुणांनी यश संपादन केले आहे. मुंबई टांकसाळमधील प्रसाद तळेकर आणि आतिश मंचेकर या दोन मराठी तरुणांनी भारतीय संस्कृतीवर आधारित नाण्यांचे चित्र साकारले. यात प्रसाद तळेकर याने ‘खुजाराहो दि टेम्पल ऑफलव्ह’ या विषयावर नाणे साकारले तर आतिश मंचेकर याने ‘इंडियन क्लासिकल डान्स’ या विषयावर आधारित नाणे साकारले होते. या नाण्यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचा गौरव झाला आहे. या दोन्ही कलांवतांची नाणी टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणी परिषदेत प्रदर्शित केली जाणार आहेत. या वेळी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात तळेकर यांना गौरवले जाणार आहे. या जागतिक नाणे परिषदेत जगभरातून दहापेक्षा अधिक देश आपली नाणी प्रदर्शित करणार आहेत. प्रसाद तळेकर हे मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागाचे विद्यार्थी असून मंचेकर हे रहेजा स्कूल ऑफ आर्टचे विदय़ार्थी आहेत. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पहिल्यांदाच भारतीय आणि त्यातही मराठी तरुणांनी ही कामगिरी केल्याने मराठीच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.