मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप पावसाने हवा तेवढा जोर पकडलेला नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम असला तरी किंचित गारवाही जाणवू लागला आहे. अशा काहीशा कुंद हवेत कोल्ड कॉफी मिळाली तर तो दुग्धशर्करा योग ठरतो. विशेषत: मित्र-मैत्रिणींबरोबर गार आणि चॉकलेट फ्लेव्हर कॉफी पिताना जुन्या गप्पा-गोष्टीची मैफल रंगली नाही, तरच नवल. असेच निवांत कॉफीपान करण्याचे ठिकाण म्हणजे डोंबिवलीतील मधुर क्रीम कॅफे. या दुकानात विविध प्रकारची कॉफी, मस्तानी, क्रीमशेक, रॉयल फालुदा आदी पदार्थ विविध स्वादांमध्ये उपलब्ध आहेत.
या थंड खाऊ प्रदेशातील ‘मस्तानी’ हा मूळ पुण्यातला प्रकार आता सर्वत्र मिळू लागला आहे. डोंबिवलीतील ‘मधुर क्रीम कॅफे’त तो उपलब्ध आहे. अनेक डोंबिवलीकर या मस्तानीच्या प्रेमात आहेत. ‘मस्तानी’मध्ये रबडी आणि फ्लेव्हरनुसार आइसक्रीम घातले जाते. त्यावर फ्रुटची सजावट करून ती खवय्यांना पेश केली जाते. मस्तानी खाणाऱ्या बहुतेक खवैयांची ‘के दिल अभी भरा नही’ अशी अवस्था होऊन जाते. त्यामुळे मग अनेकजण या अवीट चवीला वनमोअरची दाद देतात. या कॅफेमध्ये दिवसभरात ३० ते ४० मस्तानीचे कप आरामात संपतात. नियमित या कॅफेमध्ये हजेरी लावणारे आपापल्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस येथे साजरे करतात. तेव्हा अर्थातच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ‘मस्तानी’ हजर असते. स्वस्तात छान जाडसर मस्तानी खाल्ल्याने पोटही भरते. जी लहान मुले दूध पित नाहीत, त्यांना पालक मुद्दामहून मस्तानी, फालुदा खावयास देतात. क्रीमशेकमध्ये आंबा, स्ट्रॉबेरी तसेच ज्या फळांचा हंगाम सुरू असेल, त्या फळांचा गर काढून त्यात क्रीम आदी जिन्नस मिक्सरमध्ये एकत्र करून ते सजवून दिले जातात. यामध्ये चॉकलेट क्रीम शेकला अधिक मागणी असल्याचे दुकानाचे मालक अनिल गुरव यांनी सांगितले. त्यानंतर ब्लॅककरंट क्रीम शेकलाही अधिक पसंती असल्याचे ते म्हणाले. येथील सर्व पदार्थ शुद्ध दुधापासून बनवले जातात. दूध खास पुण्यातील घरगुती गोठय़ातून मागवले जाते. त्यामुळे त्यात भेसळ असण्याची किंचितशीही शक्यता नाही. दुधामधील भेसळीच्या भीतीने अनेकजण आवडत असूनही दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. अशांनी या कॅफेमध्ये डोळे झाकून या पदार्थाची चव चाखायला हरकत नाही, असे ‘मधुर क्रीम’ व्यवस्थापकांचे मत आहे.
विशेष म्हणजे येथील व्हाइट कोल्ड कॉफी खवय्ये आवर्जून पितात. त्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये व्हाइट कॉफी, क्रीम तसेच चॉकलेट क्रश आदी जिन्नस अधिक प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे त्याची चव अधिकच लाजवाब असते. अशी कोल्ड कॉफी प्यायल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच कॉफीची आठवण खवैयांना होत नाही. यामध्ये थिक कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ क्रश, व्हाइट कॉफी विथ क्रश, चॉकलेट शेक विथ कॉफी, चॉकलेट शेक विथ कॉफी आणि क्रश, कोल्ड कॉफी विथ आइसक्रीम आदी पदार्थाची अधिक चलती असल्याचेही ते म्हणाले. सकाळी दूध आणणे, त्यापासून क्रीम बनवणे त्यानंतर ते क्रीम गार करून ठेवणे आदी प्रक्रिया करावी लागते. क्रीमही दुधामुळे जाडसर होते. कॉफी मिक्सरमधून काढली जाते, त्यामुळे फेसाळ कॉफीची न्यारी गंमत चाखायला मिळते. फालुद्यामध्येही रबडी दूध वापरले जात असल्यामुळे तो फालुदा अधिक चविष्ट लागतो. पूर्वी घरी रबडी तयार केली जात असे. मात्र रबडी तयार करण्यात बराच वेळ जातो. धकाधकीच्या जीवनात असे पदार्थ फार कमी घरात तयार केले जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकही ‘रबडी घालून फालुदा द्या’ असे आवर्जून सागंतात. ज्यांना रबडी आवडत नाही, त्यांना साधे दूध घालूनही फालुदा दिला जातो.
मधुर क्रीमकडे मिळणारी रबडी ही खास पुणेरी स्पेशल रबडी आहे. त्यामुळे ही रबडी घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांमध्ये वितरित केली जाते. तसेच ही रबडी उपवासालाही चालते. त्यामध्ये कोणतीही पावडर टाकलेली नसून १०० लिटर दुधापासून ५० किलो रबडी तयार केली जाते. रबडी जिलेबीसोबतही आवर्जून खाल्ली जाते. एक किलो रबडी ३०० रुपयांना मिळते. त्यात स्वादासाठी वेलची पावडर टाकली जाते. येथील सर्वच पदार्थ ५० ते १०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. दुकानाला एक वर्ष पूर्ण झाले असून एका वर्षांत पदार्थाच्या चवीमुळे या दुकानाचे नाव डोंबिवलीसह मुंबईच्या उपनरातही प्रसिद्ध झाले आहे.
कुठे- मधुर क्रीम कॅफे, रजनी को. ऑप. हौ. सासायटी, मधुबन-टिळक टॉकीजजवळ, उर्सेकर वाडी, डोंबिवली (पूर्व)
कधी – सोमवार ते शनिवारोदुपारी १ ते रात्री १०, रविवारी-सायंकाळी ५ ते १०