शिळफाटा, घोडबंदर मार्गावर पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा

भाऊबीजनिमित्त रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने शनिवारी ठाण्यात शिळफाटा, घोडबंदर तसेच ठाण्यातील महत्त्वाच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घोडबंदर मार्गावर सुमारे पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल झाले.

दिवाळीत भाऊबीजेपाठोपाठ आलेल्या सलग सुटय़ांमुळे अनेकांनी सहलीचे आणि नातलगांच्या भेटीचे बेत आखले होते. त्यामुळे दुपारी १ वाजल्यापासूनच शहरातील विविध मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. अनेक वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. तसेच अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी भाऊबीजनिमित्त रजेवर असल्याने वाहतूक नियोजनासाठीही पुरेसे बळ नसल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला, असे ठाणे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यामुळे घोडबंदर मार्गावर ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने सुमारे पाच तास खोळंबली होती. कल्याण-शिळफाटा मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. कल्याणहून मुंब्य्राच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. तर मुंब्रा रोडवरील वाहतूकही मंदगतीने सुरू होती.

मध्य रेल्वेची रखडपट्टी :
बदलापूर : वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकादरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरील रूळाला शनिवारी तडा गेला. यामुळे दोन लोकल बदलापूर स्थानकात रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने भाऊबिजेसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. तासाभराने वाहतूक रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. मात्र, रेल्वेची रखडपट्टीची सुरूच होती.