खाडीमध्ये रूपांतर झालेल्या उल्हास नदीमुळे ठाणे शहराचे सौंदर्य अधिक खुलते. घोडबंदर रोड परिसरातून झोकदार वळण घेणाऱ्या या खाडीमुळे येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे निर्माण झाली. नागला बंदर हे त्यापैकीच एक. ठाणे शहर जिथे संपते, त्या गायमुख परिसरात नागला बंदर आहे. डोंगरांच्या मधून झळाळत वाहणाऱ्या खाडीचे दृश्य येथे विलोभनीय दिसते.

खरे तर सध्या नागला बंदर येथे रेती व्यवसाय चालतो, त्यामुळे या परिसराला अवकळा आली आहे. पण संध्याकाळच्या निवांत क्षणी या बंदराच्या ठिकाणी फिरल्यास मनास प्रसन्न वाटते. हिरवाईने नटलेला डोंगर, संथ वाहणारी खाडी, बंदराला लागलेल्या बोटी.. सारे काही विलोभनीय. त्यामुळे येथे काही काळ रेंगाळावेसे वाटतेच. बंदराजवळ खाऊच्या गाडय़ाही लागतात. खाडीतून वाहणारा थंडगार वारा झेलत येथील खाऊगाडय़ांवरील पदार्थावर ताव मारायचा आणि रसना तृप्त करायची.. हा प्रकार कुणाला आवडणार नाही. ठाण्याहून मीरा-भाईंदर, बोरिवलीला जाणारे अनेक प्रवासी घटकाभर येथे थांबतात आणि नागला बंदरच्या रमणीय निसर्गसौंदर्याचा आनंद घेतात.
नागला बंदर गावात आल्यास खाडीच्याच बाजूला एका उंच टेकडीवर किल्ल्याचे अवशेष आहेत. प्राचीन काळी कल्याण बंदरातून या खाडीमार्गे अरबी समुद्रातून मालवाहतूक केली जात असे. पोर्तुगीजांनी या जलमार्गाचे महत्त्व ओळखून घोडबंदर, नागला बंदर आणि गायमुख हे तीन लहान किल्ले बांधले होते. नागला बंदर किल्ला म्हणून आजूबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्यासाठी उभारलेला कोट होता. मात्र काळाच्या ओघात आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा किल्ला नामशेष झाला आहे. या टेकडीवर नागला बंदर किल्ल्याचे काही अवशेष काळाशी झुंजत आहेत. येथे दगडाच्या खाणी आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या या अवशेषाची पार रया गेली आहे. झुडुपांमुळे हे अवशेषही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या टेकडीवरून मात्र नागला बंदर आणि खाडीचे दृश्य अतिशय निसर्गरम्य वाटते. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्याचे अवशेष पाहून पाच ते दहा मिनिटे लागतात. या परिसरात टेकडीवर पोर्तुगीजकालीन एक चर्चही आहे. तेथून नागला बंदर आणि खाडीचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.
नागला बंदर जरी निसर्गसौंदर्याचा नमुना असला तरी स्थानिकांमुळे आणि बेकायदा रेती व्यवसायामुळे परिसराला थोडी अवकळा आली आहे. प्रशासनाने लक्ष दिल्यास हे एक अप्रतिम प्रेक्षणीय स्थळ होऊ शकते. खाडीतून नौकायनाची सोय केल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते. अनेक जण संध्याकाळच्या वेळी नागला बंदरावर गर्दी करतात.. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास ठाण्यातील हे एक सहजसुंदर पर्यटनस्थळ होऊ शकेल.

नागला बंदर
कसे जाल?
’ ठाण्याहून मीरा-भाईंदर, बोरिवलीकडे जाताना घोडबंदर रोडवर गायमुख, भाईंदरपाडा थांबे आहेत. टीएमटी किंवा मीरा-भाईंदर महापालिकेच्या बसगाडय़ा येथे थांबतात. रस्त्याच्या एका बाजूला नागला बंदर आहे.