पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळचे बांधकाम वाचविण्यासाठी स्वयंघोषित कार्यकर्त्यांची नामी शक्कल

अनधिकृत बांधकामावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करू नये, म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेकायदा बांधकाम केल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मांडून ठेवण्याचा उद्योग सुरू केला आहे. असाच एक प्रकार पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळील इमारतीच्या कोपऱ्यात एका स्वयंघोषित कार्यकर्त्यांने केला आहे.

गेल्या आठवडय़ात पालिकेच्या कार्यालयाला महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी होती. या संधीचा पुरेपूर लाभ उठवीत एका स्वयंघोषित कार्यकर्त्यांने पालिकेचे विभागीय कार्यालय आणि के. बी. वीरा शाळा यांच्या मधील मोकळ्या जागेत एक गाळा बांधण्याचा प्रयत्न केला. पालिकेला सुट्टी असल्याने या बेकायदा बांधकामाकडे कोणाचे लक्ष नव्हते. अर्धवट काम पूर्ण झाल्यानंतर या चतुर कार्यकर्त्यांने तेथे लगेच महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्य राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आणून ठेवल्या.

पंचाच्या समक्ष बांधकामावर कारवाई

पालिकेच्या ‘फ’ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी श्वेता सिंगासने यांना या बेकायदा बांधकामाची चाहूल लागताच त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. तेव्हा त्यांना राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा ठेवल्याचे आढळून आले. हे बांधकाम अधिकाऱ्यांनी तोडले तर पुन्हा राष्ट्रपुरुषांचा अवमान झाला म्हणून आवई उठवली जाऊ शकते, हे लक्षात आल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस, काही पंचांच्या समक्ष हे बेकायदा बांधकाम तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्यांपूर्वी याच कार्यकर्त्यांने याच जागेवर एक बेकायदा गाळा बांधला होता. तो तोडण्यात आला होता. आता पुन्हा त्याच जागेवर गाळा बांधण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. पंचाच्या समक्ष, पोलीस बंदोबस्तात हे बेकायदा बांधकाम तोडण्यात येणार आहे.