रविवारपासून खुले; नौकाविहार, पक्षीनिरीक्षण यांसह विविध सुविधा

ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींना खाडीकिनारी असलेल्या जैवविविधतेचा अनुभव घेता यावा, यासाठी ऐरोलीत उभारण्यात आलेल्या पर्यटन केंद्राचे काम संपुष्टात आले असून रविवारी, ३० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नौकाविहार, पक्षीनिरीक्षण आणि जैवविविधतेची माहिती देणाऱ्या उपक्रमांचा समावेश या पर्यटन केंद्रात करण्यात आला असल्याने पर्यावरणप्रेमींना खाडी पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे.

या पर्यटनकेंद्रात शासनाने जर्मनीतील जीआयझेड कंपनीशी संलग्न राहून पर्यावरणप्रेमींसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. देशात राबवण्यात येणाऱ्या सागरी आणि किनारपट्टी संरक्षित परिसराचे शाश्वत व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत  महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन केंद्र ऐरोलीत साकारले आहे.  किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता केंद्र असे या पर्यटनकेंद्राला नाव देण्यात आले असून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या कांदळवन विभागातर्फे हे केंद्र उभारण्यात आले आहे. बोटीच्या माध्यमातून खाडीसफर, दृक्श्राव्य माध्यमातून पक्षीनिरीक्षण, भित्तिपत्रकाद्वारे जैवविविधताविषयक माहिती पर्यटकांना अनुभवता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून या पर्यटन केंद्रात खाडीकिनारी असलेल्या पक्ष्यांची माहिती चित्रे आणि त्यांचा आवाज पर्यटकांना ऐकता येणार आहे. पर्यटन केंद्राच्या ठिकाणाहून वनविभागातर्फे पर्यटकांसाठी बोटीने खाडीसफर घडवली जाणार आहे. ठाणे खाडीकिनाऱ्याला फ्लेमिंगो सेंच्युरी जाहीर केल्याने किनाऱ्यावर फ्लेमिंगो आणि इतर जातीचे पक्षी या खाडीसफरीत पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.