डान्सबारमधील धांगडधिंगाणा थांबविण्यासाठी त्यावर निर्बंध आले. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बार व्यावसायिकांनी ऑर्केस्ट्रा बार चालवण्याची परवानगी मिळवली. परंतु ऑर्केस्ट्रा बार फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित राहीला नाही. ‘नाच’ जरी बंद झाला तरी अनैतिक प्रकारांना उधाण आले. बार आणि लॉजच्या नावाखाली वैश्याव्यवसाय फोफावले. बारबालांची संख्या बेकायदा वाढवण्यात आली. पोलिसांच्या धाडी पडताच त्यांना छुप्या खोल्यांमध्ये अक्षरश: डांबण्याचे प्रकार सुरू झाले. शहराच्या सुव्यवस्थेसाठी याला आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले होते..

मीरा-भाईंदरमधील बार पुन्हा एकदा सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच शहरातील अनेक बारमधील सुरू असलेला ऑर्केस्ट्रा कायमस्वरूपी बंद करण्यात आला असल्याची घोषणा नुकतीच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी केली. बारना परवानग्या दिल्या जाणाऱ्या महसूल विभागाला ऑर्केस्ट्रासाठी परफॉर्मन्स परवाना देण्यात येऊ नये, अशी विनंती पोलिसांनी केली होती. ही विनंती मान्य करण्यात आल्याने बारमध्ये सुरू असलेला धांगडधिंगाणा आता बंद झाला आहे. ऑर्केस्ट्रा बंद झाल्याने गुन्हेगारीमध्ये घट झाली असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे; परंतु ऑर्केस्ट्रा बंद झाला तरी बार सुरूच राहणार असल्याने ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेले अनैतिक प्रकार यामुळे थांबणार का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे इलाज झाला, परंतु आजार कायम राहणार की काय, अशीच संभ्रमाची परिस्थिती दिसत आहे.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

अनधिकृत बांधकामांसोबतच मीरा-भाईंदरची ‘डान्स बारचे’ शहर अशी ओळख होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दहिसर चेकनाक्यानजीक अनेक बार त्या काळी उदयाला आले. एके काळी डान्स बार सुरू असताना या ठिकाणी एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल बारमधून सुरू असायची. मुंबईत कामाधंद्यानिमित्त येणारे अनेक धनिकपुत्र जाताजाता जिवाची मुंबई करण्यासाठी या बारना अवश्य भेट देत असत. अनेक डान्स बार पहाटेपर्यंत सुरू राहात असल्याने हे शहर झोपतच नाही असे चित्र या ठिकाणी दिसून येत होते. डान्स बारमधून नाचणाऱ्या बारबाला जवळपासच वास्तव्याला असत. त्या काळी बारसोबतच अनेक छोटय़ामोठय़ा व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले होते. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत होती ते वेगळेच; परंतु डान्स बार बंद करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे येथील छमछम एका रात्रीत बंद झाली. कमाईचा मोठा मार्ग बंद झाल्याने येथील बारचालकांपुढे व्यवसाय सुरू कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता.

मात्र तद्दन व्यावसायिक असलेल्या बारमालकांनी यावर उपाय शोधून काढला तो म्हणजे ऑर्केस्ट्रा बारचा. बारमध्ये नृत्याऐवजी संगीताचे कार्यक्रम सुरू करण्याची शक्कल लढविण्यात आली. शासनानेही ऑर्केस्ट्रा बारला परवानगी दिली. हळूहळू ऑर्केस्ट्रा बारमध्ये जम बसू लागला. बारमालकांना पुन्हा एकदा बरकतीचे दिवस आले आणि पुन्हा एकदा अनैतिक व्यवसायाची सुरुवात होऊ लागली. ऑर्केस्ट्रा बारसाठी शासनाच्या महसूल विभागाकडून बार परवान्यासोबतच परफॉर्मन्स परवानादेखील घ्यावा लागतो. या परफॉर्मन्स परवान्यात बारमध्ये गाणी म्हणणाऱ्यांसाठी किती आकाराचा मंच असावा, त्यात गाणी गाणारे किती असावेत, हा मंच ग्राहकांपासून किती दूर असावा याबाबतच्या अटी-शर्ती घालण्यात आलेल्या असतात; परंतु बारमालकांनी या अटी-शर्ती पार धुडकावून लावत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बारमधून अक्षरश: धांगडधिंगाणा घालायला सुरुवात केली. त्यामुळे नाव ऑर्केस्ट्रा बार असले तरी त्याला पुन्हा डान्स बारचेच स्वरूप येऊ लागले. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू झाले आणि यातूनच वेश्या व्यवसायाला चालना मिळाली.

मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्यविक्रीसाठी बंदी घातल्यानंतर शहरातील महामार्गालगतचे बार आपोआपच बंद झाले त्यात ऑर्केस्ट्रा बारचाही समावेश होता. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आपोआपच कमी झाली; परंतु महामार्गालगतचे बार बंद झाले तरी शहरातील पाचशे मीटर अंतराच्या मर्यादेबाहेर असलेले बार सुरू होते आणि यात ऑर्केस्ट्रा बारदेखील होते. दर वर्षी मार्च महिन्याअखेर बारमालकांना आपल्या बार परवान्याचे आणि परफॉर्मन्स परवान्याचे महसूल विभागाकडून नूतनीकरण करून घ्यावे लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची नामी संधी साधत पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र पाठवले. वारंवार कारवाई करूनही ऑर्केस्ट्रा बारमधून अनैतिक व्यवसाय कमी होत नसल्याने या बारचे परफॉर्मन्स परवाने नूतनीकरण करण्यात येऊ नयेत, अशी विनंती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. हा विनंती अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या विचाराधीन होता.

मात्र याच काळात सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या बारवरील बंदी हटवली. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गलगतच्या बारना बंदीचे आदेश लागू नसल्याचे सुधारित आदेश न्यायालयाने जारी केले. या आदेशानुसार गेल्या आठवडय़ात मीरा- भाईंदरमधील सर्व बारमालकांनी आपल्या बार परवान्यांचे नूतनीकरण करून पुन्हा एकदा नव्या जोमाने बार सुरू केले. या धबडग्यात ऑर्केस्ट्रा बारच्या परफॉर्मन्स परवान्याचेदेखील नूतनीकरण होते की काय अशी भीती होती; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची विनंती मान्य करून बारचे परफॉर्मन्स परवाने नूतनीकरण न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शहरातील सुमारे ४२ ऑर्केस्ट्रा बारमधून ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेला अनैतिक व्यवसाय थांबेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे; परंतु बारमधील ऑर्केस्ट्रा बंद झाला तरी बार सुरूच राहणार आहेत. या बारमधून महिला वेटरही कायम राहणार आहेत, त्यामुळे ऑर्केस्ट्रा बंद झाला तरी बारबालांकडून करवून घेण्यात येणारा वेश्या व्यवसाय आता थांबणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहत आहे.

अनैतिक व्यवसायांना चालना

बारला परवाना घेत असतानाच बारमालकांना नोकरनामा मिळत असतो. यात संबंधित बारमध्ये ग्राहकांसाठी किती टेबल आहेत त्याच्या संख्येनुसार बारमध्ये किती महिला वेटर असाव्यात याची संख्या निश्चित केली जाते; परंतु अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये उघड उघड वेश्या व्यवसाय सुरू झाल्याने नोकरनाम्यात नमूद केलेल्या संख्येपेक्षा कित्येक पटीने बारबाला कामासाठी ठेवण्यात आल्या. बारमालकांनी बारसोबतच स्वत:चे लॉजही सुरू केले अथवा नजीकच्या लॉजमालकाशी संधान साधले. ऑर्केस्ट्रा बारमध्ये येणाऱ्या ग्राहकाला पुढील अनैतिक व्यवसायासाठी ही लॉज उपलब्ध करून दिली जात असत. दुसरीकडे बारमधून आवश्यक संख्येपेक्षा अधिक बारबाला कामाला असल्याने पोलिसांपासून त्या लपविण्याची नामी युक्तीदेखील बारमालकांनी शोधून काढली. पोलिसांची अचानक धाड आलीच तर बारबालांना दडविण्यासाठी बारमध्येच अनेक छुप्या खोल्या तयार करण्यात आल्या. बाहेरून या ठिकाणी छुपी दालने आहेत याची पोलिसांना शंकादेखील येऊ नये अशा पद्धतीने या खोल्या दडविण्यात येतात. पोलिसांच्या धाडीत बारबालांना या छुप्या खोल्यांमधून दाटीवाटीने अक्षरश: कोंबले जात असे. ऑर्केस्ट्रा बार अनैतिक व्यवसायाचे अड्डे बनू लागल्याने ते पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होते.

प्रकाश लिमये

@suhas_news