कोपर्डीत बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती आणि आíथक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी आदी मागण्यासाठी रविवारी पालघरमध्ये निघालेल्या पहिल्या मराठी क्रांती मूक मोर्चा हा पालघर जिल्ह्य़ाच्या निर्मितीनंतरचा पहिला सर्वात मोठा मोर्चा ठरला. त्यात शिस्तबद्धता, नियम आणि वेळेचे तंतोतंत पालन या त्रिसूत्रीचा मिलाप घडून शिस्तीचे दर्शन घडविण्याबरोबरच मराठा समाजाची डरकाळी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम या मोर्चाने केले. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने मराठा मोर्चाच्या यशस्वितेबाबत साशंकता होती.

ठाणे, भिवंडी या ठिकाणांवरूनही मराठा बांधव मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले. त्यात स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी, लहान मुले, आबालवृद्धांचाही मोठय़ा संख्येने सहभाग होता.

मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता शिवाजी चौक चाररस्ता येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि जिजाऊ वंदनाचे गीत गाऊन करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व सात मुलींनी केले. सुरुवातीला लहान मुले, मुली, त्यामागे महिला, वृध्द, त्यापाठोपाठ डॉक्टर, वकील, इंजिनीयर मराठा तरुण, त्यानंतर राजकीय नेते आणि सर्वात शेवटी स्वच्छता करणारे स्वयंसेवक अशी या मोर्चाची रचना करण्यात आली होती. सर्व रस्ते मोच्रेकऱ्यांनी भरून गेले होते. मोर्चा पालघर रेल्वे स्थानक मार्गावरून हुतात्मा चौकात हुतात्म्यांना वंदन करण्यात येऊन तो तहसीलदार कचेरीमाग्रे आर्यन हायस्कूल क्रीडांगणावर गेला.

यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चावर ड्रोनमार्फत नजर ठेवण्यात आली होती. या मोर्चात सुमारे बारा ते पंधरा हजार मराठा समाजाबरोबरच विविध धर्मीय लोक सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर आर्यन क्रीडांगणावर सभेत झाल्यानंतर मुलींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले.

माणगावात अभूतपूर्व प्रतिसाद

अलिबाग : नवी मुंबई आणि रत्नागिरीपाठोपाठ कोकणात रविवारी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही मोर्चाना समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्ह्य़ात माणगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात लाखोंच्या संख्येनी मराठे सहभागी झाले.

राज्यात महिलांवरील होणारे अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अत्याचार करून त्यांचे निर्घृण खून केले जात आहेत. त्यामुळे महिलांना संरक्षणासाठी मोच्रे काढावे लागत आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर आरोपींवर तात्काळ कारवाई झाली असती तर नाशिक आणि अलिबागमधील घटना टळल्या असत्या, असे मत अमृता दाभेकर हिने व्यक्त केले.

वध्र्यातील मराठा-कुणबी मूकमोर्चा लक्षवेधी

वर्धा : महिलांच्या विक्रमी उपस्थितीने रविवारचा सकल मराठा कुणबी मुकमोर्चा यशस्वी ठरला. व्यासपीठावरून ‘मूक आहोत, मूकच राहू द्या, मुकाटय़ाने मागण्या मान्य करा’ असा आवेश व्यक्त करीत जिजाऊ वंदना झाल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. सुमारे दोन किलोमीटरच्या या मोर्चाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर झाली. तब्बल दोन तास उशिरा येथील मोर्चास प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता आयोजित या मोर्चाच्या तासाभरापूर्वी आरटीओ पटांगण रिते पाहून आयोजकांमध्ये अस्वस्थता पसरली होती, परंतु अखेर शहरातील विविध भागातून महिलांची गर्दी सभास्थळी उसळली.

ठाण्यात संविधान सन्मान मोर्चा..

‘ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी..’ अशी घोषणा करत रविवारी आंबेडकरी जनतेने ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद देणाऱ्या मागण्या पुढे येऊ  लागल्याने त्याचा विरोध करण्यासाठी संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाचे लोण आता कोकणातही पोहोचले आहे. रविवारी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.