कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १०७ नगरसेवकांपैकी ६० ते ७० नगरसेवकांच्या प्रभागात गटारे आणि पदपथांची कामे युद्धपातळीवर सुरूकरण्यात आली आहेत. ही कामे करताना सुस्थितीत असलेली गटारे आणि पदपथांचेही तोडकाम सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना अशा कामांना वेगाने मंजुऱ्या दिल्या जात आहे. हे करत असताना कोणत्या कामांची आवश्यकता आहे याचा कोणताही ठोस अहवाल सादर केला जात नसल्याने या कामांवर विनाकारण उधळपट्टी होत असल्याची टीकाही होऊ लागली आहे. या कामांच्या चौकशी मागणी जोर धरू लागली असून काही सामाजिक संघटना या मुद्दय़ावर न्यायालयाचे दरवाजे ठोठविण्याच्या मनस्थितीत आहेत.
नगरसेवकांना आपल्या प्रभागात अन्य विकास कामे करता यावीत यासाठी अर्थसंकल्पात हा निधी राखीव ठेवला जातो.
मात्र, या निधीच्या माध्यमातून होणारी कामे सर्वच महापालिकांमध्ये टीकेचा विषय ठरू लागली आहेत. कल्याण-डोंबिवलीतही काही वेगळे चित्र नाही. महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने गटारे आणि पदपथांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. स्थानिक नगरसेवक, मजूर संस्थाचालक, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामे केली जात असून कल्याण-डोंबिवलीतील अध्र्याहून अधिक प्रभागांमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी केलेली गटारे, पदपथ तोडून तेथे नवीन बांधण्याची कामे सुरू झाली आहेत. केवळ दौलतजादा करण्यासाठी ही कामे करण्यात येत असल्याने अतिशय निकृष्ट दर्जाची ही कामे करण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी आमच्या प्रभागातील विकास कामे करण्यात आली आहेत. मग आता ही कामे कशासाठी जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी नाही का असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
‘तोडकामे’
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवमार्केट प्रभागात तीन वर्षांपूर्वी गटार आणि पदपथांची कामे करण्यात आली. असे असताना त्याच ठिकाणी नव्याने कामे सुरू करण्यात आले आहे. रामनगर प्रभाग, पंडित दीनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकातील उद्यान पदपथाचे कामही अशाच पद्धतीने केले जात आहे. कल्याण- डोंबिवली शहरांमध्ये अशा प्रकारची कामे ६० ते ७० नगरसेवकांच्या प्रभागात सुरू आहेत. रामनगर प्रभागात यापूर्वी करण्यात आलेली गटारे, पदपथाची कामे आणि आताची कामे याचा दर्जा निकृष्ट आहे, असा दावा या भागातील माजी नगरसेवक भाई देसाई यांनी केला. अनेक प्रभागांमध्ये सुरू असलेली पदपथ, गटाराची नवीन कामे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.