सन ज्यूस फास्ट फूड कॉर्नर
tv09 तिशी-चाळिशीतले मित्र एकत्र भेटले की कॉलजच्या ‘त्या’ कट्टय़ाची आवर्जून आठवण काढतात. कॉलेजच्या बाजूची चहाची टपरी किंवा वडापाववाला हे नकळत आठवणींचा भाग बनून जातात. तशाच प्रकारे ठाणे पूर्वेतील के.बी आणि के.सी कॉलेजजवळील हे ‘सन ज्यूस फास्ट फूड कॉर्नर’ तेथील कॉलेजिर्असच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला आहे. यंगस्टर्सची आवड लक्षात घेता सन ज्यूस फास्ट फूड कॉर्नरचे मालक संजय हरचंदानी यांनी तीन वर्षांपूर्वी हे फूड कॉर्नर सुरू केले असून विद्यार्थ्यांसाठी तो एक हँग आऊट पॉइंट बनला आहे.
ठाणे पूर्वेतील रामकृष्णनगर येथे के.बी आणि के.सी कॉलेजमधील विद्यार्थी सन ज्यूस सेंटरवर आपल्याला पाहायला मिळतात. दुपारी तसेच सायंकाळच्या वेळेस तर महाविद्यालयीन तरुणांची झुंबडच येथे उडते. कॉलेजचे लेक्चर बंक करून मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी सन ज्यूस फूड कॉर्नर हे ठरलेले ठिकाण आहे.  
सॅण्डविच, गार्लिक ब्रेड, हॉट डॉग, बर्गर, पिझ्झा, इडली, डोसा, पावभाजी, ज्यूस, सरबत, मिल्क शेक आदी पदार्थाचे विविध प्रकार येथे मिळतात. बाजारात मोठय़ा ब्रॅण्डची चलती असली तरी हे सारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसते. त्यामुळे संजय हरचंदानी यांनी कमी किमतीत त्याच दर्जाचे खाद्यपदार्थ त्यांच्या कॉर्नरमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात सॅण्डविचचे जवळपास चाळीसहून अधिक प्रकार, १३ प्रकारचे हॉट डॉग (पाश्चिमात्य पदार्थ), tv10पिझ्झाचे २३ प्रकार, ६० प्रकारचे डोसे अशा विविध खाद्यपदार्थाचे जवळपास दहापेक्षा जास्त प्रकार येथे उपलब्ध आहेत. तसेच फळांच्या ज्यूसचे पंधराहून अधिक प्रकार, मिल्क शेकचे २० प्रकार येथे उपलब्ध आहेत. सनज्युसचे वैशिष्टय़ म्हणजे ज्युसमध्ये व्हनिला आईस्क्रीम मिसळून ‘ब्लॉसम’ हे एक वेगळे पेय त्यांनी तयार केले आहे. ब्लॉसम म्हणजे मोसंबी, ऑरेंज, पाइनअ‍ॅप्पल, वॉटरमेलन, ग्रेप्स, अ‍ॅपल, प्लम, कॉक्टेल, पीच, अनार, स्टॉबेरी, किवी आणि मँगो यांच्या मिश्रणाचे थंडगार पेय. सॅण्डविचमध्ये सर्वसामान्य प्रकारांसोबतच मेओनिज वापरून बनवलेले मयो टोस्ट आणि मयो कॉर्न, तसेच तंदुरी टोस्ट, डबल डिप टोस्ट, करुमा टोस्ट, शांघाई टोस्ट आणि ब्रेड पिझ्झा टोस्ट असे प्रकार त्यांनी स्वत: तयार केले आहेत.
खवय्यांना नेहमीच नवीन खाद्यपदार्थ चाखायला आवडतात. पिझ्झामध्ये पहाडी पिझ्झा, चिलीमिली पिझ्झा, ऑलिव्ह पिझ्झा आणि मेओनिज वापरून बनवलेले मयो चीज पिझ्झा, मयो कॉर्न, थिन क्रस्ट पिझ्झा आदी प्रकार येथे मिळतात. त्याचबरोबर ‘हॉट-डॉग’ या पाश्चिमात्य खाद्य प्रकारामध्ये व्हेज चीज, व्हेज पनीर चीज, चिली-मिली, मयो चिज, मयो कॉर्न शांघाई, तंदुरी, तंदुरी पनीर, कुरमा, चटपटा आदी प्रकाराने ख्यवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जातात. लोकांन ताजे खायला देणे हा ‘सन ज्यूस कॉर्नर सुरूकरण्यामागचा एक उद्देश होता, असे संजय हिरचंदानी सांगतात. महाविद्यालयातील विद्यार्थी खासकरून वाढदिवस साजरा करण्यासाठी या कॉर्नरला पसंती देतात.
‘एक बार खाओगे तो बार बार आओगे’ हे सन ज्यूसचे ब्रीदवाक्य असून ते त्यांनी सार्थ ठरविले आहे. या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहता ते दिसून येते. कॉलेजला टिफिन घेऊन येणे म्हणजे ‘सो ओल्ड फॅशन’ वाटते, तर काही विद्यार्थी हे ठाणेबाहेरील असल्याने दुपारच्या वेळेस भूक लागल्यावर हेवी जेवण घेण्यापेक्षा येथील सॅण्डविचला ते पसंती देतात. याबरोबरच ‘गार्लिक’ ब्रेड हा पदार्थही विद्यार्थ्यांच्या खास आवडीचा आहे.
शलाका सरफरे

स्थळ- दुकान क्र.८, रामकृष्ण नगर, सद्गुरू गार्डनच्या समोर, ठाणे (पूर्व),
वेळ-सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते रात्री ११.
रविवारी दुपारी ४ ते रात्री १०