खंडणीसाठी व्यावसायिकांचे दूरध्वनी क्रमांक पुरवण्याचा गुन्हा

कोटय़वधी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी व्यावसायिकांचे क्रमांक कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला पुरविणाऱ्या तिघांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांपैकी एकजण शिवणकाम (टेलर) तर उर्वरित दोघे हॉटेल व्यावसायिक आहेत. या तिघांनी ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच मुंबई शहरातील अनेक व्यावसायिकांचे क्रमांक व त्याच्या कुटुंबांची माहिती पुजारीपर्यंत पोहचवली असून हे तिघेही त्याचे प्रमुख खबरे असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच काही व्यावसायिक त्याला खंडणी स्वरूपात पैसे पुरवीत होते आणि त्या पैशांवर पुजारी टोळी चालवीत असल्याचे समोर आले आहे. या व्यावसायिकांची यादी हाती लागल्याने तेही रडारावर आहेत, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली.

यश ऊर्फ पप्या ऊर्फ रमेश भीमराव पाटील (४०), विजयप्रकाश सुंदर पुजारी (४३) आणि दयानंद नारायण अमीन ऊर्फ पुजारी (६२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरातील व्यावसायिकांना कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याने खंडणीसाठी धमकाविण्यास सुरुवात केली होती. यातूनच गेल्या वर्षी खंडणीची रक्कम दिली नाही म्हणून त्याने उल्हासनगरमधील केबल व्यावसायिक सच्चिदानंद करीरा यांची हत्या केली होती. या प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने आरोपींना अटक केली होती. त्यानंतरही त्याने उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक सुमित चक्रवर्ती यांच्यावर कार्यालयात गोळीबार केला होता. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा समांतर तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी.कदम करीत होते.या तपासादरम्यान पथकाने यश पाटील, विजयप्रकाश पुजारी आणि दयानंद पुजारी या तिघांना अटक केली. यश पाटील याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे तर विजयप्रकाश पुजारी याच्याकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि मोबाइल जप्त केले आहेत. त्यांनी गोवा परिसरातून ही शस्त्रे आणली होती. तसेच चक्रवर्ती प्रकरणात हल्लेखोरांना शहरात आणणे आणि त्या परिसराची रेकी करणे अशी कामे यश व विजयप्रकाश या दोघांनी केली होती, अशी माहितीही सहपोलीस आयुक्त डुम्बरे यांनी दिली.

टेलर आणि हॉटेल व्यावसायिक प्रमुख खबरी..

यश पाटील शिवणकामाचा व्यवसाय करतो. विजयप्रकाश याचे हॉटेल होते. दयानंद आमीन हा हॉटेल व्यावसायिक आहे. हॉटेल व्यवसायात असल्यामुळे विजयप्रकाश आणि दयानंद या दोघांकडे बहुतांश हॉटेल व्यावसायिकांचे क्रमांक होते. शिवणकामाच्या व्यवसायात असल्यामुळे यश याच्याकडेही बडय़ा उद्योगपतींचे क्रमांक होते. हे तिघेही उद्योगपती व व्यावसायिकांचे मोबाइल क्रमांक, माहिती सुरेश पुजारीपर्यंत पोहचवीत होते.