पहिला निकाल डायघरच्या प्रभाग २९चा?

२४ तास पाणीपुरवठा, दर्जेदार आरोग्य सुविधा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या नागरी जिव्हाळय़ाच्या मुद्दय़ांपेक्षा शिवसेनेवरील भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षांतर, भाजपमधील गुंडांचा प्रवेश, काँग्रेस-राष्ट्रवादीतील कुरबुरी या मुद्दय़ांनी गाजलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीचा निकाल आज, गुरुवारी लागणार आहे. सकाळी दहा वाजता शहरातील १२ केंद्रांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोनपर्यंत ठाण्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठय़ा उत्साहाने मतदान केले. परंतु, मतदार यादीतील गोंधळामुळे हजारो जणांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. तरीही यंदा मतदानाचा टक्का वाढला असल्याने याचा निकालावर काय परिणाम होतो का, याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. गुरुवारी (आज) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपापर्यंत ठाणेदार कोण हे चित्र स्पष्ट होऊ शकेल. एकूण ३३ प्रभागांसाठी निवडणूक झाली असून एका प्रभागात चार वॉर्डाचा समावेश आहे. या सर्व प्रभागांची एकाच ठिकाणी मतमोजणी झाली तर निकाल जाहीर होण्यासाठी उशीर होईल, अशी भीती होती. त्यामुळे १२ केंद्रांवर मतांची मोजणी होणार आहे. यापैकी डायघर येथील प्रभाग क्र. २९चा निकाल सर्वात पहिला लागेल, असा अंदाज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

विभागीय स्तरावर निकाल

महापालिका निवडणुकीसाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले होते. प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन ते चार प्रभागांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर निवडणुकीच्या मतमोजणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निकाल प्रक्रिया जलद व्हावी तसेच मतमोजणी योग्यप्रकारे व्हावी, या उद्देशातून हे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार शहरातील १२ ठिकाणी मतमोजणी होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच प्रभागांचे निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

मतमोजणी केंद्रे

  • श्री माँ विद्यालय, पातलीपाडा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शन व स्मृती केंद्र, पोखरण रोड दोन
  • महिला बचत गट इमारत, वर्तकनगर
  • आय.टी.आय. वर्कशॉप इमारत, रामनगर
  • ठाणे हेल्थ क्लब तरण तलाव
  • दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह
  • होली क्रॉस शाळा, कॅसल मिल
  • सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळा, कळवा
  • ए. एफ. कालसेकर डिग्री कॉलेज, मुंब्रा
  • बॅडमिंटन हॉल, मुंब्रा (दोन केंद्रे)
  • ए. ई. कालसेकर कॉलेज, मुंब्रा