पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर योजना; १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

ठाणे महापालिकेचा कारभार कागदमुक्त व्हावा यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर संगणकीकृत यंत्रणा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून महापालिकेचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले जाणार असून शहरातील विविध विकासकामांचे तसेच अन्य प्रस्ताव संगणकाद्वारे संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या नव्या प्रक्रियेमुळे विविध कामांच्या नस्ती गहाळ होण्याचे तसेच त्यांचा गैरवापर होण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना केला.
केंद्र तसेच राज्य शासनाची स्मार्ट सिटी योजना शहरात राबवत असतानाच महापालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा यासाठी प्रशासकीय पातळीवर काम केले जात आहे. विविध विभाग, प्रभाग समित्या तसेच अन्य विभागांमध्ये संगणकाचा वापर होत असला तरी महापालिकेचा कारभार पेपरलेस होऊ शकलेला नाही. आजघडीला महापालिकेमध्ये विविध प्रस्ताव संगणकाद्वारे तयार करण्यात येतात. मात्र विविध विभागांकडून या प्रस्तावांच्या नस्ती तयार करताना पुढील कारभार फायलींचा आणि कागदपत्रांचा होऊन बसतो. या नस्तीसाठी कागदांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने त्यावर मोठा खर्चही होतो. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेसाठी विविध कामांचे प्रस्ताव यापुढे संबंधित अधिकाऱ्यांकडे संगणकाद्वारेच पाठविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. महापालिकेतील अधिकारी विविध विभागांच्या नस्ती बघू शकतील. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांना काहीच करता येऊ शकणार नाही. महापालिका आयुक्त मात्र सर्वच विभागाचे कामकाज हाताळू शकणार आहेत.

पुढच्या दिवाळीपर्यंत यंत्रणा कार्यान्वित..
ठाणे महापालिकेत संगणकीकृत यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात विविध २७ विभाग एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या यंत्रणेसाठी किमान सहाशे संगणकांची गरज असून सध्या महापालिकेच्या ताफ्यातील संगणकांचा आकडा पाहता, दीडशे ते दोनशे नवीन संगणकांची आवश्यकता आहे. या यंत्रणेसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून संबंधित ठेकेदार पाच वर्षे यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करणार आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे उभी राहणार आहे. तसेच त्या पुढील सहा महिने यंत्रणेतील सुधारणेमध्ये जातील, अशी माहिती संगणकीय विभागाचे व्यवस्थापक स्वरूप कुलकर्णी यांनी दिली.