मोर्चेकऱ्यांची शिस्त, पोलिसांचे नियोजन यामुळे वाहतूक सुरळीत

राज्यात आजवर ठिकठिकाणी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चातील शिस्त मुंबईतील मोर्चाच्या वेळी दिसून आली. ठाण्याच्या वेशीवर तासाभरासाठी वाहतूक कोंडी झाली. मात्र मोर्चेकऱ्यांची मुंबईकडे शिस्तबद्ध कूच आणि वाहतूक पोलिसांनी आखलेल्या उपायामुळे गर्दीच्या वेळीही वाहनांनी सुसाट वेग पकडला होता. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकातनाका येथे तासभर वाहने खोळंबून उभी होती, मात्र मोर्चेकऱ्यांची वाहने मुंबईत सरकल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

मोर्चाची कल्पना असल्याने अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे मोर्चाचा भार कमी होताच ठाणे, नवी मुंबई, कळव्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहने दिसून येत होती. ठाणे-बेलापूर रस्ता, कळवा नाका, मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर या एरवी कोंडीच्या मार्गावरील प्रवास त्यामुळे वेगाने होत होता.

मुंबई तसेच ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने मुंुबई-नाशिक महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील कोपरी पूल अरुंद असल्याने या ठिकाणी एरवी मोठी कोंडी होत असते. मुंबईतील मराठा मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था मोडून पडेल, अशी भीती व्यक्त  होत होती. अरुंद कोपरी पूल आणि महामार्गावरील कोंडीचा अनुभव लक्षात घेता ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मंगळवारपासूनच महामार्गावरील प्रमुख चौकांसह ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे पथक तैनात केले होते. या पथकामार्फत महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत राहील, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येत होते.

नाशिक, औरंगाबाद, धुळे, हिंगोली तसेच अन्य जिल्ह्य़ातील मोर्चेकरांची वाहने मुंबई-नाशिक महामार्गावरून मंगळवार रात्रीपासून मुंबईच्या दिशेने जात होती. या वेळेत महामार्गावर अन्य वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने येथील वाहतूक पहाटेपर्यंत सुरळीतपणे सुरू होती. दरम्यान, सकाळी आठ वाजल्यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा माजिवडा उड्डाणपुलापर्यंत पोहोचल्या होत्या. मोर्चेकऱ्यांची आणि नोकरदार वर्गाची वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी झाली होती. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कोपरी पुलावरील ठाण्याची एक मार्गिका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी खुली केली. त्यामुळे तासाभरात या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर झाली.

मराठा मोर्चासाठी जाणाऱ्या वाहनांचा भार सकाळी दहानंतर कमी होताच महामार्ग आणि आसपासच्या रस्ते अगदी मोकळे दिसू लागले.

दोन हजारांहून अधिक वाहने..

मुंबईतील मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, धुळे, हिंगोली तसेच अन्य जिल्ह्य़ातील मोर्चेकरी कार तसेच बसमधून मुंबईच्या दिशेने जात होते. या मार्गावरून पहाटे सहा वाजेपर्यंत दीड हजाराहून अधिक तर त्यानंतर दहा वाजेपर्यंत पाचशेहून अधिक मोर्चेकऱ्यांची वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

जकात नाक्यावर तात्पुरते वाहनतळ..

मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील वडाळा तसेच अन्य भागात मोर्चेकऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी तात्पुरते वाहनतळ उभारण्यात आले होते. मोर्चेकऱ्यांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन त्यात नागरिकांसह मोर्चेकऱ्यांना अडकून पडावे लागू नये म्हणून पोलिसांनी आनंदनगर जकात नाक्यावर तात्पुरते वाहनतळ उभारले होते. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस तसेच मराठा मोर्चाचे स्वयंसेवक मोर्चेकरांच्या वाहनांना थांबवून या ठिकाणी वाहने उभे करण्याचा पर्याय सुचवित होते. अनेकांनी हा पर्याय स्वीकारून त्या ठिकाणी वाहने उभी केली आणि त्यानंतर ठाणे तसेच मुलुंड रेल्वे स्थानकातून मोर्चेकरांनी मुंबई गाठली.