वसई-विरारमध्ये चोरी करून उत्तर प्रदेशात सरपंचपदाची निवडणूक जिंकणाऱ्या आरोपीस उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या काही सेंकदात घराचे कुलूप तोडण्यात हा आरोपी वाकबगार होता.

जानेवारी २०१६मध्ये वसईच्या साईनगर येथील एका इमारतीत चोरी झाली होती. चोराने घराचे कुलूप तोडून घरातीेल दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. त्याचा चेहरा सीसीटीव्हीत दिसत होता. त्याची ओळख असलम राजू असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले. त्याने वसई-विरारमध्ये अनेक ठिकाणी घरफोडी करून हैदोस घातला होता. मोहम्मद उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रतापगढ जिल्ह्यातील पोलिसांची मदत मागून त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत बरीच  धक्कादायक माहिती मिळाली. वसई-विरारमध्ये चोरी करून त्याने कोटय़वधी रुपये कमवले होते. त्या पैशातून तो महागडय़ा गाडय़ा विकत घेत होता. उत्तर प्रदेशात त्याने सरपंचपदाची निवडणूक जिंकली होती. सरपंच असतानाही तो वसई-विरारमध्ये येऊन चोरी करत असे. चोरी करण्यापूर्वी तो इमारतींची रेकी करायचा. रेकी करताना तो आपल्या प्रेयसीला सोबत ठेवायचा. त्यामुळे कुणाला संशय येत नव्हता. अवघ्या काही सेंकदामध्ये तो बंद घराचे कुलूप तोडण्यात वाकबगार होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याला अटक करून पुढील तपासासाठी वसई येथील माणिकपूर पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.