कडोंमपाच्या टँकरसाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा; खासगी टँकरचा महागडा पर्याय
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शहरी भागात पाणी कपात लागू केली गेली असली तरी गावातील विहिरींना मुबलक पाणी असल्याचे चित्र अगदी कालपरवापर्यंत दिसत होते. त्यामुळे गावपाडय़ांमधील रहिवासी विहिरींमधून होणाऱ्या मुबलक पाणीपुरवठय़ामुळे निर्धास्त होते. मात्र, उन्हाच्या झळा वाढू लागताच गावातील विहिरींचे पाणी आटू लागले असून त्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी गावकऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एक टँकर मिळविण्यासाठी आठ ते दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने खाजगी टँकर चालकांना अतिरिक्त पैसे देऊन टँकर मागविण्याशिवाय कोणताही पर्याय ग्रामस्थांकडे उरलेला नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना पाणीपुरवठा करण्यास महापालिका असमर्थ ठरली आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. या गावांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सध्या पाणीपुरवठा होत आहे. त्यातही साठ टक्के पाणी कपात लागू असल्याने ग्रामीण भागात आठवडय़ातील केवळ एक- दोन दिवस पाणी येत आहे. पाण्याच्या या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने गावातील विहिरी साफ करणे, कूपनलिका खोदणे असे पर्याय शोधून काढले. त्यावर गावकऱ्यांनीही लाखो रुपये खर्चुन गावात ठिकठिकाणी बोअरवेल खोदण्यास सुरुवात केली. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळीच खालावली असल्याने ४०० ते ५०० फूट खोल जाऊनही कूपनलिकेला पाणी लागत नाही, असे आता गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी केवळ विहिरीतील पाण्याचा आधार या गावकऱ्यांना होता. परंतु या विहिरीही आता आटू लागल्या आहेत. सुरुवातीला विहिरीवर पंप लावल्यास किमान दोन तास पाणीपुरवठा होत असे. मात्र आता पंधरा ते वीस मिनिटांतच विहिरीतील सर्व पाणी संपत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बोअरवेलला पाणी नाही, विहिरी आटत चालल्या यामुळे गावात टँकर मागविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महापालिकेकडे टँकरची मागणी केल्यास टँकरपुरवठा करणारे अधिकारी नागरिकांशी योग्य वर्तन करत नाही, अशा तक्रारी आता काही गावांमधून पुढे येऊ लागल्या आहेत. गावात टँकर येण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, असे उत्तर ग्रामस्थांना मिळत आहे. यामुळे खाजगी टँकर चालकांना अवाच्या सवा रक्कम देऊन खाजगी टँकर मागवावे लागतात. ग्रामपंचायत नसल्याने या टँकरचा खर्च उचलायचा कोणी? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींना हा खर्च डोईजड होत असून महापालिकेचेच टँकर गावात येण्यासाठी ते आग्रही आहेत.
गावकऱ्यांचा आरोप
नागरिकांना त्वरित टँकरचा पुरवठा न केल्याने त्यांना खाजगी टँकर मागवावा लागतो. यामुळे खाजगी टँकरचालकांचेही फावले असून त्यांनी आपले भाव अवाच्या सवा वाढविले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे खाजगी टँकर चालकांशी लागेबंधे असून ते गावात लवकर पाणीपुरवठा करत नाहीत जेणेकरून खाजगी टँकर चालकांकडे नागरिकांना जावे लागेल असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

जुना-नवा भेदभाव
गावकऱ्यांची मागणी होताच पालिकेच्या वतीने त्यांना टँकरने पाणी पुरविले जाते. परंतु पालिकेकडे पुरेशा प्रमाणात टँकर उपलब्ध नाहीत. यामुळे खाजगी टँकर चालकांकडून टँकर घ्यावा लागतो. गावातील एका फेरीसाठी टँकर चालक २२०० ते २३०० रुपये भाडे आकारतात. हा खर्च पालिकेला परवडत नाही, यामुळे पालिकेच्या जुन्या हद्दीतच टँकर पुरविले जातात, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

शर्मिला वाळुंज,