वालीव पोलिसांकडून तरुणाला अटक
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे राहणाऱ्या सुनीता नाकोते (२६) या महिलेची चारित्र्याच्या संशयावरून तिचा पती कमलाकर नाकोते (२८) याने हत्या केली. तुंगारेश्वरच्या जंगलात तिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी कमलाकरला अटक केली आहे.
कमलाकर नाकोते ५ जून रोजी सुनीता बेपत्ता असल्याची तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि सुनीताचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्याजवळ एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुनीताचा असल्याचे निष्पन्न झाले. तुंगारेश्वर जंगल वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पती कमलाकर याची चौकशी केल्यावर त्याने पत्नीला वालीव येथील शिवाजीनगर येथील माहेरी गेली होती, असे सांगितले. पण त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर कमलाकरने आपला गुन्हा कबूल करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांची दिशाभूल व्हावी तसेच आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्याने पत्नी बेपत्ता असल्याचीे फिर्याद दिली.
वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलाकर पत्नी सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. काही दिवसांपूर्वी कमलाकरच्या भावाच्या लग्नपत्रिका वाटण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे सुनीताचा काटा काढण्यासाठी कमलाकर तिला तुंगारेश्वरच्या जंगलात घेऊन गेला. जंगलात सुनीताचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह धबधब्याजवळच्या खोल दरीत फेकून दिला. वालीव पोलिसांनी कमलाकरला अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवागनी करण्यात आली आहे.