नरनाळा आणि गावीलगड हे विदर्भातील दोन महत्त्वाचे किल्ले. इतिहास आणि निसर्गाने भारलेल्या या दुर्गाची भटकंती वेगळय़ा जगात घेऊन जाते.

‘येथून आठवणींशिवाय काहीही बाहेर नेऊ नका आणि येथे काहीही ठेवून जाऊ नका’ असा फलक लावला आहे नरनाळा येथील व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर. तो वाचतानाच आपल्याला जाणीव होते आपण एका वेगळय़ाच दुनियेत प्रवेश करीत आहोत. या जाणिवेला साथ मिळते ती सभोवतालच्या वातावरणाची आणि येथील अनाघ्रात निसर्गाची.
नरनाळा येथे जाण्यासाठी नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने अकोला अथवा शेगाव येथे उतरावे. पुढे राज्य परिवहनच्या बसने अकोट येथे बस बदलून पोपटखेडा, शहानूर माग्रे थेट नरनाळा विश्रामगृहाच्या दारात उतरावे. आपले वाहन नेल्यास जास्त सोईचे कारण किल्ल्यासाठी घाटरस्ता असून किल्ल्यावरील बहुतेक सर्व स्थळांपर्यंत वाहन जाते. साहजिक वेळ वाचतो आणि पुढची भ्रमंती पण सोपी होते. किल्ल्याच्या पायथ्याशीच वनखात्याचे देखणे विश्रांतीगृह आहे. दाट जंगलातले हे विश्रामगृह अनेक पर्यटकांना अल्प दरात आसरा देते. याचे आरक्षण वनविभाग अकोला यांचेकडे होते. येथून जंगल सफारीची पण सोय आहे. येथे आवश्यक ती परवानगी घेऊन आपण वाहनासकट बेलाग नरनाळा दुर्गाकडे जाऊ शकतो. किल्ल्यावर आणि जंगलात कोणतेही खाद्यपदार्थ नेता येत नाहीत. याचे कारण पर्यटक वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देतात त्याची चटक लागल्यामुळे प्राणी पर्यटकांवर हल्ला करण्याचा धोका संभवतो. शिवाय ते आपली नसíगकरीत्या अन्न मिळविण्याची सवयही विसरू शकतात. युरोपमध्ये तर वन्यजीवांना खाद्यपदार्थ दिल्यास भरभक्कम दंड भरावा लागतो. येथून मान्यताप्राप्त गाईड घेणे आपल्या सोईचे. कारण तो आपल्याला नेमकी ठिकाणे दाखवितो आणि श्वापदांपासून संरक्षणही देतो. येथील जंगलात अस्वले खूप आहेत. रानगवे, वानरे, नीलगाई, हरणेही सहज दिसतात. पट्टेरी वाघ आणि बिबटे पण आहेत.किल्ल्याकडे जाताना घनदाट जंगलातील घाटरस्ता आहे. या वाटेने जाताना आपल्याला सर्वप्रथम लागतो मेहंदी दरवाजा. मग काही अंतरावर येथील सुप्रसिद्ध महाकाली दरवाजा लागतो. या दरवाजाचे आत फत्तेपूर सिक्रीची आठवण करून देणारा दुसरा दरवाजा आहे. किल्ल्याच्या विस्तीर्ण आवारात शक्कर तलाव, धोबी तलावासारखे अनेक तलाव आहेत. गडावर राणीमहाल, पहिलवान बाबाशाह मशीद, बारादरी या ऐतिहासिक वास्तू तसेच तेला-तुपाच्या टाक्या आहेत. बऱ्याच किल्ल्यांवर तुपाच्या टाक्या आढळतात कारण जुने तूप हे घावांच्या (शस्त्रांच्या) जखमांवर रामबाण औषध असते. किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी एक पंचरशी तोफ आहे. जिची लांबी तब्बल २८ फूट आहे. अकोट दरवाजापाशीही २० फूट लांबीची तोफ आहे. गडाच्या सर्वोच्च भागात एक निरीक्षण मनोरा आहे, यावरून आपणास सभोवतालच्या जंगलाचे अवलोकन करता येते. हे सर्व पाहात नरनाळा पायथा (शहानूर) येथील पर्यटक निवासात एक रात्र मुक्काम करावा. जंगलातील ही एक रात्र वेगळा अनुभव ठरते.

नरनाळा पाहून झाला की, गावीलगडाकडे कूच करावे. दाट वनातील सुंदर घाट रस्त्याचा सुखद प्रवास करून आपण सेमाडोहला पोहोचतो. या प्रवासात रानगव्यांच्या, नीलगाईंच्या झुंडी दिसतात. येथे भोजन करावे आणि वेळ असल्यास येथील पर्यटक निवासात एक रात्र अवश्य काढावी. येथून सुमारे ३० किलोमीटरवर आहे विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे पर्यटनस्थळ चिखलदरा. पण या भागात वन्यजीव मुबलक असल्याने सुरक्षिततेसाठी हा घाटरस्ता संध्याकाळी सहा ते सूर्योदयापर्यंत रहदारीसाठी बंद असतो. त्यामुळे वेळेची खबरदारी घ्यावी.
चिखलदरा हे फारशी वर्दळ नसलेले गिरिस्थान आहे. येथे एखादा दिवस आराम करून गावीलगडास यावे. गावीलगड हा चिखलदऱ्याचाच एक भाग आहे. येथे जाताना स्थानिक वाटाडय़ा घेणे मात्र आवश्यक आहे. कारण एक तर किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. तसेच किल्ल्यात दाट जंगल आहे आणि येथे वन्यप्राण्यांचा मुक्त वावरही आहे. किल्ला पाहण्यापूर्वी माहिती वाचून जावी. अभ्यासकांसाठी हा किल्ला पर्वणी आहे. हा किल्ला गवळी राजांनी बांधला आणि त्यामुळे मुळात हा गवळीगड. त्याचा अपभ्रंश होत तो झाला गावीलगड. हा महाराष्ट्रातील बहुधा सर्वात विस्तीर्ण किल्ला असावा.किल्ल्यात आपण प्रवेश करतो दिल्ली दरवाज्यातून. या नंतर दुसऱ्या दरवाज्यापर्यंत एक विस्तीर्ण आयताकृती पटांगण लागते. याच्या नंतर दुसरा दरवाजा लागतो. यानंतर काही अंतरावर तिसरा दरवाजा येतो. या दरवाज्याच्या माथ्यावर असलेल्या शिल्पपटात खजुराचे झाड आणि दोहो बाजूस व्याल दाखवले आहे. पुढील दरवाज्याच्या माथ्यावर प्रचंड आकाराचे गण्ड-भेरुण्ड शिल्पही दाखवले आहे. किल्ल्यावर खूप तलाव आहेत. शक्कर तलावाच्या समोरील मशीद आपल्याला मुल्हेर गडाच्या माचीवरील गणपती मंदिराची आठवण करून देते. किल्ल्यावर अनेक भग्न इमारती आहेत. राणीमहाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीवरील नक्षीदार सज्जा अथवा निरीक्षण कक्ष लाजबाब आहे.
खरेतर हा राणीमहाल नसून राजदरबार असावा. कारण राहत्या वाडय़ाची लक्षणे यात नाहीत. हीच गोष्ट येथे दाखविल्या जाणाऱ्या घोडय़ाच्या पागेची. येथील इमारतींना तळघरेही खूप आहेत. या गडावर नागपूरकर भोसल्यांचा खजिना असे. तसेच येथे तोफा ओतण्याचा कारखानाही होता. आजही गडावर अनेक पंचरशी तोफा आढळतात. किल्ला व्यवस्थित पाहायला सबंध दिवसही अपुरा पडतो म्हणून खाद्यपदार्थ सोबत घेऊनच येथे यावे. येथून आपण परतवाडा, अकोट माग्रे अकोला अथवा शेगाव येथे तीन एक तासात पोहोचू शकतो. येथे रात्रीची रेल्वे पकडून सकाळी मुंबई किंवा पुणे गाठता येते. चार-पाच दिवस हाताशी असल्यास विदर्भातील हे दोन बुलंद किल्ले आणि त्याभोवतालचा निसर्ग पाहता येतो.