जोडून सुट्टी आली, की आमची पावले घरात कधीच ठरत नाहीत. डोंगर भटकंतीचं वेड स्वस्थ बसू देत नाही. पावसाळा असेल तर मग काही विचारायला नकोच! गर्दीचे किल्ले नकोत म्हणून नगर जिल्ह्य़ातील आडवाटेवरचे कुंजरगड, भैरवगड व पेमगिरी सर करायचे ठरले. प्रचंड पावसातच कुंजरगडाच्या पायथ्याशी विहीर गावात उतरलो. वीसतीस घरांची छोटी वस्ती. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती आणि त्यामागे महाकाय हत्तीसारखा पसरलेला कुंजरगड. रात्रीपासूनच पाऊस दणकून कोसळत होता. वातावरण कुंद व ओलसर होते. अशा वेळी गडाची माहिती वाचली असली, तरी वाटाडय़ा घेणे शहाणपणाचे होते. अनेक वर्षे केलेल्या पायपिटीमुळे उमगलेले हे सत्य. वाटाडय़ा मिळाला, त्याने घरीच चहाला नेले. घर म्हणजे कुडाच्या भिंती असलेली दहा बाय बारा फुटांची झोपडी. सतत पडणाऱ्या पावसाने छपरावरील नळ्याच्या कौलांवर गवत उगवलेले. पावसामुळे सात दिवस गावात वीज नव्हती. चुलीच्या अंधूक प्रकाशात शेणाने सारवलेली जमीन, एका कोपऱ्यात खाट व किरकोळ सामान. वाटाडय़ा भाऊंनी बिनदुधाचा (कोरा) चहा दिला.
पावसाच्या दणक्यामुळे सामान गाडीतच ठेवले. सॅकमध्ये पाण्याच्या बाटल्या, प्रथमोपचारचं सामान घेऊन किल्ल्यावर निघालो. चढायला एक तास, किल्ला फिरायला १ तास व उतरायला १ तास. तीन तासांचा मामला होता. जेवायला परत गावातच येऊ  असा विचार करून खायचे सामानही बरोबर घेतले नाही. पण धुवाधार पावसानं सारे अंदाज भरकटवून टाकले. किल्ला पाहून गावात यायला दुपारचे तीन वाजले. गावात आल्यावर समाज मंदिराच्या आडोशाला कपडे बदलले. जिवात जीव आला. जेवणाचे डबे घेऊन वाटाडय़ा भाऊंच्या दारी आलो. मुलांशी गप्पा मारत डबे खातानाच चहा आला. चहा पिऊन निघण्याच्या बेतात असतांना ताईंनी आम्हाला विचारले, ‘आज रक्षाबंधन आहे, अनायासे तुम्ही चार भाऊ  माझ्या घरी आला आहात, तुम्हाला ओवाळले तर चालेल का?’ अनपेक्षित प्रश्नाने अवाक झालो, गोंधळून गेलो. कसाबसा होकार दिला. ताईंनी ताट सजवले, आम्हाला टिळा लावला, राखी बांधली आणि ओवाळले. निरंजनच्या अंधुकशा प्रकाशात ताईचा चेहरा ओझरता पाहिला. ओवाळल्यावर क्षणभर शांतता पसरली. आम्हाला सतावणारा प्रश्न, ओवाळणी काय द्यायची. पावसामुळे पाकिटंसुद्धा गाडीत होती. डोळ्यासमोर लहानपणीचे रक्षाबंधनाचे प्रसंग झरकन आले. रक्षाबंधन म्हटले, की बहिणी ओवाळणार, मग आईबाबांनी दिलेल पैशाचे पाकीट किंवा भेटवस्तू तिला द्यायचे, म्हणजे समारंभ पार पडला. मग वर्षभर तिच्याशी भांडाभांडी, मारामारी केली तरी काही फरक पडत नाही. पुढे बहिणी मोठय़ा झाल्या, सासरी गेल्या. काही वर्ष उत्साहाने रक्षाबंधनाला त्यांच्याकडे जायचो, आता दोघांनाही वेळ नसतो. आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलावल्या. अंधाराचा फायदा घेऊन चेहऱ्यावरचे भाव न दाखवता ‘निघतो’ एवढेच शब्द उच्चारून आम्ही घराच्या बाहेर पडलो. पण मन अस्वस्थ होते. गाडीजवळ आल्यावर सॅकमधून पाकीट काढून ओवाळणीची रक्कम गोळा करून ताईला दिली आणि अस्वस्थ मन शांत झाले.
शहरात वाढलेल्या आमच्या मनाला अशी अकृत्रिम, कुठलीही अपेक्षा नसलेली नाती असतात याचाही विसर पडत चालला आहे, याची प्रकर्षांने जाणीव झाली. या घटनेला आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पुन्हा काही विहीर गावात जाणे झाले नाही. गेलेल्या काळाबरोबर निरंजनच्या अंधुकशा प्रकाशात ओझरता पाहिलेला ताईचा चेहरा पण धूसर झाला. नशिबाने एकच गोष्ट माझ्याकडे शिल्लक आहे ती म्हणजे एका ताईने डोंगरभाऊला बांधलेली राखी. ती आजही जपून ठेवली आहे.
संपूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी – http://samantfort. blogspot.in/2012/10/blog-post_31.html