भंगारातील सामानाला किती किंमत मिळते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण अनेकदा काही वस्तू जपून ठेवतो. त्यांची प्रचंड काळजी घेतो. या जुन्या वस्तूंमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. या भावनांचे मोल काही पैशात करता येत नाही. मात्र कधीकधी या वस्तू घरात अडगळ ठरु लागतात आणि त्यांची रवानगी भंगाराच्या दुकानात होते. तिथे या वस्तूंना फारशी किंमत मिळत नाही. मात्र इंग्लंडमधील एक व्यक्ती घरातील एक जुनी वस्तू विकून मालामाल झाला आहे.

इंग्लंडमधील चेशायरमध्ये राहणारी एक व्यक्ती घरात सापडलेले एक जुने आणि तुटलेले घड्याळ विकायला गेला होता. या घड्याळाचे ५०० पाऊंड मिळतील, अशी अपेक्षा संबंधित व्यक्तीला होती. यापेक्षा जास्त रकमेची अपेक्षा बाळगणे मूर्खपणाचे ठरेल, असे या व्यक्तीला वाटले. मात्र प्रत्यक्षात या व्यक्तीकडे असलेले जुने आणि तुटलेल्या अवस्थेतील घड्याळ तब्बल ५५,००० पाऊंडांना विकले गेले. यामुळे घड्याळ विकणाऱ्या व्यक्तीला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला.

तुटलेल्या अवस्थेत असलेल्या घड्याळाला इतकी मोठी किंमत मिळण्यामागे एक ऐतिहासिक कारण असल्याचे ब्रिटिश व्यक्तीला घड्याळ्याच्या विक्रीनंतर समजले. घड्याळ विकणाऱ्या व्यक्तीला वडिलांच्या घराची साफसफाई करताना जुने घड्याळ सापडले होते. हे घड्याळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटलीच्या नौदलातील पाणबुड्यांनी वापरले होते. त्यामुळेच ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेले हे घड्याळ विकल्यानंतर ब्रिटिश व्यक्तीला तब्बल ५५,००० पाऊंड म्हणजेच ५२ लाख ७१ हजार ५८४ रुपये मिळाले.

इटालियन कंपनी पेनेरायने तयार केलेल्या या घड्याळाला विक्री करताना पट्टा नव्हता. यासोबतच या घड्याळातील यंत्रणादेखील बंद पडली होती. मात्र तरीही हे घड्याळ ५५,००० पाऊंडांना विकले गेले. या घड्याळाचा लिलाव ४६००० पाऊंड रकमेपासून सुरू झाला. मात्र लिलाव जिंकणाऱ्या व्यक्तीने या घड्याळासाठी ५५,००० पाऊंड मोजले. या घड्याळाची निर्मिती १९४१ ते १९४३ दरम्यान करण्यात आली होती. लिलाव करण्यात आलेले घड्याळ वॉटरप्रूफ असून यामध्ये अंधरातही वेळ पाहता येते. या घड्याळाचा वापर रॉयल इटालियन नौदलाच्या पाणबुड्यांकडून केला जायचा.