उत्तर प्रदेशात सर्वच प्रमुख पक्षांच्या आज सभा झाल्या. अखिलेश यादव, अमित शाह आणि मायावती यांची आज सभा झाली.  भारतीय जनता पक्षाला नोटाबंदीची आणि समाजवादी पक्षाला त्यांनी केलेल्या गुंडगिरीची या निवडणुकीत किंमत मोजावी लागेल असे विधान बसपच्या प्रमुख मायावती यांनी केले. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या त्रासात भर पडली असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागणार आहे असे मायावतींनी म्हटले. तर, लोक अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या गुंडगिरीला त्रस्त झाले आहे. त्याची किंमत देखील समाजवादी पक्षाला मोजावी लागणार आहे असे त्या म्हणाल्या.

त्यांनी अखिलेश यादव यांना ‘बबुआ’ असे म्हटले. ‘बबुआ’ जे काही बोलतात त्यामुळे भारतीय जनता पक्षालाच फायदा होत आहे असे त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षाने केलेल्या विधानांना उत्तर देऊ नये असे त्या म्हणाल्या. बसपचे जेव्हा सरकार होते त्यावेळी आम्ही कधीच कुणासोबत भेदभाव केला नाही असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी हे खोटे आरोप करत असल्याचे त्या म्हणाल्या. जर गावात दफनभूमी असेल तर स्मशान देखील असावे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्या विधानावरुन त्यांनी परत एकदा मोदींवर टीका केली. हिंदू प्रथेनुसार गावाच्या तीन किमी दूर हे स्मशान असते. तेव्हा मोदींनी हा मुद्दा काढायची गरज काय होती असे त्या म्हणाल्या.

याआधी, उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्ष प्रभाव टाकण्यास असमर्थ ठरला आहे. त्यामुळे ते घाबरुन गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडणुकीमध्ये जात-पात, धर्माचा उल्लेख केल्याचे मायवतींनी म्हटले होते. गेल्या तीन चार दिवसांमध्ये पंतप्रधानांनी अनेक चुकीची वक्तव्ये केली आहेत असे मायावती म्हणाल्या. ज्या वेळी बहुजन समाज पार्टी सत्तेमध्ये होती त्या वेळी आम्ही कधीही कुणावर भेदभाव केला नाही असे त्या म्हणाल्या. आमच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली होती. आम्ही हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव केला नसल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा उल्लेख करुन धार्मिक भेदभावास सुरुवात केल्याचे मायावतींनी म्हटले. उद्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये मतदान होणार आहे.