सध्या टीव्हीवर चालू असलेल्या दोन मराठी मालिका उत्तम व उत्सुकता वाढविणाऱ्या असल्या तरी त्यातील काही गोष्टी मला खटकतात.

माझ्या नवऱ्याची बायको

ही मालिका झी मराठीवर चालू असून यातील नायक सुभेदार आपल्या सुशील व मनमिळावू पत्नीला गावंढळ ठरवून ऑफिसमधल्या शनाया नावाच्या  तरुणीवर जीव टाकीत प्रेम करताना दिसतो आणि शनायाही याला वाटेल तशी नाचवीत असते. ऑफिसमध्ये काम करताना दिसत नाही. त्याबद्दल इतर अधिकाऱ्याने झापले तर जय आपल्याला प्राप्त झालेल्या उच्चाधिकाराचा वापर करून तिला पाठीशी घालतो. तीसुद्धा याच्या पागलपणाचा फायदा घेते. आपण एका विवाहित गृहस्थावर प्रेम करतो आणि जय आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आपल्याशी विवाह करेल अशा भ्रमात ती असते. आणि या दोघांचे प्रेमप्रकरण ऑफिसातील सर्वाना माहीत असते.

गुरुची बायको राधिका उत्तम सुगरण असून ती नेहमी गुरुची मर्जी सांभाळण्याची पराकाष्ठा करते. तिच्या स्वभावातील वाटणारा दोष म्हणजे अतिचांगुलपणा. त्यामुळे कोणालाही मदत करायला धावणे हा तिच्या स्वभावाचा स्थायीभाव. शेजारच्या नानाजींना हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी त्यांचा मुलगा व सून बाहेरगावी गेले असल्यामुळे राधिका आपल्या सोन्याच्या बांगडय़ा गहाण टाकून त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसा उभा करते आणि दुसऱ्या एका शेजाऱ्याची कामवाली बाई आली नाही म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांचा स्वयंपाक करून देते हे आजच्या काळात न पटणारे आहे (कारण कामवाली बाई आली नाही तर ज्येष्ठ नागरिक फोन करून हॉटेलमधून भोजन मागवू शकतात.) हाच तिचा अतिचांगुलपणा, ऑफिसात उच्चपदावर असलेल्या गुरुला पटत नाही त्यामुळे तो राधिकेला घालून-पाडून बोलत असतो व गावंढळ म्हणून संभावना करतो.

तिची दूरदर्शनवरील मैत्रीण रेवती हे सर्व पाहात असते. आणि गुरुला धडा शिकविण्याच्या हेतूने ती ‘विवाहबा संबंध’ या विषयावर गुरुलाच मुलाखतीला बोलावते. विषय मात्र तो आल्यानंतर जाहीर करते. पण अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना आपले विवाहबा संबंध नसून आपले पत्नीवर अतिशय प्रेम असल्याचे सांगतो. हे ऐकताच प्रेक्षकांत बसलेली शनाया रागाने उठून निघून जाते. आणि प्रेक्षकात बसलेली राधिका तिला विचारलेल्या प्रश्नाला ‘गुरु असं काहीच करणार नाही असा आपला गाढ विश्वास आहे’ असे सांगते. रेवतीने भरलेला बार फुकट जातो.

शनायाला खूश ठेवण्यासाठी गुरु अनेक गोष्टी करतो. ऑफिसात नवागत मनीषने लॅपटॉपवर तयार केलेले प्रेझेन्टेशन उशिरा बसून गुरुने आपल्या कॉम्प्युटरवर घेऊन लॅपटॉपवरचे पुसून टाकणे व नंतर ते शनायाला वाचायला देणे, दुसऱ्या दिवशी मीटिंगच्या वेळी मनीषला त्याचे प्रेझेन्टेशन वाचायला सांगणे, पण त्याच्या लॅपटॉपवरचा मजकूर पुसून टाकल्यामुळे मनीष शरमिंदा होणे व गुरुने त्याला झापणे व शनायाला ते सादर करण्यास सांगणे. तिनेदेखील गुरुने तिला दिलेल्या कागदावरून पाठ केल्याप्रमाणे सादर करणे. तिच्याविषयी सर्वाचे असलेले कामचुकारपणाचे मत बदलावे म्हणून गुरु ही खेळी खेळतो.

गुरु आणि राधिका यांच्या लग्नाचा वाढदिवस ज्या दिवशी असतो त्याच दिवशी ऑफिसची एक कॉन्फरन्स लोणावळ्याला ठेवलेली असते. कॉन्फरन्सनंतर एक रात्र शनायाबरोबर हॉटेलात राहून घालवायची असा बेत गुरुने आखणे त्याच वेळी एका सहकाऱ्याने राधिकेला विवाहदिनाच्या शुभेच्छा देऊन तिने त्यांच्या गाडीतून लोणावळ्याला येण्यासाठी उद्युक्त करणे (गुरुबरोबर कॉन्फरन्सनंतर वाढदिवसाची एक रात्र मजेत घालवता येईल असे आमिष दाखवून) व तिला ऑफिसच्या गाडीतून लोणावळ्याला नेणे, लोणावळ्याला संध्याकाळी सर्व सहकाऱ्यांनी जय व राधिकेचा विवाह दिनानिमित्त छोटासा सोहळा करणे, त्यामुळे शनायाचा जळफळाट होणे आणि गुरुचा विरस होणे त्यामुळे त्याच दिवशी रात्री त्याला राधिकेला व शनायाला घेऊन घरी यावे लागते.

गुरुचा शनाया विषयीच्या पागलपणाचा कळस म्हणजे तिच्याशी विवाह करण्यासाठी राधिकाने घटस्फोट द्यावा म्हणून तो वकिलाचा सल्ला घ्यायला जातो व संबंधित पेपर्सही तयार करून घेतो.

आपल्या सुशील पत्नीला गावंढळ ठरवून शनायाबरोबरचे प्रेम प्रकरण सतत दाखविणे हीच सर्वात खटकणारी गोष्ट आहे या मालिकेतली.

सहज सुचलं म्हणून – गुरुचे शनायाबाबत अतिपागलपणाचे विविध प्रसंग आणि रेवती, गुप्ते, शनायाची बहीण यांचे हे प्रेमप्रकरण राधिकेला समजावं म्हणून चाललेले प्रामाणिक प्रयत्न पुन्हा पुन्हा दाखविणे हे मालिका वाढविण्यासाठीच असाव्यात असे वाटते. कारण शनायाची  मैत्रीण तिच्याच घरांत चाललेला गुरु – शनायाचा रोमान्स राधिकेला पाहता यावा म्हणून स्वत:च्या चावीने ब्लॉकचं दार उघडून ठेवते, पण त्याऐवजी त्याच वेळी दाराच्या फटीतून मोबाइलवर फोटो घेऊन ठेवता आला असता पुरावा म्हणून. किंवा गुरु आपल्या वडिलांना घाबरून असतो ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन फोनवरून त्याच्या वडिलांना बोलावून घेता आले असते.

अस्सं सासर सुरेख बाई

ही कलर्स मराठीवर सुरू असलेली मालिका. यात पृथ्वी इंडस्ट्रीजचे मालक पृथ्वीराज इनामदार यांची धाकटी मुलगी जुई हिचे आणि त्याच ऑफिसात काम करणाऱ्या यश महाजन यांचे प्रेम जमते. आपल्या मुलीचे एका चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाबरोबर लग्न व्हावे हे पटत नसले तरी ते मुलीच्या खुशीसाठी त्यांचे लग्न लावून देतात.

पण मग त्यांच्या कटकारस्थानाला सुरुवात होते. ते यशच्या काका-काकींना ऑफिसात बोलावून घेतात व समजावतात की तुम्हीही एका मुलीचे वडील आहात तेव्हा माझ्यासारख्या बापाचे दु:ख समजून घ्या. माझी लाडकी मुलगी जुई आमच्या प्रशस्त बंगल्यात वाढल्यामुळे तिला चाळीत राहणे किती कष्टप्रद होत असेल, हे मुलीचा बाप म्हणून मला सहन होत नाही. अशी सुरुवात करून जुई सहा महिन्यांत परत आमच्या घरी येईल असे काहीतरी करा असा प्रस्ताव मांडतो. काका-काकींना हा प्रस्ताव मान्य नसला तरी पृथ्वीराजच्या मोठेपणाचे दडपण येऊन ते दोघे विरोध करू शकत नाहीत, त्यामुळे पृथ्वीराज त्यांची संमती गृहीत धरतात आणि कारणपरत्वे जुईच्या घरी जातात तेव्हा चाळीतील गैरसोयीचा सतत उल्लेख करून काका-काकूकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहतात.

वास्तविक जुईचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे तिला यशच्या कुटुंबातील एकोपा आणि खेळीमेळीचे वातावरण फार आवडते, त्यामुळे तिची यशबरोबर राहण्यासंबंधी काहीच तक्रार नसते म्हणून पृथ्वीराजच्या प्रस्तावासाठी काकी जेव्हा जुईला घालूनपाडून बोलते व नसलेल्या चुका दाखवते तेव्हा जुईला आश्चर्य वाटते, पण ती त्यांच्या वयाचा मान राखून त्यांना उलट उत्तरे देत नाही. काकूही मग मनाविरुद्ध केलेल्या वर्तनाबद्दल तिची क्षमा मागते.

समाजात सर्व सासरे जावयाचा मान राखत असतात. त्यामुळे पृथ्वीराज आपल्या जावयाविरुद्ध कटकारस्थाने करतो ही गोष्ट खटकते. पृथ्वीराजच्या घरात दोन मुली त्याच्याबरोबर राहात असतातच. मग जुईनेही त्याच्याबरोबर राहावे ही इच्छा कशासाठी? मोठेपणाच्या भ्रामक कल्पनेमुळे यशच्या कुटुंबीयांना त्रास देताना ते स्वत: पृथ्वीराज आणि त्यांची मोठी मुलगी विभा दिसतात.

विभाचे वर्तन तद्दन खलनायकीच आहे. तिची वृत्ती दुसऱ्यावर हुकमत गाजवणारी आहे. तिचे पहिले प्रेम अयशस्वी झाल्यानंतर ती यशवर प्रेम करू लागते, कारण यश व जुई यांचे प्रेम कुणालाच माहीत नसते. त्यामुळे विभा यशवर प्रेमाची पखरण करू लागते, पण विभा हुकमत गाजवणारी बॉस असल्यामुळे यशकडून कसलाच प्रतिसाद मिळत नाही. पण विभा त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त करते. बाहेरगावी गेलेले पृथ्वीराज परत येण्यापूर्वी आपण रजिस्टर विवाह करू. वेगळे बिऱ्हाड करून प्रशस्त ब्लॉकमध्ये स्वतंत्र राहू असा प्रस्ताव मांडते. एकत्र कुटुंबात राहिलेला यश तो स्पष्टपणे नाकारतो आणि आपले तिच्यावर प्रेम नसल्याची जाणीवही तिला देतो. तेव्हापासून ती त्याच्याविरुद्ध कटकारस्थाने करू लागते. जुईचे आणि यशचे प्रेम व त्यानंतर त्यांचा झालेला विवाह, याामुळे ती जास्त बिथरते. यश मुंबईत नोकरी न मिळाल्याने बेकार राहण्यापेक्षा पुण्याच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत टॅक्सी ड्रायव्हरची नोकरी करू लागतो. तेव्हा विभा त्या कंपनीच्या मालकाला पूर्वी यशने ड्राइव्ह करताना अ‍ॅक्सिडंट केल्यामुळे तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे असे खोटेनाटे सांगते, त्यामुळे तो मालक यशला तडकाफडकी काढून टाकतो.

तसेच यश व जुई घरात नसताना खोटी आपुलकी दाखवत यशच्या घरी जाणे, यशच्या काकींना मध्यमवर्गीय राहणीबद्दल टोमणे मारणे, इतकेच नव्हे तर त्यांचे कपडे व आपल्या वस्तू भरभर खाली फेकून जुईसाठी नवीन कपाट घेण्यास उद्धटपणे सुचविणे या गोष्टी खटकतात, कारण कोणतीही स्त्री कितीही दुष्ट असली तरी दुसऱ्याच्या घरात घुसून कपाट उघडण्याइतकी आक्रमक होणार नाही आणि विभासारखी इंडस्ट्रीत उच्च पदावर असलेली बाई अशी अवास्तव आक्रमक लेखकाने किंवा दिग्दर्शकाने का दाखवावी?

मुंबईत नोकरी मिळत नाही म्हणून यश पुण्याला नोकरीसाठी जातो म्हटल्यावर यशचे काका- काकू, आई, हेमा ही मंडळी अस्वस्थ होतात आणि त्यांच्या नाराजीमुळे होणाऱ्या चर्चा सतत चालणे, जुईनेही आपली छान चाललेली वरिष्ठ पदाची नोकरी सोडून यशबरोबर पुण्याला जाण्याची तयारी दाखवणे म्हणजे जणू काही यश परदेशी जात आहे असे वाटते.

वास्तविक आज पुणे मुंबई एकमेकांची परसदारे झाली आहेत. पुण्याचा माणूस नोकरीसाठी मुंबईत गेला तरी तो रोज पुणे-मुंबई-पुणे असा जाऊ शकतो. तीच गोष्ट यश करू शकेल. निदान शनिवार-रविवार आठवडय़ातून एकदा घरी येऊ शकेल. शिवाय यशचा मिळणारा पगार घरालाच उपयोगी पडणार हेही चेहरे लांब करून बसलेल्या मंडळींना कळत नाही आणि घर गहाण टाकून सर्वानी पुण्याला जावे हा विचारही खटकतो.

मात्र नंतर यश पुण्याला जाणार म्हणून सगळी मंडळी देवळात नमस्कारासाठी येतात तेव्हा पृथ्वीराज व विभा हेही तेथे येतात. त्या वेळी यश सर्वाना कोणीही पुण्याला येण्याची व राहते घर गहाण टाकण्याची गरज नाही, कारण दुसरी चांगली नोकरी मुंबईत मिळेपर्यंत आपण पुण्यात नोकरी करणार सांगितल्यावर दूरदर्शनच्या प्रेक्षकांना वाटते की वरील खटकणाऱ्या गोष्टी फक्त मालिका वाढविण्यासाठीच असाव्यात इत्यलम.
रामचंद्र नाडकर्णी – response.lokprabha@expressindia.com