‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून’ या सदरातील रझिया पटेल यांचा ७ ऑक्टोबरचा ‘अभी लडाई जारी हैं’ हा लेख मनोज्ञ व सर्वच समाज कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. त्यांनी आपल्या तीन दशकांतील मुस्लीम समाज परिवर्तन चळवळीतील कामाचा काढलेला निष्कर्ष निश्चित मार्गदर्शक आहे. मुस्लीम स्त्रियांचा प्रश्न आणि त्यांची सोडवणूक याकडे सुटेपणाच्या चष्म्यातून न पाहता एकूण भारतीय समाजाचा एक घटक आणि त्यास असणारे राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतले पाहिजेत.

या समस्येचे मूळ पुरुषी अहंकार, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती आणि विवाहाबाबतचे मुस्लीम वैयक्तिक कायदे यात आहेत. याकडे लक्ष दिल्यास रझिया पटेल यांच्या मताचे स्वागत व्हावे.

कित्येकांची कमालीची धार्मिक सश्रद्धा, वैचारिक एकलकोंडेपणा आणि धेटो पद्धतीची कूपमंडूक वृत्ती हे घटक मुस्लीम समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. प्रक्षोभक, अतिरेकी, धार्मिक विचारांना धक्का न लावतासुद्धा समाज सुधारता येतो, पाण्यात राहून माशाशी वैर नको हेच खरे. मुस्लीम सामाजिक कार्यकर्ते मूलतत्त्ववाद्यांविरोधात लढण्यात निष्प्रभ ठरले. ही वस्तुस्थिती घटकाभर मान्य केली तरी त्यामुळे रझिया पटेलसारख्या अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी हतबलता व्यक्त करू नये. एखाद्या नाजूक व संवेदनशील प्रश्नावर सामाजिक घुसळण होणे हे आवश्यक ठरते. त्यातूनच प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने एक अनुकूल समाजमन व मताला अंकुर फुटतो.

रझिया पटेल यांनी तीन दशके आंदोलनात काम करूनही त्यांना धोरणकर्ते आणि आप्तेष्ट, मुल्ला-मौलवी आणि पुरुषी अहंकाराविरुद्ध दबाव टाकणारी निष्ठावंतांची फळी उभारता आली नाही हे त्यांच्या व आमच्यासारख्या मुस्लीम समाजसेवकांचे दुर्दैवच म्हणायला हवे.

वंचितांना न्याय व शांती मिळण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या एकत्रित लढय़ात परिवर्तनवादी समाज कार्यकर्त्यांत धर्मापलीकडे नव्हे तर संविधानसम्मत धर्मनिरपेक्ष चौकटीतील समन्वयवादी व समतोल आणि समावेशक आचारसंहिता निर्माण करण्याची आज खरी गरज आहे.

– प्रा. डॉ. के. जी. पठाण, पुणे

 

वृद्धांमधील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’

‘वृद्धसंख्या-वाढ : एक संधी’ हा ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. वृद्धांमध्ये ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन ठळक वर्ग आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर करून घेण्याची गरज आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे ‘मुलाला परदेशात लठ्ठ पगाराची नोकरी मिळाल्याच्या अभिमानाचे काही वर्षांनी हताशपणात रूपांतर होते आहे’ हे खरे आहे. जागतिकीकरणाची आणि परदेशवाऱ्यांची नवलाई ओसरल्यावर अनेक वृद्धांना आता परिस्थितीचे आकलन होऊ  लागले आहे. जागतिकीकरणाचे ‘घी दिसले, पण बडगा नाही’ अशी स्थिती आता उरलेली नाही. परदेशी शासकांच्या बदलत्या धोरणांमुळेच तो देश सोडावा लागला नाही तर आपली मुले काही परत येणार नाहीत याची त्यांना जाणीव आहे. शहरात राहून खेडय़ातील वृद्ध पालकांची काळजी घेणे आणि हेच परदेशातून करणे यांत खूप फरक आहे. सुदैवाने अशा परदेशस्थ मुलांच्या हाती बऱ्यापैकी पैसे आहेत आणि ते आपल्या पालकांच्या वृद्धापकालीन गरजांकरिता खर्च करण्याची त्यांची तयारी आहे. ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था ‘नाही रे’ वर्गातील निराधार वृद्धांना आसरा देतात त्यांनी अशा ‘आहे रे’ वर्गातील वृद्धांना उत्तम सुखसोयी भरपूर मोबदला घेऊन द्याव्यात आणि त्या पैशाचा विनियोग इतर वृद्धांच्या किमान गरजा भागवण्याकरिता करावा. परदेशी मुलांच्या (परदेशी असण्यामुळे निर्माण होणाऱ्या) गरजांची जाणीव ठेवून काही योजना कल्पकतेने राबवल्यास पैशाची कमतरता तिथे भासणार नाही. केवळ लोकांच्या दातृत्वावर अवलंबून न राहता समाजसेवेला उद्योगाची जोड दिल्यास त्यात अनेकांचा फायदा साधता येईल असे वाटते.

– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

 

सकारात्मक विचार ठेवा

७ ऑक्टोबरच्या अंकात सुहास पेठे यांचा ‘अनिश्चितता’ हा सुरेख लेख वाचण्यात आला. त्यात आयुष्यात अनिश्चितता वेगवेगळ्या प्रकारे डोक्यावर टांगती तलवार बनून राहिलेली दिसून येते. अनिश्चतता म्हणजे एक प्रकारे नकारात्मकताच होय. मनात सकारात्मक विचार असले की कोणत्याही प्रकारची अनिश्चितता राहत नाही. याबाबत चांगला अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही मार्च व एप्रिल २०१७ या महिन्यांत पंधरा दिवसांच्या युरोप टूरला गेलो होतो. तेथील हवामान अतिशय अनिश्चित आहे, दररोज पाऊस केव्हाही कसाही पडतो. तेव्हा छत्र्या बरोबर ठेवा असे टूर नेणाऱ्यांनी सांगितले होते व तेथेही दररोज आठवण देत होते. आमचा ४०-४५ जणांचा ग्रुप होता. त्यांनी छत्र्यांची आठवण केली की त्यांना आम्ही सर्व जण सांगत होतो की, काहीही पाऊस येणार नाही, आपण सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहणार आहोत. त्याचा परिणाम असा अनुभवला की, सकाळी बसमध्ये बसताना पाऊस असला तरी इच्छित ठिकाणी पोहोचलो की पावसाचा मागमूसही नसायचा. असे पंधरा दिवस अनुभवले. त्यांनी सांगितले की, आमची ही पहिली टूर आहे, ज्यात पावसामुळे ठिकाण पाहता आले नाही असे अजिबात घडले नाही.

– मनोहर तारे, पुणे

 

दुर्लक्षित मंदिरं

‘गंगाकाठची वाराणसी’ या ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात विमला पाटील यांनी सारनाथचा उल्लेख केला आहे. ‘सारनाथ’ हे नाव ज्याच्या नावावरून पडलं ते काळ्या घडीव दगडांत बांधलेलं सुबक लहानसं शिवालय बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाच्या स्थानापासून जवळच आहे. प्रथेप्रमाणे शिवालयासमोर एक तलावही आहे. प्रवचनाच्या स्थानाचं ‘वैश्विकीकरण’ (तिथे अनेक देशांनी आपापल्या पद्धतीचे स्तूप बांधले आहेत.) झाल्यामुळे दुर्दैवाने शिवालयाकडे दुर्लक्ष होऊन त्याची दुर्दशा झाली आहे. बहुतेक पर्यटकांना ही गोष्ट माहीतही नसेल.

अशीच आणखी एक वास्तू आहे गढवाल, उत्तराखंडमधल्या लक्ष्मण मंदिराची. इथे वासुकीरूपात लक्ष्मणाने तपश्चर्या केली होती अशी आख्यायिका आहे. हेमकुंडसाहिब नावाचा गुरुद्वारा तिथे बांधल्यापासून सुंदर तळ्याकाठच्या लक्ष्मण मंदिराकडे दुर्लक्ष होऊ  लागलं.

– मुकुंद गोपाळ फडके, मुंबई</strong>