वास्तुपुरुष गेला पंधरवडाभर सुंदरवाडीतील शहरीकरणाकडे वळलेल्या परिसराच्या पाहणीत गुंग होता. तिथला अस्ताव्यस्त ‘विकास’ पाहत असतानाच परिसरातील नरेंद्र डोंगरातील जैवविविधता, आंबोलीलगतच्या सह्य़ाद्रीच्या पश्चिम उतारांवरील वनं, त्या डोंगरदऱ्यांतून वाहणारे झरे, डोंगर-पठारांवरील काप, सखल प्रदेशातले छोटे पाणवठे, अधूनमधून विखुरलेल्या आमराया, फळांच्या बागा, भातशेती, कौलारू-चिरेबंदी प्रशस्त मंदिरं, मिलागरी, वाडे हे सर्व मनाला प्रसन्नता देत होते. रोज संध्याकाळी मोती तलावाच्या किनारी बसून या शहराची सुंदर स्वप्नं बघणं हा त्याचा नित्यक्रम झाला होता. आजही तो याच विचारात दंग होऊन तलावातील नितळ पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या ऐतिहासिक राजवाडय़ाच्या प्रतिमेकडे एकटक बघत इतिहासात हरवून गेला होता. अचानक कवडय़ा-धीवर पक्ष्याच्या तारस्वरातल्या हाकेने तो दचकला आणि समोरच त्या चपळ पक्ष्याने पाण्यात अचूक सूर मारून केलेल्या छोटय़ा माश्याच्या शिकारीचं कौतुक करायला लागला; पण त्याचं लक्ष पुन्हा वळलं पाण्याकडे. धीवराने सूर मारलेल्या जागेपासून अगणित जलतरंग उमलत होते, हलकेच किनाऱ्याकडे वाहत होते, संपूर्ण तलाव व्यापून टाकत होते. त्या जलतरंगांच्या हेलकाव्यात राजवाडय़ाचं प्रतिबिंब हेलकावत होतं, तरीही स्थिर होण्याचा प्रयत्न करत होतं, वादळवाऱ्यात सापडलेल्या होडीसारखं. अस्तित्वासाठी झगडणारा हा ऐतिहासिक राजवाडा या सुंदरवाडी शहराचंच प्रतीक आहे असा भास वास्तुपुरुषाला झाला.

सुंदरवाडी शहराला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. पश्चिमेच्या बाजूने नरेंद्र डोंगराने या शहराला कवेत घेतलं आहे, तर पूर्वेकडील सह्य़ाद्री पर्वताचे उतार या शहराची पाठराखण करत आहेत. या सभोवतालच्या जंगलांनी मधल्या सखल प्रदेशातील शहराच्या नैसर्गिक पाणीपुरवठय़ाची काळजी घेतली आहे. सुरुवातीचं टुमदार संस्थान आता बऱ्यापैकी मोठं शहर बनलं आहे, कोकण रेल्वेमुळे भरभराटीला येत आहे. शहराचा पसाराही वाढतो आहे. मुंबई-गोवा महामार्ग आता शहराला बगल देऊन नरेंद्र डोंगराच्या पल्याड, रेल्वे स्थानकाजवळून वळता झाला आहे. या महामार्गालगत आता अनियंत्रित ‘विकास’कामं सुरू झाली आहेत. उत्तरेला व पूर्वेलाही शहराचा आवाका आता सह्य़ाद्रीच्या पायथ्यापर्यंत पोहोचला आहे. एक बरं आहे, प्रमुख ‘विकास’कामं ही रहिवासी व पर्यटन स्वरूपाची आहेत, प्रदूषणयुक्त नाहीत; पण या ‘विकास’कामांत संतुलित नियोजनाचा अभावच आहे. जुनं शहर घनदाटपणे, अस्ताव्यस्त पसरलं आहे, मधल्या सखल भागात, राजवाडय़ाच्या पश्चिमेला, बाजारपेठेच्या सभोवती. बाजूला आहेत जुन्या वाडय़ा, हिरव्यागार, पण आता पसरत चाललेल्या. शहराचा आर्थिक कणा आहे व्यापार  आणि पर्यटन. सुंदरवाडी रंगीत लाकडी खेळण्यांसाठी, कलाकृतींसाठी, चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध; पण प्रमुख व्यापारकेंद्र हे पंचक्रोशीसाठी; बेळगाव, कोल्हापूर, निपाणी, गोवा येथून येणाऱ्या/जाणाऱ्या मालासाठी. ही बाजारपेठ आणि सभोवतालचा व्यापारी परिसर सतत गजबजलेला, कचऱ्याने व सांडपाण्याने बरबटलेला, वाहतुकीने अडवलेला असतो. आजूबाजूचे रस्ते अरुंद आणि पदपथविरहित. त्यातच फेरीवाल्यांचं अतिक्रमण. बस स्थानक हा सर्वात महत्त्वाचा भाग तसा प्रशस्त, पण अगदी गचाळ, प्रसाधनगृहाच्या तर जवळपाससुद्धा जायला नको. प्रवाशांना स्थानकावरून शहरात जायचं म्हणजे बेशिस्त वाहतुकीच्या गजबजाटातून जीव मुठीत धरूनच जायला हवं. अपंग, ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया यांची स्थिती तर अतिहतबल. त्यातल्या त्यात मोती तलाव हेच शहरातलं एक विसाव्याचं ठिकाण! तलावातले तरंग आता स्थिरस्थावर झाले होते, परिसराची प्रतिबिंबं पुन्हा नितळ पाण्यात उमटू लागली होती. वास्तुपुरुषाला त्यातच आदर्श सुंदरवाडीचे आराखडे दिसायला लागले. तलावावर आभोळ्यांचे थवे घिरटय़ा घालत कीटकांची हवेतच शिकार करत होते. त्यातला एक छोटा थवा अचानक उच्चस्वरात चिरपायला लागला. वास्तुपुरुषाने वर आभाळात पाहिलं आणि तो हसत उत्तरला, ‘‘चला निसर्गदूतांनो, दाखवा वाट उपराळकर देवराईची.’’ आभोळ्या खुशीत, हवेत तरंगत, विहरत, चिरपत निघाल्या वाघेरीच्या दिशेने आणि वास्तुपुरुषानेही त्यांचा पाठलाग सुरू केला एका आवेगाने. सूर्य अस्ताला निघाला होता, पण येणाऱ्या वैशाखाच्या उष्ण झळा आताच सुरू झाल्या होत्या जमीन तर चांगलीच तापली होती. आद्र्रता हवेत भिनली होती. पश्चिम क्षितिज जांभळटसर, नारिंगी ढगांनी व्यापत चाललं होतं, येऊ घातलेल्या अवकाळी पावसाची चाहूल देत होतं. आभोळ्यांच्या चिरपाईच्या मागोव्यावर वास्तुपुरुष जंगलात शिरला आणि नवपालवीच्या सुगंधात हरवून गेला, नकळत उंबराकडे पोचलासुद्धा. उपराळकर देवचार वाटच बघत होता, ‘‘सुस्वागतम् वास्तुपुरुषा! ते बघ, धनेश कुटुंब तुझी वाट पाहात आहे त्या वटवृक्षावर. चल, या आमच्या झऱ्यातल्या अमृताने ताजातवाना हो आणि सुरू कर तुझी आदर्श शहरांची कहाणी!’’

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

वास्तुपुरुष उंबर-झऱ्याच्या शीतल पाण्याच्या हबक्यांनी उत्साहित झाला, ‘नमस्कार देवा महाराजा! तुझ्या उत्तेजनाने आणि इथल्या निसर्गवैभवाच्या संगतीत गेला पंधरवडा कसा आनंदात गेला, अनेक नवविचारांनी मन बहरून गेलं आहे. सुंदरवाडीच्या मोती तलावाने तर आदर्श शहरांची अनेक प्रतिबिंबे उमटवली आहेत. सांगतो तुला माझे आदर्श शहरासंबंधीचे विचार.’

देवराईतील निर्झराच्या अमृततुल्य पाण्याचे दोन घोट घेऊन, एक दीर्घ श्वास घेऊन वास्तुपुरुषाने सुरुवात केली, ‘देवचारा, मी सुंदरवाडी हे शहर उदाहरणासाठी घेऊन आदर्श शहराचा ढोबळ सर्वागीण आराखडा प्रथम मांडतो. हाच आराखडा काही स्थानिक, समर्पक बदल करून इतर शहरांच्याही पर्यावरणीय धोरणात्मक संरचनेसाठी वापरता येईल. आपण सुरुवात करू शहराच्या विकासाशी निगडित काही महत्त्वाच्या घटकांचं सिंहावलोकन करून. शहराची लोकसंख्या, आर्थिक उलाढाल, व्यापार व व्यवसाय, उद्योग, पर्यटन, रोजगार, सामाजिक राहणीमान, बांधकाम, घरं, पाणी व वीज पुरवठा, वाहतूक, प्रदूषण, सुरक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी घटकांमध्ये गेल्या सुमारे दहा वर्षांत झालेल्या बदलाचा आपण आढावा घेऊ व त्या आधारे पुढील सुमारे वीस वर्षांत होऊ शकणाऱ्या वाढीचा अंदाज मांडू. पुढची पायरी अतिशय महत्त्वाची आणि ती म्हणजे हा होऊ घातलेला विकास शाश्वत असणार आहे का याची चाचपणी करणं. त्यासाठी दोन परीक्षा द्याव्या लागतील. एक म्हणजे आपल्या शहराची ‘धारण क्षमता’ तपासणं, काही महत्त्वाच्या गरजांच्या पुरवठय़ाचा अभ्यास करून. यात येतील पाणी, ऊर्जा, जमीन, रोजगार, शिक्षण इत्यादी घटक. या घटकांच्या वाढीव पुरवठय़ाच्या आवाक्यावर शहराच्या विकासाची क्षमता ढोबळमानाने ठरवता येईल आणि त्या आणि तेवढय़ाच मर्यादित विकासाचा आराखडा आपण बनवू. हा प्राथमिक आराखडा सर्वागीण, सर्वसमावेशक आणि लोकसहभागातून बनवला जाईल. त्यात मुख्य विचार होईल नैसर्गिक परिसंस्था, पर्यावरणीय घटक, पायाभूत सुविधा, सामाजिक संसाधनं, सांस्कृतिक संवर्धन, आर्थिक उलाढाल, पर्यटन, रोजगारनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञान इत्यादींचा. संतुलित विकासाच्या तत्त्वांवरच हा आराखडा तयार होईल. हा आराखडा तयार झाल्यावर येईल दुसरी परीक्षा. ती असणार या होऊ घातलेल्या विकासाचा पर्यावरणावर होणारा आघात तपासण्यासाठी. या ‘पर्यावरणीय आघात अभ्यासा’त अनेक नैसर्गिक व सामाजिक घटकांवर होणारे सर्वव्यापी दुष्परिणाम अंतर्भूत असतील. या महत्त्वाच्या अभ्यासाच्या आधारे प्राथमिक आराखडय़ात आवश्यक फेरबदल करावे लागतील. काही विकास कामं रद्द करावी लागतील, विकासाचा आवाकाही नियंत्रित करावा लागेल. तिसरी पायरी म्हणजे या सुधारित प्राथमिक आराखडय़ाच्या अनुरोधाने ‘पर्यावरणीय व्यवस्थापन नियोजन’ करणं आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘पर्यावरणीय देखरेख’ करण्यासाठी व्यवस्था करणं. होऊ घातलेल्या विकासाच्या पर्यावरणीय नियोजनाचं योग्य व्यवस्थापन झाल्यानंतर शहराचा ‘अंतिम विकास आराखडा’ बनवला जाईल, त्यावर विविध पातळ्यांवर विचारमंथन होईल. स्थानिक रहिवाशांशी चर्चासत्रं होतील आणि या विचारमंथनातून येणाऱ्या सर्वमान्य सूचनांचा अंतर्भाव करून ‘विकास आराखडा’ अंमलबजावणीसाठी घेतला जाईल. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवलं जाईल, निधी उपलब्धतेचं नियोजन करण्यात येईल. निधी उपलब्धतेनुसार व आवश्यकतेच्या क्रमवारीनुसार विकासकामांचे टप्पे बनवले जातील. अधिक निधी उभा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. यातही लोकसहभागावर आग्रह धरला जाईल व विकासकामांना सुरुवात होईल. यात सर्वात कठीण काम असणार आहे जमिनीच्या उपलब्धतेचं; विशेषत: पायाभूत सुविधांसाठी. शहराच्या जुन्या व घनदाट वस्तीच्या परिसरात हे काम खूपच खडतर होऊ शकेल. पुन्हा एकदा लोकसहभागातून मार्ग काढता येईल. सर्वसाधारणपणे पायाभूत सुविधांसाठी विकासक्षेत्राच्या सुमारे १५ टक्के ते २० टक्के एवढी जागा लागू शकते. जमीनमालकांनी अशी २० टक्के जमीन शहर विकासासाठी दिली तर त्यांचंही नुकसान होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या मूळ जागेच्या क्षेत्रफळावर होऊ शकणारं बांधकाम क्षेत्र राहिलेल्या जागेत देता येईल, शिवाय त्यांच्या जागेवरील करात सूट देता येईल. शहराच्या विविध भागांतील जमिनींचं काही प्रमाणात एकत्रीकरण करून योग्य आकाराच्या व मोठय़ा क्षेत्रफळाच्या भूखंडांचं नियोजन करता येईल. अधिक पुढे जाऊन काही भागात मोठी रहिवासी संकुले आखता येतील. अशा रीतीने पायाभूत सोयींसाठी उपलब्ध झालेली जमीन मुख्यत: रुंद रस्ते, पादचारी मार्ग, दुचाकी मार्ग इत्यादींसाठी वापरली जाईल. रस्त्यांलगतच भुयारी पद्धतीने पाणी, सांडपाणी, वीजपुरवठा, दूरध्वनी, संगणक, दूरचित्रवाणी यांसाठीच्या तारा इत्यादींचीही व्यवस्था करण्यात येईल.’

उपराळकर काहीसा अस्वस्थ होऊन म्हणाला, ‘पटतंय मला सर्व. पण विकासनिधी कसा उभा करणार, अंमलबजावणी कशी होणार, कोण करणार, संशयित जनतेला हे स्वीकारार्ह कसं होणार?’

वास्तुपुरुषाने उपराळकर देवचाराच्या प्रश्नांच्या ओघाला रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘देवा महाराजा, मी या सर्वाचा विचार केला आहे. लोकसहभागातून अनेक गोष्टी शक्य होऊ शकतील यावर माझा दृढविश्वास आहे. फक्त नावीन्यपूर्ण आणि विश्वसनीय मार्ग सुचवायला हवे. माझ्या डोळ्यासमोर अगदी इथलंच, इथल्या जनतेने अनुभवलेलं, कोकण रेल्वेचं उदाहरण आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीला सरकारने निधी उपलब्ध करून दिला, पण त्यापेक्षाही मोठा भाग हा जनतेकडून घेतलेल्या ठेवींमधून उभा राहिला. आकर्षक योजनांद्वारे स्थानिक आणि बाहेरीलही गुंतवणूकदार अशा योजनांना मदत करू शकतील. आदर्श शहर विकासाचा आराखडा जर योग्य असेल, संतुलित विकासाचं आश्वासन देणारा असेल, सर्व प्रक्रिया पारदर्शी असेल तर लोकांचं सहकार्य नक्कीच मिळेल. त्याही पुढे जाऊन जर लोकांनाच या विकासात भागीदार बनवलं, त्यांच्या कुटुंबीयांच्या, पुढच्या पिढय़ांच्या भविष्याचं आश्वासन त्यांना मिळालं तर हा शहर विकास सहकारी तत्त्वावरही होऊ शकेल. अशा विकासात निसर्ग-पर्यावरण, विकसित शहर, स्थानिक जनता या सर्वानाच एकत्रित यशाचा आनंद उपभोगता येईल.’

उपराळकर देवचाराचं मन प्रसन्न झालं. त्याने वास्तुपुरुषाचं कौतुक करत सुचवलं, ‘वास्तुपुरुषा, तुझे आदर्श शहराच्या नियोजनाचे विचार खरंच नावीन्यपूर्ण आणि तरीही अगदी साधे-सरळ दिसतात. आता पुढे तूच सुरुवातीला म्हणालास तसं करू या. सुंदरवाडीचं प्रात्यक्षिक उदाहरण घेऊन ‘आदर्श सुंदरवाडी’ आमच्यासमोर सादर कर. ये तुझे तपशीलवार आराखडे घेऊन पुढच्या बुद्ध पौर्णिमेला. आताच येऊ घातलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मला तर ‘आदर्श सुंदरवाडी’ची स्वप्नं पडायला लागली आहेत. खूप शुभेच्छा!’

वास्तुपुरुष खुशीत आला. मुक्ततेसाठी अशी आव्हानं स्वीकारायची तयारी तर त्याने कधीच केली होती. ‘आभारी आहे देवा महाराजा!’ ‘आदर्श सुंदरवाडी’ हे माझंही स्वप्न आहे, तसं आश्वासन मी त्या मोती तलावावर विहरणाऱ्या तुझ्या निसर्गदूतांना-आभोळ्यांना दिलेलं आहे, महाराजा!’

मंद पहाटवाऱ्याने देवराई परिसर शीतल झाला होता. रविकिरणांची आभा पूर्व क्षितिजाला रंगवत होती. भारद्वाजाने दिलेल्या इशाऱ्याने वास्तुपुरुष भानावर आला, निसर्गदूताच्या फडफडाटीचा आणि हाकांचा मागोवा घेत उपराळातून बाहेर पडला. समोरचा नरेंद्र डोंगर त्याला खुणावत होता.

उपराळकर देवचाराचं मन प्रसन्न झालं. त्याने वास्तुपुरुषाचं कौतुक करत सुचवलं, ‘वास्तुपुरुषा, तुझे आदर्श शहराच्या नियोजनाचे विचार खरंच नावीन्यपूर्ण आणि तरीही अगदी साधे-सरळ दिसतात. आता पुढे तूच सुरुवातीला म्हणालास तसं करू या. सुंदरवाडीचं प्रात्यक्षिक उदाहरण घेऊन ‘आदर्श सुंदरवाडी’ आमच्यासमोर सादर कर. ये तुझे तपशीलवार आराखडे घेऊन पुढच्या बुद्ध पौर्णिमेला. आताच येऊ घातलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मला तर ‘आदर्श सुंदरवाडी’ची स्वप्नं पडायला लागली आहेत.

‘देवचारा, मी सुंदरवाडी हे शहर उदाहरणासाठी घेऊन आदर्श शहराचा ढोबळ सर्वागीण आराखडा प्रथम मांडतो. हाच आराखडा काही स्थानिक, समर्पक बदल करून इतर शहरांच्याही पर्यावरणीय धोरणात्मक संरचनेसाठी वापरता येईल. आपण सुरुवात करू शहराच्या विकासाशी निगडित काही महत्त्वाच्या घटकांचं सिंहावलोकन करून. शहराची लोकसंख्या, आर्थिक उलाढाल, व्यापार व व्यवसाय, उद्योग, पर्यटन, रोजगार, सामाजिक राहणीमान, बांधकाम, घरं, पाणी व वीज पुरवठा, वाहतूक, प्रदूषण, सुरक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी घटकांमध्ये गेल्या सुमारे दहा वर्षांत झालेल्या बदलाचा आपण आढावा घेऊ व त्या आधारे पुढील सुमारे वीस वर्षांत होऊ शकणाऱ्या वाढीचा अंदाज मांडू. पुढची पायरी अतिशय महत्त्वाची आणि ती म्हणजे हा होऊ घातलेला विकास शाश्वत असणार आहे का याची चाचपणी करणं.

ulhasrane@gmail.com