नेहमीपेक्षा जरा हटके विचार करून फ्रेम्स लावल्यास सजावट नावीन्यपूर्ण वाटते. कल्पकतेने फ्रेम्स/पेंटिंग्स कशी लावता येतील ते बघू या.
* गृहसजावटीमध्ये एकच अशी जागा तयार करायची असते ज्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाणे अपेक्षित असते (FOCAL POINT). मग ती एखादी भिंत असेल, सोफा असेल किंवा आपल्या बाबतीत बोलायचे तर एखादी फ्रेम /पेंटिंग असेल. आपल्याला त्या फोटोकडे लक्ष जावेसे वाटत असेल तर अशा वेळी आजूबाजूच्या भिंतींवर फ्रेम्स लावणे टाळावे. असे केल्याने लक्ष दहा गोष्टींकडे आकर्षिले जात नाही व हवा तो परिणाम साधला जातो. ज्या भिंतीवर पेंटिंग आहे ती बाकीची भिंत रिकामी ठेवावी, जेणेकरून सर्व लक्ष त्या पेंटिंगकडे जाईल.
* आजकाल एक नवीन स्टाईल पुष्कळ ठिकाणी पाहायला मिळते. ती म्हणजे एकाच संकल्पनेची चित्रे वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये रेखाटली जातात. एकटय़ा चित्रातून काहीच बोध होत नाही, पण जेव्हा आपण ती चित्रे जोडतो तेव्हाच त्यातून एक पूर्ण चित्र तयार होते. अशा प्रकारच्या स्टाइलसाठीसुद्धा जरा मोठी जागा असलेली चांगली. कारण पूर्ण चित्र थोडय़ा अंतरावरूनच समजून येते.
* बऱ्याच वेळेला आपल्याला भिंतीवरती खिळे ठोकून फ्रेम्स लावायला आवडत नाही. ह्याला दोन कारणे आहेत. एक तर ठोकल्याने भिंत खराब होते. आणि दुसरे ती फ्रेम बदलणे कठीण होऊन जाते. कारण त्या फ्रेमच्या आकारानुसार आधीचे खिळे ठोकलेले असतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे तीच फ्रेम त्याच जागेवर लटकून राहते. ह्यासाठी काही उपाय आपण बघू या. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे पूर्ण भिंतीवर शोभेच्या छोटय़ा छोटय़ा लाकडी पट्टय़ा (शेल्फ्स) करून त्यावर फोटो फ्रेम्स ठेवता येतील. ह्याचा फायदा असा की, खिळे ठोकावे लागत नाहीत व फ्रेम्सची जागा आपण कशाही प्रकारे बदलू शकतो. उद्या आपल्याला वाटले की सगळ्या फ्रेम्स काढून टाकायच्या तरीसुद्धा त्या रिकाम्या शोभेच्या पट्टय़ा डेकोरेशनचा एक भाग दिसतील. शेल्फ्स तुम्ही कितीही वेगवेगळ्या रंगांत व आकारात करू शकता.
बरेच वेळा आपण विजेच्या वायरी, खांब, ओबडधोबड खाचा लपवण्यासाठी वॉल पॅनलिंगचा उपयोग करतो. हेच पॅनलिंग आपण फ्रेम्स लावायलापण करू शकतो. भिंतीवर लाकडाच्या, जीप्समच्या किंवा मेटलच्या पट्टय़ा ठोकून, दोन पट्टय़ांच्या खाचेत पिनांवर आपण पेंटिंग्स लटकवू शकतो.
* प्रत्येकालाच वाटते, की आपले घर इतर घरांपेक्षा वेगळे दिसावे. हे वेगळेपण आपण आणू शकतो आपल्या वैयक्तिक गोष्टींनी. उदाहरणार्थ, दुकानातून फ्रेम्स / पेंटिंग्स आणण्यापेक्षा आपल्या घरच्या लोकांचे फोटो फॅमिली tree च्या रूपात भिंतभर लावू शकतो. जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा हा चांगला मार्ग आहे.
स्वत:च्या मुलांनी काढलेली चित्रे जर का फ्रेम करून लावली तर त्या घराला पर्सनल टच मिळेल. एम. एफ. हुसेनचे पेंटिंग संग्रही आहे या कौतुकापेक्षा आपल्या मुलीने वा मुलाने केलेल्या पेंटिंगचे कौतुक जास्त सुखावणारे असते. त्यासाठी घरातल्या पॅसेजमध्ये, मेन दरवाजाजवळ, मुलांच्या खोलीत मोठ्ठा सॉफ्टबोर्ड लावला व त्यांची चित्रे त्यावर लावली तर मुलांनाही छान वाटेल व त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. त्याच प्रमाणे खूप लोकांना काही काही गोष्टी जमवायचा शौक असतो. मीनिएचर गोष्टी, नाणी, शंख शिंपले.. या गोष्टी जर तुम्ही कल्पकतेने फ्रेम करून घरात लावल्यात तर दुकानातल्या कुठल्याही महागडय़ा पेंटिंगपेक्षा तुमचे घर जास्त आकर्षित दिसेल. तुमच्या कलेक्शननुसार त्या त्या गोष्टींच्या जागा ठरवणे महत्त्वाचे असते. सगळ्याच गोष्टी दिवाणखान्यातच पाहिजेत असे नाही. सिरॅमिकच्या कप-बशा, प्राचीन तऱ्हेतऱ्हेची काचेची भांडी स्वयंपाकघरात किंवा जेवण्याच्या खोलीत जास्त योग्य दिसतील. नाणी तुम्ही तुमच्या आवडीने ग्रुप करून फ्रेम करू शकता. किंवा वरून काच ठेवून सेंटर किंवा साइड टेबलाखालीही ठेवू शकता. जेणेकरून जवळून त्यांना बघता येईल. खालील चित्रात जुने कॅमेरे किती छान प्रकारे प्रदर्शित केले आहेत.
पूर्वीसारखे जिथे जागा दिसेल तिथे फ्रेम ठोकण्याऐवजी वरील गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले तेच जुने घर आपल्या स्वप्नांचे घर होईल.
वैशाली आर्चिक – archik6@gmail.com