vr06आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा आला की, जसे माणसांना आजार होतात, साथी पसरतात, त्याप्रमाणे इमारतींनाही आजार होतात. कुठे बाहेरच्या िभतींवर शेवाळं पसरतं, तर कधी खिडकीवरच्या असलेल्या सज्जामधून, पाइपांच्या बाजूला किंवा मधूनच िभतीवर उगवलेल्या हिरव्या पालवीची रोपं व्हायला लागतात. आतल्या िभतींवर कापसासारखा बुरा असलेली बुरशी वाढू लागते. असे अनेक आजार जडतात. पण बऱ्याच ठिकाणी इमारतींमधून होणाऱ्या गळतीची साथ पसरल्याचं आपण ऐकतो किंवा ओल आल्याचं तरी पाहायला मिळतं. पावसाळ्यात अनेक इमारतींच्या गच्चीवर पाइप उभे करून त्यावर सिमेंटचे किंवा इतर प्रकारचे पत्रे अगर आच्छादनं घातलेली आपण पाहतो. या इमारतींमधल्या रहिवाशांना आणि विशेषत: इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळा आला, की धाकधूक असते ती या पावसाळ्यात इमारतीच्या छतातून होणाऱ्या गळतीमुळे नेमका किती त्रास सहन करावा लागणार याची! पण अशी आच्छादनं किंवा गच्चीवर घातलेली छतं हा गच्चीतल्या गळतीवरचा कायमस्वरूपी आणि खरा उपाय नव्हे. आच्छादन घातलं, म्हणजे गच्चीतली गळती थांबली असं वाटतं. पण प्रत्यक्षात गच्चीच्या छताला पडलेल्या भेगा तशाच असतात. घर घेतानाच या त्रासाला घाबरून बरेच जण सर्वात वरच्या मजल्यावरचा फ्लॅट घेणं कटाक्षाने टाळतात. परंतु काही वेळा इमारतीतल्या इतर जागांचं बुकिंग फुल झाल्याचं बिल्डरने सांगितल्यामुळे आणि तातडीने जागेची गरज असल्यामुळे वरच्या मजल्याबरोबर वाढत जाणारी आणि सर्वात वरच्या मजल्याकरता असलेली सर्वाधिक फ्लोअर राइजची किंमत मोजून अशा जागा विकत घ्याव्या लागतात. किंवा कधी कधी टॉप व्ह्यूसाठी मुद्दाम हौसेखातर अशा जागा लोक विकत घेतात तेव्हा त्याबरोबर गळतीही विकत घेतात. काही वेळा रिसेलचा फ्लॅट घेताना आधीचा मालक गळती होत नसल्याचं सांगतो आणि कधीकधी ते त्याक्षणी खरंही असतं. परंतु मागाहून इमारत जुनी झाल्यावर गळती सुरू होते. रोज दिवसा गच्ची तापते. त्यामुळे तिचा पृष्ठभाग प्रसरण पावतो आणि रात्री तापमानात घट झाली की पुन्हा आकुंचन पावतो. या सततच्या प्रसरण आणि आकुंचन पावण्याच्या प्रक्रियेमुळेही पृष्ठभागाला तडे जातात. या तडय़ांमधून पावसाळ्यात पाणी झिरपून मग गळतीचा त्रास सुरू होतो. बांधकाम मुळातच सदोष असेल, तरीही हा त्रास होतो. याकरता गळती होत असेल तर किंवा होत नसेल, तरीही दर पाच वर्षांमधून एकदा गच्चीच्या पृष्ठभागाची सिव्हिल इंजिनीअरकडून पाहणी करून घ्यावी. म्हणजे वेळीच उपाय केलेत तर पुढे भविष्यात होणारा फार मोठा त्रास टळू शकतो.
वॉटरप्रूिफग करण्याच्या विविध पद्धती आहेत. काही पद्धतींमधून तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय केले जातात. तर काही पद्धती कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी वापरतात. जेव्हा पाणी नुकतंच झिरपायला सुरुवात झाल्यामुळे केवळ थोडीशी ओल येत असेल तेव्हा, किंवा इमारत खूप जुनी झाली आहे आणि त्यामुळे तिची लवकरच मोठी दुरुस्ती हाती घ्यायची आहे, अशावेळीसुद्धा ती दुरुस्ती होईपर्यंत तातडीने गळती थांबवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय योजता येतात. परंतु इमारतीची मोठी आणि र्सवकष दुरुस्ती लगेचच करावी लागणार नसेल आणि गळतीचा खूप त्रास होत असेल अशावेळी कायमस्वरूपी उपायच केले पाहिजेत. तात्पुरते किंवा कायमस्वरूपी उपाय हे विविध पद्धतींद्वारे करता येतात. यापकी दोन्ही प्रकारच्या उपायांसाठी सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या अशा काही पद्धती इथे सांगितल्या आहेत.
बाजारात मिळणारी काही वॉटरप्रूिफगची रसायनं, ही आपण ज्याप्रमाणे ब्रशच्या सहाय्याने रंग लावतो, त्याप्रमाणेच ब्रशच्या सहाय्याने लावता येतात. गच्चीच्या पृष्ठभागावर तसंच गच्चीच्या कठडय़ाच्या भिंतींना आतल्या आणि बाहेरच्या बाजूने आणि कठडय़ावरही या रसायनाचे गरजेनुसार एक किंवा दोन हात लावावेत. यामुळे आपण काही काळपर्यंत गळती रोखू शकतो. हा गळतीवरचा तात्पुरता उपाय आहे. कायमस्वरूपी उपाय करताना गच्चीत घातलेला चायना मोझ्ॉईक लाद्यांचा किंवा सिमेंटच्या कोब्याचा थर खोदून काढावा. तसंच त्याखालचा उष्णतारोधक थरही काढून टाकावा. कारण याच दोन थरांमध्ये असलेल्या लहानमोठय़ा भेगांमधून बऱ्याचदा गळती होत असते. या भेगा कधीकधी इतक्या बारीक असतात, की त्या नुसत्या डोळ्यांनी शोधून काढणं शक्य नसतं. त्यामुळे भेगा भरून काढण्याची नेहमीची पद्धत अवलंबली, तर केवळ काहीच भेगा भरल्या जातात आणि वॉटरप्रूिफगचं काम करून घेतल्यानंतरही उर्वरित भेगांमधून गळती सुरूच राहते. त्यामुळे टॉप फ्लोअरच्या स्लॅबच्या वरच्या भागावर असलेले हे दोन्ही थर पूर्णपणे काढून टाकून स्लॅबचा वरचा पृष्ठभाग मोकळा करून घ्यावा व त्यावर हे दोन्ही थर पुन्हा नव्याने घालावे. त्याकरता वापरल्या जाणाऱ्या सिमेंट-वाळूच्या मिश्रणात वॉटरप्रूिफग रसायन योग्य प्रमाणात घालावं. बाजारात विविध प्रकारची रसायनं उपलब्ध असलीत, तरी सर्वसाधारणपणे पॉलिमर या प्रकारचं रसायन अशा कामांसाठी वापरलं जातं. काहीवेळा इंजेक्शन पद्धतही वापरली जाते. यामध्ये पॉलिमर रसायन आणि सिमेंटचे पातळ प्रवाही मिश्रण तयार करून ते ठरावीक अंतरावर इंजेक्शनच्या सहाय्याने स्लॅबमध्ये टोचले जाते. दाबाखाली हे मिश्रण टोचले जात असल्यामुळे ते बारीक भेगांमध्येही जाते आणि त्या भेगाही भरल्या जातात. मेंब्रेन पद्धत ही आणखी एक पद्धतही गच्चीच्या वॉटरप्रूिफगसाठी वापरली जाते. यामध्ये कापडाप्रमाणे तागे असलेली रबरी किंवा डांबराच्या कापडाची भेंडोळी येतात. हे कृत्रिम कापड गच्चीवर अंथरून चिकटवले जाते. त्याचबरोबर गच्चीच्या कठडय़ाच्या आतल्या, वरच्या व बाहेरच्या बाजूनेही चिकटवले जाते. त्यामुळे सर्व भेगा झाकल्या जाऊन गच्चीवरून होणारी गळती थांबू शकते. मात्र, गच्चीवर भेगांमध्ये डांबर घालण्याची पद्धत अत्यंत चुकीची असूनही दुर्दैवाने ती सर्रास वापरली जाताना दिसते. अशाप्रकारे जर डांबर भेगांमध्ये भरले, तर पावसाळ्याव्यतिरिक्त इतर आठ महिन्यांमध्ये दिवसा गच्ची उन्हाने तापते,़ तेव्हा हे डांबर प्रसरण पावते व भेगा मोठय़ा होतात. रात्री तापमान कमी झाल्यावर डांबर आकुंचन पावते. पण भेगा मात्र रुंदावलेल्याच राहतात आणि अशा भेगांमधूनच पावसाळ्यात अधिक गळती सुरू होते. त्यामुळे भेगांमध्ये डांबर भरणे, हा उपाय होण्याऐवजी ते अपायकारक ठरते.
इमारतीचं वय जर जास्त असेल, तर अशा ठिकाणी स्लॅबचं काँक्रीट आधीच कमकुवत झालेलं असताना इंजेक्शन पद्धत वापरली, तर सिमेंट-पॉलिमरचं मिश्रण दाबाखाली भरलं जात असताना, त्या दाबामुळे भेगा रुंदावण्याचा धोका असतो. कारण कमकुवत काँक्रीटमध्ये तो दाब सहन करायची ताकद नसते. त्यामुळे अशा ठिकाणी इंजेक्शन पद्धत वापरून चालणार नाही. त्याऐवजी मेंब्रेन पद्धत वापरावी लागेल. त्यामुळे वॉटरप्रूिफगसाठी बऱ्याच पद्धती असल्या, तरी पद्धत कुठली वापरायची हे इमारतीचं वय, तिची ताकद तसंच गच्चीतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. इमारतीच्या विविध भागांवर जेव्हा पालवीच्या किंवा शेवाळ्याच्या स्वरूपात हिरवळ दिसू लागते तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो, की कुठेतरी पाणी मुरतंय. कारण या हिरवळीला वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अशी हिरवळ साफ करून टाकावी व सिमेंटमध्ये वॉटरप्रूिफग रसायन टाकून त्या मिश्रणाचा थर हिरवळ काढून टाकलेल्या जागी लावावा, म्हणजे कुठे बारीक पटकन नजरेला न दिसणाऱ्या भेगा असल्या, तर त्या भरून निघतील व पुन्हा त्या ठिकाणी झाडे वाढणार नाहीत. झाडे काढण्यासाठी अ‍ॅसिड अजिबात वापरू नये. त्याने सळया आणि काँक्रीटवर विपरीत परिणाम व्हायची शक्यता असते. अशी झाडे काढून टाकणे गरजेचे असते. कारण त्यांची मुळे खोलवर इमारतीच्या विविध भागांमध्ये रुजून त्यातून आधी गळती व मग जिथे सळया असतील, तिथे त्या गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. िभतींच्या आतील बाजूने जर बुरशी आली असेल, तर हार्डवेअरच्या दुकानात किंवा बांधकामाशी संबंधित रसायने मिळणाऱ्या दुकानात बुरशीविरोधी रसायने मिळतात, ती आणून बुरशी साफ करून त्या ठिकाणी ती रसायने लावावीत. थोडक्यात, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की योग्यवेळी केलेली गोष्ट पुढला अनर्थ टाळते, म्हणून गच्चीतून गळती किंवा पाण्याचा पाझर सुरू होताच वॉटरप्रूिफगचं काम लांबणीवर न टाकता वेळच्यावेळी करून घ्यावं.
सिव्हिल इंजिनीअर

 

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

– मनोज अणावकर