वाचकहो, याआधीच्या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी कसा केला जातो हे पाहिले. या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचे अजून काही उपयोग पाहणार आहोत.
आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा उपयोग हा पाणी गरम करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी, पाण्याची वाफ करून ती औद्योगिक कारणांसाठी वापरणे वगरेसाठी होऊ शकतो. आज आपण प्रामुख्याने स्नानाकरिता लागणारे गरम पाणी तापविण्याच्या सौर प्रणालीबद्दल तसेच सोलर कुकरबद्दल माहिती घेऊयात.
आपण सर्वानी इमारतींच्या गच्चीवर बसविलेले सौरबंब पाहिले असतीलच. सूर्याकडून वर्षांकाठी जवळजवळ १० ते ११ महिने मुबलक मिळणाऱ्या या पूर्णत: मोफत अशा ऊर्जेचा वापर करून आपण किमान अंघोळीसाठी लागणारे पाणी गरम करून, विजेचा वापर कमी करू शकतो! खरे तर घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांमध्ये गरम पाण्यासाठी वापरले जाणारे बॉयलर्स अथवा गिझर्स हे विजेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे एकदाच सौर बंब बसविल्याने आपण कित्येक वष्रे मोफत गरम पाण्याचा आनंद लुटू शकतो!
सौरबंब हे १०० लिटर क्षमतेपासून पुढे दहा हजार/ वीस हजार/ तीस हजार लि. असे कितीही क्षमतेचे बसविता येतात. साधारणपणे ‘एका व्यक्तीस एक बादली एका वेळेस’ या हिशेबाप्रमाणे चार जणांच्या एका कुटुंबाला सामान्यत: १२५ लि. क्षमतेची प्रणाली पुरू शकते. अर्थात, थंडीच्या दिवसांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा विचार केल्यास १५० ते २०० लि. ची प्रणाली जास्त आरामात वापरता येते. सौर प्रणाली बसविताना तिच्या क्षमतेचा व वापर करण्याच्या सवयींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. उदा. कुटुंबामध्ये जरी चार सदस्य असले तरी काही जणांना सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळेस स्नान करण्याची सवय असते. त्यामुळे संध्याकाळी प्रणालीतून गरम पाणी काढून घेतल्यावर टाकीमध्ये आलेले गार पाणी तापवायला रात्री सूर्य नसतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला गार अथवा कोमट पाणी मिळते. हे टाळण्यासाठी मुळातच थोडी जास्त क्षमतेची प्रणाली बसविणे गरजेचे आहे. तसेच (विशेषत: मोठय़ा सोसायटीमध्ये) सकाळी साधारणत: दहानंतर प्रणाली वापरणे थांबविल्यास दिवसभराच्या उन्हामुळे पाणी चांगले तापते.
सौरबंब हे शक्यतो कोणत्याही विद्युत साधनाव्यतिरिक्त म्हणजे- N.T.S. (Natural Thermo Siphon) या तत्त्वावर चालविल्यास त्यांना अक्षरश: १०/१५ वष्रे विशेष असा देखभालीचा खर्च येत नाही. पण अशा प्रणाली दीड ते दोन हजार लि. क्षमतेपर्यंतच चांगली कार्यक्षमता देतात. त्यापुढील क्षमतेसाठी मात्र मोटार पंप, कंट्रोल पॅनल, सेन्सर्स, इ.चा वापर करावा लागतो व ही विद्युत उपकरणे असल्याने त्यांच्या देखभालीचा खर्च अधूनमधून येऊ शकतो. मात्र अशा प्रणालींना वीज खूप कमी प्रमाणात लागते.
सौरबंबाचा वापर अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी होत असल्याने सर्वच ठिकाणी जसे- घरे, बंगले, सोसायटी, लॉजेस, हॉटेल्स, होस्टेल्स, हॉस्पिटल्स, देवस्थाने, गेस्ट हाऊसेस, फार्म हाऊसेस इ. ठिकाणी उपयोग होऊ शकतो. ही प्रणाली म्हणजे सौर पटले (सोलर पॅनल्स) व पाण्याच्या टाक्या या इमारतीच्या गच्चीवर बसविण्यात येतात. त्यातूनही सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे सोलर पॅनल्सही गच्चीवरती ‘सावलीविरहित जागेमध्येच’ (shadow free area) बसविली गेली पाहिजेत. अर्थात, शहरी भागात उंच, बहुमजली इमारतीमुळे सदनिकांच्या प्रमाणात आवश्यक तेवढी ‘सावलीविरहित जागा’ उपलब्ध नसते. अशा वेळी गच्चीवर लोखंडी सांगाडा (structure) करून त्यावर पॅनल्स बसविणे हाच एक पर्याय राहतो. त्याचबरोबर नवीन इमारत बांधताना व विशेषत: गच्चीचे रेखाटन करताना ते गच्चीवरती कमीत कमी सावली येऊन जास्तीत जास्त वेळ ऊन राहील असे केले गेले तर त्याचा उपयोग सौर ऊर्जेचा कोणताही वापर करताना होऊ शकतो.
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!  
सौरबंबामधून गरम झालेले पाणी हे अंघोळीव्यतिरिक्त हॉटेल्स/ कंपनी कॅण्टीनमध्ये भांडी धुण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. अनेक कारखान्यांमध्ये ‘बॉयलेर फीड वॉटर’ म्हणून सौरबंबामधून भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ७५ ते ८० डी. सें. पेक्षा जास्त तापमानाचे पाणी मिळू शकते व पाण्याची वाफ करण्यासाठी होणारा इंधनावरचा खर्च कमी करता येतो.
सौरऊर्जेच्या या अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाव्यतिरिक्त अन्न शिजविणे, औद्योगिक वापरासाठी पाण्याची वाफ करणे (३०० डी. सें.पेक्षा जास्त!), सोलर ड्रायर इ. अनेक कारणांकरिता सौरऊर्जेचा वापर होतो. लहानशा कुटुंबाला सोयीस्कर असा तीन किंवा चार भांडय़ाचा ‘सोलर बॉक्स कुकर’पासून ते शेकडो/ हजारो माणसांचा स्वयंपाक करू शकणारे ‘सोलर पाराबोलिक कुकर’देखील उपलब्ध आहेत.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?