समान जागावाटपावरून मतभेद आणि मोदींवरील शिवसेनेची टीका यावरून अडलेले शिवसेना-भाजप युतीचे घोडे सोमवारीही ‘जैसे थे’ राहिले. विधानसभेच्या १३५ जागा देण्याची भाजपची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साफ फेटाळून लावली. त्यातच मोदी लाटेबाबत आपण वस्तुस्थितीच मांडली असून त्यात काहीच चुकीचे नाही, असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केल्याने दोन्ही पक्षांतील तेढ अधिक वाढली आहे. त्यामुळे भाजपनेही ‘निमंत्रण दिल्याशिवाय चर्चा नाही’ अशी भूमिका घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीत घटक पक्षांना १८ जागा देऊन शिवसेना-भाजपने प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी रविवारी ठेवला होता. मात्र, तो उद्धव ठाकरे यांनी सोमवारी फेटाळून लावला. ‘मलाही पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे शिवसेनेच्या वाटय़ाला असलेल्या जागा कमी कशा करायच्या,’ असा सवाल त्यांनी केला. भाजपने लोकसभेत ३०० हून अधिक जागा लढवीत असताना २७२ जागांचे उद्दिष्ट ठरविले, मग आम्ही १६९ पैकी १५० जागांवर विजयी होण्याचे ‘लक्ष्य’ ठरविण्यावर आक्षेप असू नये, असेही ते म्हणाले. ‘मोदीलाटे’बाबत केलेल्या वक्तव्याचाही उद्धव यांनी पुनरूच्चार केला. त्याचवेळी युती अभेद्य रहावी, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे व कृतीमुळे हा तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घ्यावा, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्वबळाची तयारी सुरू ठेवायची, अशी रणनीती भाजपने आखली आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी मुंबईत येऊन प्रदेश नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर युतीबाबत काही ठोस निर्णय होण्याची  अपेक्षा आहे.    

जागावाटपाची बोलणी सुरू
शिवसेनेशी जागावाटपाची बोलणी सुरू असून दोन-तीन दिवसांत तोडगा निघेल, असा आशावाद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला. युतीबाबत भाजपच्या नेत्यांची तावडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. भाजप पराभूत होत असलेल्या १९ आणि शिवसेनेचा पराभव होत असलेल्या ५९ जागांबाबत फेरवाटप व्हावे, अशी भाजपची भूमिका आहे. मात्र शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे समजते.