रिपब्लिकन पक्षाला विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर यश मिळालेले नसले, तरी पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
रामदास आठवले यांनी मंगळवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आमचे उमेदवार जिथून निवडून येऊ शकतात, अशा ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केले आणि ते सर्वजण निवडूनही आल्याचे सांगितले. त्याचबरोबर आमच्या पक्षाबरोबर युती करताना भाजपने आम्हाला मंत्रिमंडळात दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. आत्ता आमचे उमेदवार निवडून न आल्यामुळे आम्हाला दहा टक्के वाटा नाही दिला तरी चालेल. पण आम्हाला दोन मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी आठवले यांनी केली. मंत्रिपदे दिली जाणाऱयांना विधान परिषदेवर घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.