केंद्रात व राज्यात सत्तेत वाटा मागत भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपने सोडलेल्या तीन अधिकृत व चार अनधकिृत मतदारसंघांत रिपाइंच्या उमेदवारांना शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला. त्या उलट स्वबळावर लढून एक जागा जिंकणाऱ्या व चार मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाची कामगिरी सरस ठरली आहे. बसपचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी, त्या पक्षाच्या नावावर सुमारे १२ लाख मतांची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत रिपाइंने भाजपशी युती केली होती. त्याबदल्यात भाजपने रिपाइंला आठ जागा सोडल्या होत्या. परंतु चेंबूर, विक्रोळी व पिंपरी या तीनच जागांवर रिपाइंचे अधिकृत उमेदवार होते. अन्य पाच ठिकाणी भाजप व अपक्षांनी अर्ज भरले होते. तीन अधिकृत जागांवर रिपाइंच्या उमेदवारांचा शिवसेनेने पराभव केला. मानखुर्द-शिवाजीनगरचा अपवाद वगळता, देवळाली, मेहकर, अंबरनाथ व देगलूर या मतदारसंघांतही शिवसेनेनेच बाजी मारली आहे. रिपाइंच्या खात्यावर १ लाख ५८० मते जमा झाली आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी १९९०पासून स्वबळावर एक तरी उमेदवार निवडून आणण्याची परंपरा या वेळीही कायम राखली आहे. अकोला जिल्ह्यातील बळापूरमधून चौरंगी लढतीत बळीराम शिरस्कर विजयी झाले. दोन वेळा निवडून आलेल्या हारिदास भदे यांचा अवघ्या २४४० मतांनी पराभव झाला. मात्र तरीही अकोला (पूर्व), जळगाव-जामोद, मूर्तिजापूर व कारंजा या चार मतदारसंघांत भारिपच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अतिशय कमी मतांनी त्या ठिकाणी भाजपला विजय मिळाला आहे. भारिपला एकूण ४ लाख ७२ हजार ९२५ मते मिळाली आहेत.
बसपची झुंज
बहुजन समाज पक्षानेही स्वबळावर अनेक मतदारसंघांत निकराची झुंज दिली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यानंतर या वेळी बसपची कामगिरी सुधारली आहे. उमरेड, नागपूर (उत्तर), भंडारा व12 भिवंडी या मतदारसंघांमध्ये बसपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. एकही उमेदवार निवडून आला नसला तरी,  बसपच्या खात्यावर या वेळी ११ लाख ९१ हजार ७४९ मतांची नोंद झाली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इतर लहान-सहान गटांची कामगिरी अदखलपात्र ठरली आहे.