शिवसैनिक रमेश जाधव यांच्या हत्याप्रकरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी दिंडोशी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या शांतता सभेत मोठय़ा संख्येने हजर असलेल्या अल्पसंख्यांक समाजाने उत्स्फूर्तपणे सढळ हस्ते आर्थिक मदत केली. इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत विनाकारण तणाव निर्माण होऊन वातावरण कलुषीत न करण्याची शपथही या सभेत घेण्यात आली.
नाहक जीव गमवाव्या लागलेल्या जाधव यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी काही समाजकंटकांनी दगडफेक व तोडफोड करून वातावरणात तणाव निर्माण केला होता. जातीय तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर हे जातीने पोलीस ठाण्यात हजर होते. या काळातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेले सहायक आयुक्त राजेंद्र कोटक, तसेच दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष डाफळे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. कोटक यांच्या जागी गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी राजन घुले यांची सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या परिसरात पुन्हा कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त पंजाबराव उगले आणि घुले यांनी यासाठी पुढाकार घेतला
होता.
या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जाधव यांच्या कुटुंबीयांसाठी नवनिर्वाचित आमदार अतुल भातखळकर यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचवेळी जाधव यांच्या कुटुंबीयांसाठी सढळ हस्ते आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे या सभेला उपस्थित असलेल्या अल्पसंख्याक समाजातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत दिली. त्यामुळे तात्काळ आणखी दोन लाख रुपये जमा झाले.
अल्पसंख्याक समाजाने दाखविलेल्या या उत्स्फूर्ततेमुळे शांतता सभेत एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. या परिसरात शांतता भंग न करण्याची शपथ उपस्थितांनी यावेळी घेतली. शिवसेनेतर्फे जाधव यांच्या दोन्ही मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिले. इतकेच नव्हे तर या सभेला उपस्थित मौलवींनीही आर्थिक मदतीची घोषणा केली.