नामदेव ढसाळ यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ‘चळवळीच्या भल्याबुऱ्या आठवणीं’चे संकलन ६ डिसेंबर २०१३ रोजी ‘दलित पँथर प्रकाशन’तर्फे अनौपचारिकरीत्या प्रकाशित झाले. लोकांपर्यंत फारसे न पोहोचलेल्या त्या पुस्तकातील हे निवडक दोन उतारे, ढसाळ इतिहासाकडे कसे पाहत होते याची साक्ष देणारे..
वैदिक कायद्याने, संस्कृतीने इथे माणसातले माणूसपणच मारले होते. वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था मूठभर वर्णश्रेष्ठांच्या हितासाठी निर्माण करून खालच्या बहुजन समाजाला त्यातही शूद्र-अतिशूद्र समजायला पाच हजार वष्रे म्हणजे या देशाच्या प्राचीन इतिहासापासून तो एकोणिसाव्या-विसाव्या शतकापर्यंत म्हणजे ब्रिटिश राजवट येईपर्यंत चिरडण्यात आले होते.
पुनरुत्थानाची प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. फुले, आगरकर, रानडेंपासून तो आंबेडकरांपर्यंत एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रबोधनाची चळवळ द्विगुणित करण्याची कर्तव्यता फळास आली. िहदुस्थानी स्वातंत्र्याच्या लढय़ाच्या समांतर-अस्पृश्यांचा मुक्तीची चळवळ उभी राहिली. या चळवळीने अस्पृश्यांना, मुक्ती कोनप्रथेचा मार्ग नुसता दाखविला नाही. त्या मार्गातून ध्येयपूर्तीसाठी प्रबोधनाचे सन्य, लष्कर कूच करू लागले. फुले, आंबेडकर, शाहू महाराज एक दिग्गज कृतिशील सामाजिक सुधारकांचा देदीप्यमान काळ सुरू झाला. ज्यांच्या समाज सुधारण्याच्या कल्पना रोमँटिकपणापासून अलिप्त होत्या आणि ज्यांनी सामाजिक सुधारणांसोबत र्सवकष बदल या चळवळीच्या माध्यमातून आपल्यासाठी, आपल्या आयुष्याचे योगदान दिले ते त्या योगदानाचे उत्तरदायित्व त्याची जबाबदारी आपसूक माझ्यासारख्या नुकत्याच अस्पृश्यतेचा शाप भोगणाऱ्या सज्ञान झालेल्या माणसाच्या खांद्यावर इतरांप्रमाणे येऊन पडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पश्चात, त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांनी आणि ज्युनियर कार्यकर्त्यांनी रीतशीर शेडय़ुल्ड कास्ट पक्ष बरखास्त करून ३ ऑक्टोबर १९५७ रोजी, स्वत:च्या अखत्यारीत रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. परंतु हा रिपब्लिकन पक्ष-संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या संज्ञेचा, विचार सिद्धांताचा होता, असे मोठय़ा धाडसाने म्हणावे लागेल! हा पक्ष ३ ऑक्टोबर १९५८ पर्यंत टिकला. नंतर गटातटांत विभागला जाऊन सत्ता सौदेबाजीच्या, सत्ताधारी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या तकलादू युतीकारणात संपून गेला. ज्या सामाजिक अभिसरणासाठी मान्यवर रिपब्लिकन पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणोत्तर सत्ताधाऱ्यांशी लांगूनचालन केले त्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचा ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ असा उपयोग करून त्याला भंगारावस्था आणली. नव्या पक्षात अनुसूचित जातीसह सर्व जातधर्माचे शोषित, पीडित, कष्टकरीवर्गाचे समाज-समूह यांचा समावेश केला जात होता. परंतु तत्वपूर्वीच पक्षाचे विभाजन झाले. नागपूर मुक्कामी स्थापन झालेल्या या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते रा. ब. एन. शिवराज, तर पक्षाचे कार्यवाह होते. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, पक्षाची घटना धोरण वर्षभराच्या काळात पदाधिकाऱ्यांनी न केल्यामुळे आवळे बाबू, दादासाहेब रुपवते आणि अ‍ॅड. बी. सी. कांबळे यांनी नवा रिपब्लिकन पक्ष काढून या पक्षाची शेवटी इतिश्री केली. पुढे हा पक्ष बी. सी. कांबळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, आर. डी. भंडारे आणि तद्नंतर दादासाहेब रुपवते या पुढाऱ्यांत वाटला गेला. खरे तर हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दावर हुकूम चालविला असता तर संसदीय राजकारणात तो स्थिरावला असता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाश्र्वभूमीवर या पक्षाने १९५७ च्या निवडणुकीत चांगले यश प्राप्त केले होते. राज्यात विधानसभेत १९ आमदार, तर महाराष्ट्र व इतर प्रांत धरून लोकसभेवर नऊ खासदार निवडून संसदेत गेले होते. त्यानंतर मात्र या पक्षाला विघटनाच्या रोगाने विलयास नेले. तेव्हापासून एकाचे दोन, दोनाचे चार असे करता करता रिपब्लिकन पक्षच संपून गेला. ज्याला पारंपरिक रिपब्लिकन पक्ष म्हटले जाते त्याची अशी शोकांतिका झाली, या शोकांतिकेच्या पाश्र्वभूमीवर – अन्याय-अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित पँथर संघटना अस्तित्वात आली. ७२ ते ७५ ही तीन वष्रे संघटनेने खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचार सिद्धांत आणि अस्मिता उजागर करण्याचे काम केले.