मेळघाट. कोवळ्या पानगळीचा म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. येथे सारेच काही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून. त्यामुळे दारिद्रय़, कुपोषण जणू या प्रदेशाच्या पाचवीलाच पूजलेले. येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या व्यथाही तशाच, अन्य भागांतील शेतकऱ्यांप्रमाणे. किंबहुना त्याहून अधिकच. सलग तीन वर्षांच्या दुष्काळाने झालेली त्यांची होरपळ अधिकच भीषण. पण येथील आदिवासी शेतकरी त्या संकटांवर जिद्दीने मात करून उभा आहे. वर्षांनुवर्षे जगण्याच्या साधनांवर पडलेला, वाढत असलेला ताण सहन करून तो जगण्याला छाती लावून भिडतो आहे.. मेळघाटाने शेतकरी आत्महत्येच्या समस्येला येथे शिरकाव करू दिलेला नाही.

येथील आदिवासी शेतकऱ्यांना हे बळ कोठून मिळाले?

भिसूलाल ओंकार शेलेकर या शेतकऱ्याकडून या गहन प्रश्नाचे उत्तर मिळते.  धारणी तालुक्यातील निरगुडी हे त्यांचे गाव. छोटेसेच. बहुतेक शेती कोरडवाहू. ज्वारी, धान, तूर हे या भागातलं मुख्य पीक. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, ते पेरतात गहू, हरभरा; परंतु असे थोडेच. बाकी सारे कोरडवाहू. तीन वर्षांपासून या गावानेही कोरडा दुष्काळ सोसला. पाऊसच कमी पडला. अपेक्षित उत्पादन होणार कसे? शेतीत केलेला खर्चही मातीत गेला. पण भिसूलाल त्याने खचले नाहीत. ते सांगतात, ‘मुळात आमच्याकडं सहनशीलता आहे. शेतीतून जे मिळतं त्याच्यावर गुजराण करायची. नाही मिळालं काही, पैसे कमी पडले, तर शहरात जायचं. मजुरी करायची. सगळंच कसं आलबेल असेल? नसतंच बहुधा.’

पण मातीने दगा दिला तर मग कसे होते?

‘रेशनवर गहू, तांदूळ मिळतो. बाकी सामानासाठी बाजारात जावं लागतं. पण आमचा जगण्याचा खर्च फारसा नाहीच. गरजाच कमी करून ठेवल्यात आम्ही. आता माझी गोष्ट निराळी आहे. माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांनी विहिरीवर ऑइल पंप बसवलाय. त्यामुळे यंदा मी गहू, हरभरा घेऊ शकलो. चांगले पैसे मिळाले. पण दर वर्षी असंच होतं का? बरं सरकार पीककर्ज देतं. पण ते वेळेवर मिळायला पाहिजे ना.. बरं ओलिताची सोयपण सगळीकडं नाही. अनेक लोक कर्जबाजारी आहेत. पण, त्याची फारशी चिंता ते करीत नाहीत. इथला शेतकरी खचून जाऊन आत्महत्या करीत नाही. तसा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नाही.’ पण मग फगनू विष्णू धुर्वेचे काय? हा मेळघाटातल्या उकूपाटीतला. आठशे लोकवस्तीचे हे गाव. २००७ मध्ये त्याने जंगलात जाऊन आत्महत्या केली होती. ही मेळघाटातली पहिली ज्ञात शेतकरी आत्महत्या. लोक सांगतात, की त्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याच्या परतफेडीची चिंता त्याला भेडसावत होती. या गावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू श्रावण पटोरकर मात्र ठासून सांगतात, ‘मेळघाटातला शेतकरी आत्महत्या करूच शकत नाही. हा एक अपवाद होता. आमच्या भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. माझ्याकडे चार एकर कोरडवाहू शेती. गेल्या वर्षी पीक कर्ज मिळाले. धान पेरले, २० पोते धान झाले. काही भागांत ज्वारी, तूर पेरली. तुरीचे सात क्विंटल उत्पादन झाले. व्यापाऱ्याला ३६०० रुपयांनी तूर विकली. ज्वारी कमी झाली, तरी घरी उपयोगात येते. यंदा शेतात लावलेला खर्च भरून निघाला. पण गेल्या वर्षी अशी स्थिती नव्हती. खर्चाची भरपाईदेखील झाली नाही. पण अशा परिस्थितीतही येथील शेतकरी खचून जात नाहीत. आपल्या शेतात ते स्वत: मजुरी करतात. पैसे कमी पडले, तर शहरांमध्ये मजूरकाम करतात. तेथून काही रक्कम आणून घरचा खर्च भागवतात. मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्चही आटोपशीरच असतो. गरजा कमी असल्याने खर्चही जास्त होत नाही.’

यातील लग्नखर्चाची बाब फार महत्त्वाची. शेतकरी जणू लग्नावरच सगळे पैसे उधळतो आणि त्यात कफल्लक होतो असे सरसकट चित्र सध्या तयार केले जात आहे. ते खरे नसले, तरी विवाहावरील अनावश्यक खर्च ही मोठी समस्या आहेच. मेळघाटात मात्र ती फारशी दिसत नाही.

पटोरकर सांगतात, ‘पण अलीकडच्या काळात ताण वाढला आहे. काही लोक कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या समस्येवर गावात चर्चा होते. त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही एकलकोंडे नाही. एकमेकांच्या सुखदु:खात सहजरीत्या सहभागी होतो. शेजारच्या घरी काय प्रश्न आहेत, हे लगेच कळतात. त्या प्रश्नांची सोडवणूक लगेच होते असे नाही, पण चर्चेतून मार्ग निघतो.’

ही गोष्ट तर लाखमोलाची. मेळघाटाकडून शिकण्यासारखी. किंबहुना अशा काही छोटय़ा गोष्टींमुळेच येथील शेतकऱ्याला हिंमत मिळते. परिस्थितीशी झगडण्याची ऊर्जा मिळते. सीमित गरजा, अनावश्यक खर्चाला फाटा, एकमेकांकडून होणारे अनौपचारिक समुपदेशन यामुळेच मेळघाटाने अद्याप आत्महत्याग्रस्ततेचा कलंक लावून घेतलेला नाही.

दशकभरापूर्वी आत्महत्या करणाऱ्या फगनू धुर्वेच्या कुटुंबाचे आता कसे चालले आहे?  त्या आघातातून ते कुटुंब सावरले आहे. फगनूच्या पत्नीने दोन मुले आणि एका मुलीचा विवाह लावून दिला. दोन मुली शिकत आहेत. या कुटुंबाच्या डोक्यावर आजही कर्जाचा बोजा आहेच, पण तरीही ते परिस्थितीशी दोन हात करीत आहेत..