भारदस्त आवाज आणि जबरदस्त अभिनय याच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक चित्रपटांत चार दशकाहून अधिक काळ आपला ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेत ओम पुरी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अष्टपैलू कारकीर्दीचा वेध घेणारा लेख..

जगात सगळीकडेच भेदभाव असतो. सर्वभेदनिरपेक्ष समजलं जाणारं कलेचं क्षेत्रसुद्धा या कटू सत्याला अपवाद नाही. म्हणून तर चांगला किंवा वाईट चित्रपट असं वर्गीकरण न होता कलात्मक/  प्रायोगिक/ समांतर चित्रपट आणि धंदेवाईक/ लोकप्रिय/ मसाला चित्रपट असा फरक केला जातो.

त्याची झळ दोन्ही वर्गातल्या कलाकारांना लागते. त्यांच्यावर शिक्के बसतात. त्यांचे ‘टाइप’ होऊन जातात. ओम पुरी मात्र या भेदाला पुरून उरला. समांतर चित्रपटाची चळवळ थंडावली तेव्हा नसिरुद्दीन शाहप्रमाणे त्यानंही व्यावसायिक चित्रपटाकडे मोर्चा वळवला आणि जराही वेळ न घेता या चित्रपटात तो बेमालूम मिसळून- विरघळून गेला. म्हणून तर ‘सॉल्लिड’ सव्वाशे चित्रपट त्याच्या खात्यात जमा झाले. त्या विशाल, झगझगीत जगात त्याला कुणी ‘गॉडफादर’ नव्हता की कोणत्याही बडय़ा बॅनरशी अथवा दिग्दर्शकाशी त्याचे कधी लागेबांधे जुळले नाहीत. तरीही राजकुमार संतोषीपासून प्रियदर्शनपर्यंत सगळ्या चांगल्या (तरीही व्यावसायिक) दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये तो  दिसला.

ओम पुरीचं आणखी मोठं वैशिष्टय़, किंबहुना श्रेय म्हणजे व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यानं आब राखला. या चित्रपटातल्या झगमगाटानं आणि अवास्तवतेनं त्याच्यातला सच्चा कलाकार झाकोळून टाकला नाही किंवा ‘लाउड’ बनवला नाही.  नसिरुद्दीनसारखा पट्टीचा कलाकारसुद्धा ‘जुनून’ किंवा ‘कर्मा’ यांतल्या भूमिकांमध्ये भडक वाटतो. मनोज वाजपेयी तर ‘ऐतबार’मधला ‘जॉली रिच मॅन’ रंगवताना हास्यास्पद होतो. कारण धंदेवाईक चित्रपटाच्या पट्टीशी जुळवून घेताना त्याची गडबड होते. तो मूळचं (प्र)शिक्षण विसरून जातो, तर नसिरची अवस्था संस्थान खालसा झालं तरी पूर्ववैभवाची मिजास मिरवण्याची खोड न जाणाऱ्या संस्थानिकासारखी होते. या चित्रपटातल्या इतर कलाकारांपेक्षा आपण वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत हे त्याला विसरता येत नाही. त्यामुळेच त्या चित्रपटाशी, त्यातल्या भूमिकेशी त्याला एकरूप होता येत नाही.

नसिरच्या अभिनयात आणि वर्तनात हा दुरावा नेहमीच दिसत राहिला. म्हणून तर ‘स्पर्श’, ‘मासूम’, ‘वो सात दिन’, ‘चमत्कार’ आणि ‘इजाजत’ यांच्यासारख्या  चांगल्या चित्रपटांतून दमदार सुरुवात केल्यानंतरही तो व्यावसायिक चित्रपटात फार काळ टिकला नाही. ओम पुरीपाशी असा गंड नव्हता- अहंगंड नव्हता, तसा हीनगंडही नव्हता. हिरो बनण्याचा अट्टहास नव्हता. वास्तव स्वीकारून उघडय़ा डोळ्यांनी तो या वेगळ्या जगात वावरला. प्रामाणिकपणे काम करत राहिला आणि म्हणूनच टिकून राहिला.

ओमची आणखी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे व्यावसायिक चित्रपटात काम करताना त्यानं नसत्या तडजोडी केल्या नाहीत. आपल्या कलेशी, आपल्या ‘स्टँडर्ड’शी त्यानं इमान राखलं. नसिरचा इथेही तोल गेला. हिरो म्हणून मिरवण्यासाठी ‘तहलका’ नामक सर्व बाजूंनी सुमार चित्रपटात तो चक्क स्त्रीवेशात- आणि त्यापेक्षा खेदजनक अशा अशोभनीय ‘बिकिनी’मध्ये दिसला. पोशाखाचं जाऊ दे, पुढे तर त्याची भूमिकांची निवडदेखील चुकली. ‘कोई मिल गया’ आणि ‘मै हूँ ना’ हे त्याचे अलीकडचे चित्रपट व त्याचं काम बघताना त्याची कीव आली. कशासाठी त्यानं हे चित्रपट केले, असा उद्वेग आणणारा प्रश्न पडला.

ओम पुरीच्या बाबतीत अशी वेळ कधी आली नाही. सुमार चित्रपट त्याच्याही वाटय़ाला आले. मात्र त्यापैकी कोणत्याही भूमिकेत त्यानं ‘चाल से’ काम केलं नाही. तो कधीही, कुठेही सवंग झाला नाही. ‘गेटअप, मेकअप, वेशांतरं अशी उपरी सोंगं त्यानं केली नाहीत की अभिनयात लकबी वापरल्या नाहीत. विनोदी भूमिका करताना  त्यानं हेल काढले नाहीत की आवाजाची ओढाताण केली नाही. ‘जाने भी दो यारो’,  ‘चाची ४२०’, ‘हेराफेरी’ आणि ‘मालामाल विकली’ या चित्रपटांमधल्या त्याच्या विनोदी  भूमिका खरोखर खास होत्या. कायम लक्षात राहणाऱ्या होत्या. पण ‘जाने भी दो यारो’मध्ये दु:शासनाच्या भूमिकेत डोळ्यांवर चढवलेला काळा चष्मा सोडता ओम पुरीनं विनोदी भूमिकांसाठी काहीच वेगळं केलं नाही. नेहमीच्या- अगदी रोजच्या पद्धतीनं वागून- बोलून त्यानं या भूमिकेमध्ये कमालीचा रंग भरला.

विनोद ‘सिच्युएशन’मध्ये असतोच, तो निर्माण करण्यासाठी गेटअप- मेकअपसारख्या युक्त्यांची उधार- उसनवार करण्याची गरज नसते, याची त्याला जाण होती. ती त्याच्या अभिनयातही उतरत होती, हे विशेष. ‘जाने भी दो यारो’मध्ये अपघातात सापडलेल्या आणि वाट अडवून बसलेल्या (आणि परलोकवासी झालेल्या) सतीश शहाला तो दमदाटी अन् शिवीगाळ करत नाही. ‘टाइट’ अवस्थेमध्ये असल्यामुळे ही वस्तुस्थिती त्याच्या लक्षातच येत नाही. शहानं वाटेतून गाडी दूर करावी म्हणून ‘गुड आफ्टरनून सरजी’ म्हणून विनंती करतो; तीही पंजाबी स्टाइलनं शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा पूर्ण उच्चार करत, तेव्हा धमाल येते. निश्चल अवस्थेत ‘व्हील’वर बसलेल्या शहाच्या तोंडात सिगारेट ठेवण्याचा प्रेमळपणाही तो दाखवतो.

सिनेमातल्या नाटकाच्या प्रसंगात मात्र ओम पुरी सौजन्याची ऐशी तैशी करतो आणि सौजन्याप्रमाणेच नाटक बाजूला ठेवून समोरच्या पात्राला खुन्नस म्हणून बदडून काढतो. हा प्रसंग खरंतर हुकमी अतिरेकाचा; पण ओम पुरी जन्मजात सहजतेनं आणि मर्यादाशीलतेनं वावरतो. सहजता आणि सौम्यता हे त्याचे ‘मॅचविनिंग’ अभिनयगुण होते. ‘कॉन्सन्ट्रेशन’ आणि ‘कंट्रोल’ हे त्याचे ‘स्पेशल’ गुण होते. म्हणूनच व्यावसायिक चित्रपटात तो कधी भडक झाला नाही आणि विनोदी भूमिकांमध्ये आचरटपणा किंवा आगाऊपणा या टोकांना गेला नाही. देहबोली आणि त्याला साजेसा मुद्राभिनय यातून तो गांभीर्य अन् विनोद, दोन्ही सहजसुंदरतेने साकार करायचा.

‘अर्धसत्य’चं, त्याच्या सुरुवातीच्या भूमिकेचंच पाहा ना. हडेलहप्पी करणाऱ्या बापामुळे दबून, गुदमरून गेलेला अबोल नायक (अर्थात ओम पुरी) नायिकेमुळे (स्मिता पाटील) हळूहळू मोकळा होऊ लागतो. आधी ताठर, कोरा वाटणारा त्याचा चेहरा थोडा सैल होतो.  निष्प्राण नजरेत काहीसा जिवंतपणा येतो. आणि पुढे हाच दबलेला नायक रामा शेट्टीचा नि:पात करण्यासाठी निर्धारानं उभा राहतो. हे सारे चढ-उतार अन् फेरफार ओम पुरीच्या चेहऱ्यावर स्वाभाविक रूपात दिसले.

या भूमिकेनं ओम पुरीला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळवून दिला, पण तिचा ‘इम्पॅक्ट’ विलक्षण होता. तिच्यामुळे राहुल रवेल, संतोषीसारख्या काहीतरी नवं करू पाहणाऱ्या लेखक- दिग्दर्शकांना व्यावसायिक चित्रपटातल्या नायकाच्या चित्रात बदल करता आला. नाचण्या- गाण्यात रमणाऱ्या नायकाऐवजी सामाजिक विषमतेचा बळी ठरलेला नायक अन्यायाचा प्रतिकार करताना दिसू लागला. ‘गर्दिश’, ‘ऐलान’ या व्यावसायिक चौकटीत असूनही चांगल्या वाटणाऱ्या चित्रपटांचे  नायक ‘अर्धसत्य’च्या छायेत होते. व्यावसायिक चित्रपटानं ओम पुरीला काय दिलं, हा मुद्दा वेगळा. ओम पुरीनं मात्र या चित्रपटाला खूप काही दिलं. इमान दिलं. अभिनयाला वास्तवता दिली आणि त्याचबरोबर वैविध्यदेखील. ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, गरीब माणसाच्या आयुष्याची सगळी रूपं ओम पुरीनं ‘सहजते, तुझं नाव ओम पुरी’ असं म्हणावं अशा सुंदरपणे दाखवली. ‘धूप’ या समांतर वळणाच्या चित्रपटाचा तो  (प्रौढवयीन) नायक होता. राहता राहिला खलनायक. एन. चंद्रांच्या ‘नरसिंहा’मधून ओम पुरीनं तीही कसर भरून काढली. ‘मालामाल वीकली’मधला दूधवाला म्हणून तो विश्वासार्ह वाटला, तसा ‘घायल’मधला कर्तव्यनिष्ठ आणि बुद्धिमान पोलीस कमिशनर म्हणूनही तो पटला. ‘चाची ४२०’मध्ये श्रीमंत मालकाचा सेक्रेटरी- कम- चमचा म्हणून दिसणारा हा चलाख माणूस मालकाच्या प्रेमपात्रावर (लक्ष्मी ऊर्फ कमल हासन) ‘लाइन’ मारत असतो. हे काम करताना मालकाची मर्जी सांभाळताना तो बऱ्याचदा अडचणीत येतो, तोंडघशी पडतो अन् अपमानितसुद्धा होतो. ही स्थित्यंतरं ओम पुरीनं देहबोली आणि चेहराबोली यातून सुरेख व्यक्त केली आहेत.

त्याच्यापाशी नवव्या दशकातल्या फिल्मी हिरोला शोभावा असा ‘कडक’ आवाज होता. पण त्याचाही त्यानं खुबीनं उपयोग केला. असा आवाज असणाऱ्या नटांना पुढे तोच आवाज अडचणीत येतो. त्यांचं बोलणं त्यामुळे एकसुरी आणि कंटाळवाणं वाटू लागतं. दमदार आवाजाचा अतिरेक टाळून ओम पुरीनं वेळीच या अडचणीतून सुटका करून घेतली. त्यामुळे त्याच्या अभिनयातलं वैविध्य आणि सातत्य अबाधित राहिलं. हिंदी चित्रपटातले बहुतेक नट, विशेषत: सुपरस्टार्स बहुतेकदा मागच्या पानावरून पुढचा अभिनय चालू ठेवतात असं वाटतं. ओम पुरी मात्र प्रत्येक भूमिकेत नवा वाटला. त्या त्या व्यक्तिरेखेसारखा वाटला. याला कालपरवाच आपण पाहिलंय, असं चुकूनही कधी वाटलं नाही.

प्रत्येक भूमिकेबरोबर नवा चेहरा धारण करून त्याच्या व्यक्तिरेखेत शिरण्याची किमया ओम पुरीला साधली होती. त्यातही दैवी कौतुकाची म्हणा किंवा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ओम पुरीजवळच हिंदी सिनेमाच्या नमुनेदार नायकाचा गुलजार चेहरा नव्हता, त्या ओम पुरीपाशी हे कौशल्य नव्हतं. ‘ये मूंह और मसूर की दाल’ म्हणावं असा ठोक्याच्या पातेल्यासारखा चेहरा दुर्दैवानं त्याच्या वाटय़ाला आला होता. अशा चेहऱ्याला हिंदी चित्रपटात ‘स्ट्रिक्टली नो एन्ट्री’ असते. चेहऱ्यावर देवीचे व्रण वागवणाऱ्या ओम पुरीनं हा नियम निकालात काढला आणि सहजसुंदर अभिनयाला त्यानं चेहरा दिला. कधी कधी दैवसुद्धा शहाणपणानं वागतं म्हणायचं.

इतक्या वेगवेगळ्या  भूमिका करूनही ओम पुरीच्या नावाभोवती अमरीश पुरीप्रमाणे वलय निर्माण झालं नाही. त्याच्या समर्थ अभिनयाचं वेळेनुसार कौतुक झालं, पण तो सतत प्रकाशझोतात राहिला नाही. समांतर चित्रपटातल्या त्याच्या भूमिकांची तोंडभरली तारीफ करणारे व्यावसायिक चित्रपटातल्या त्याच्या भूमिकांबद्दल हातचं राखून बोलायचे किंवा लिहायचे. त्यांच्याही मनात भेदभाव होताच! हे शल्य त्याला शेवटपर्यंत डाचत होतं. त्याला आणि नसिरलासुद्धा. रुपेरी पडद्यावरच्या या प्रतिस्पध्र्यामध्ये ही टोचणी तेवढी समान होती. चरित्र अभिनेत्यांमध्ये या दोन गोष्टी अलीकडच्या काळात फक्त अमरीश पुरीला आणि नाना पाटेकरला लाभल्या. खलनायक आणि अँटी हिरो यांना चांगले दिवस आले म्हणून हे शक्य झालं. नसिर आणि ओम पुरी यांच्या काळात खल-व्यक्तिरेखांना भाव आला नव्हता. साहजिकच ते वंचित राहिले. गमतीची गोष्ट म्हणजे नसिरला आपल्यापेक्षा जास्त मोबदला मिळतो म्हणून ओम पुरी हिरमुसला व्हायचा.

या गोष्टीची भरपाई म्हटलं तर झाली. ओम पुरीने नसिरच्या आधी अमेरिकी आणि ब्रिटिश चित्रपटांतून भूमिका मिळवल्याच. शिवाय दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार त्याच्या वाटय़ाला आले. कलात्मक चित्रपटांमधून नेहमी शोषित-पीडित, सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या माणसाचा अंत एकाकी अवस्थेत झाला. कौटुंबिक अस्वास्थ्य आणि मद्यपान हे कलाकाराच्या कुंडलीतले पापग्रह ओम पुरीच्या बाबतीत प्रबळ ठरले. त्याला आदरांजली वाहताना जावेद अख्तर यांनी म्हटलंय, ‘ओम पुरीचं अभिनयकौशल्य मान्य नाही अशी व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोधून सापडणार नाही’. फिल्म इंडस्ट्रीतच का, सगळ्या चित्रपटप्रेमी भारतीयांमध्येही अशी अरसिक व्यक्ती चुकूनही सापडणार नाही; मग तिला समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांमधला फरक कळत असो वा नसो!

– अरुणा अंतरकर