vv17नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यप्रशिक्षक नकुल घाणेकर सांगताहेत डान्स अॅण्ड फिटनेसचं गणित.
या सदरामध्ये आपण सालसा, हिप-हॉप, बॉलीवूड, कंटेम्पररी या सर्व नृत्यशैलींविषयी आतापर्यंत पाहिलं. नृत्याचा उपयोग फिटनेसकरिता कसा करता येईल या मध्यवर्ती कल्पनेभोवती हे सारे लेख गुंफले होते. आपल्याकडची परंपरागत नृत्य शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी आदर्श आहेत. देशाची नृत्यपरंपरा प्राचीन आहे. सालसा काय किंवा हिप-हॉप काय या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात.
शास्त्रीय या शब्दाचा अर्थ – शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते. बंधन असतं. त्याला नियम असतात. कोणत्याही शास्त्रीय नृत्याला एक विशिष्ट इतिहास आहे. त्याला अभिजात संगीताची जोड आहे. प्रत्येक नृत्यशैलीला एक अभिजात शैली म्हणून ओळख आहे. अनेक र्वष शास्त्रीय नृत्याच्या गुरूंनी, नृत्याचार्यानी त्याची उपासना केली. त्याचं जनमानसात प्रसार/प्रचार करता करता त्याचे पावित्र्य जपले. वेळ पडल्यास या गुरूंनी, नृत्याचार्यानी शिष्यांना रियाझाने, साधनेचे महत्त्व पटवून दिले. शिक्षा दिली. वेळ पडल्यावर नृत्याचार्यानी शास्त्रीय नृत्याची दिशा सोपी करून दाखविली. त्यात काही मूलभूत आणि महत्त्वाचे फरक केले असतील. त्यामुळे आज शास्त्रीय नृत्य कळण्यास जास्त सोपं झालं.
नीट विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जे जे मोठे शास्त्रीय नर्तक होऊन गेले किंवा अजून आहेत ते सर्व दीर्घायुषी होते किंवा आहेत. त्यांना कोणतेही व्यसन नाही. त्यांच्या तब्येतीसुद्धा उत्तम आहेत. शास्त्रीय नृत्य करणारे अधिकांश नर्तक किंवा नर्तकी वयाच्या साठी-सत्तरीपर्यंत नृत्य करीत आहेत. याला एक खूप महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे असे की शास्त्रीय नृत्याची साधना या सर्वानी वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षांपासून सुरू केली. त्यांचं जगणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं सगळं शास्त्रीय नृत्य होतं. कथक, भरतनाटय़म्, मोहिनीअट्टम कोणताही शास्त्रीय नृत्यप्रकार शिकताना चांगले सांगीतिक संस्कार तर होतातच. परंतु ते ताण-ताणव, व्यसनांपासून नेहमीच चार हात लांब राहिले. त्यांच्या शरीराला उत्तम व्यायाम तर मिळालाच परंतु त्या सर्व शास्त्रीय शैलीच्या संगीताच्या अभ्यासामुळे त्यांच्या मनाचं शुद्धीकरण झालं. आध्यात्मिकता त्यांना हळूहळू समजायला लागली. त्यांची मनं शांत आणि सुदृढ झाली.  आयुष्यातील संभाव्य अडचणींना शास्त्रीय नृत्याच्या मदतीने या सर्व लोकांनी उत्तम तोंड दिले आणि त्या अडचणींवर मातही केली असावी.
कथक, भरतनाटय़म्, ओडिसी, मोहिनीअट्टम, कथकली अशा नृत्य शैलींना शास्त्रीय नृत्य शैली असे म्हणतात.  शास्त्रीय म्हणजेच ज्याला शास्त्राची जोड आहे. क्लासिकल डान्स हा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे. जे नृत्यात काम करणारे कलाकार शास्त्रीय नृत्याचा अभ्यास करून आपले काम करीत आहेत. त्यांच्या कामात आणि बाकीच्यांच्या कामात खूप फरक आहे.  कथकसारख्या किंवा भरतनाटय़म् सारख्या अभिजात नृत्यशैलीमध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम घडून येतो. कथक शैलीतील पदन्यासामुळे किंवा गिरक्यांमुळे आणि दमदार तालांगांमुळे उत्तम काíडओ व्यायाम होतो.  पदन्यासामुळे पायाचे स्नायू पीळदार आणि बळकट होतात. पोश्चर उत्तम होतं. पाठीचा कणा ताठ राहतो. भरतनाटयम्च्या त्रिभंगी मुद्रेत कंबर आणि पाय बळकट होतात. एकूणच कोणतीही शास्त्रीय नृत्य पद्धती नर्तकाला फिजिकल फिटनेसबरोबर मेंटल फिटनेससुद्धा प्रदान करते. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा सात्त्विकतेकडे होतो. याचीच आजच्या युवा पिढीली गरज आहे. सर्व लहान मोठय़ांनी एका तरी शास्त्रीय नृत्याची उपासना केली पाहिजे. त्याचं शिक्षण घेतले पाहिजे. तरच तनाने आणि मनाने सुदृढ भविष्यकालीन भारत देशाची आपण कल्पना नक्कीच करू शकतो.
 नकुल घाणेकर