पहिला पाऊस.. पहिल्या पावसाला आपण नेहमीच पहिला पाऊस का म्हणतो? वर्षांनुर्वष आपण पाऊस पाहिलेला असतो.. बरं पावसाळा येण्यापूर्वी घामाचा पाऊस हा सुरूच असतो.. अगदीच काही नाही तर वर्षांतून एकदा वॉटरपार्कमध्ये रेन डान्स केलेलाच असतो.. तरी त्याचं इतकं नावीन्य का राहतं? कारण पाऊस ही केवळ एक प्रक्रिया नसते पाणी वरून खाली पडण्याची; ती एक भावना असते.. सगळ्या भावनांना दूर सारून हृदयाची पाटी कोरी करकरीत करणारी.
चातक वगैरे पक्षी खरंच असतो की नाही, की तो केवळ कल्पनेतला आहे, हे ज्याचं त्याचं मत! पण चातकाइतकीच किंबहुना चातकापेक्षा जास्त माणसंच पावसाची वाट पाहतात. चातक हा पक्षी पावसाच्या पाण्यावर जगतो असं म्हणतात, पण तो एकटाच काय, तर जगातले सगळे प्राणी, पक्षी, माणसं पावसाच्या पाण्यावर जगतात. आता चातकाला माणसासारखं वर्षभर पाणी साठवून ठेवता येत नाही, म्हणून त्याचे हाल होतात. सांगण्याचा मुद्दा असा की आपण पावसाची; किंबहुना पहिल्या पावसाची एवढी वाट का पाहतो? कारण त्याआधीच आपल्या मनात पाऊस सुरू झालेला असतो. वार्षिक परीक्षेत शेवटचा पेपर लिहीत असताना शेवटच्या अध्र्या तासात पेपर लिहायचा बाकी राहिलेला असतानासुद्धा ‘सुट्टीत गावी जाऊन काय करायचं’ याचे प्लॅन्स मनात सुरू असतात. तसंच या पावसाचं.. उन्हासारखी नैसर्गिक पराकोटीची परीक्षा सुरू असताना पावसाळी सुट्टी खुणावत असते. पावसाळ्यातल्या आठवणी नव्याने वाफाळल्या जात असतात.
प्रत्येकाचा पहिला पाऊस हा वेगळा असतो. काही तरुण मंडळी पहिल्या पावसात भिजून कल्ला करायचा प्लॅन करतात तर काही जण पहिल्या पावसाच्या संततधारेकडे एखाद्या शेडखाली उभं राहून पाहणं पसंत करतात. काही हौशी कांदा-भजी आणि चहा असा बेत करतात तर काही शौकीन पावसाच्या बॅकग्राउंड म्युझिकवर आवडलेलं एखादं सुरेख पुस्तक वाचत कॉफीचा भुरका घेतात. प्रत्येकाची पावसाचा आनंद घेण्याची पद्धत निरनिराळी असते. कुणाला आत राहून मन भिजवायला आवडतं तर कुणाला बाहेर जाऊन प्रत्यक्ष भिजायला.
साधारण माणूस कळत्या वयाचा झाल्यापासून त्याची एक खोड कधीच मोडत नाही, ती म्हणजे जाणूनबुजून छत्री विसरण्याची! सकाळी घरून निघताना शंभर टक्के माहीत असतं की आज पाऊस येणार, तरी छत्री बरोबर घेतली जात नाही. कारण एकच..मनसोक्त भिजणं! आणि मग रस्त्यात अचानक पाऊस आला की ‘काय हा पाऊस, अचानक आला’ अशा आविर्भावात शेडखाली अर्धवट उभे राहून भिजून घेतात. पहिल्या पावसात भिजलेल्या गोष्टी या ‘गमावल्या’च्या कॅटेगरीत न मोजता ‘आठवणीं’च्या कॅटेगरीत गणल्या जातात. शाळेत दप्तरं भिजल्याची आणि तरुण वयात मनं भिजल्याची आठवण ही प्रत्येकाकडे असते. पहिल्या पावसात भिजलेल्या दप्तरावरून आई कधीच ओरडलेली नसते आणि भिजलेली मनं कधीच वाळलेली नसतात. बाहेर शरीराचा रखरखाट असताना मनात मृगजळ टिकून राहतं ते या पहिल्या पावसामुळेच! त्यामुळेच मुद्दाम भिजत राहण्यात एक गंमत असते.
हाच पहिला पाऊस तरुणाईच्या चॅटमध्येसुद्धा उतरतो आणि पावसात नकळत स्पर्श झालेल्या बोटांची ग्वाही चॅटमधूनच दिली जाते. चॅट थीममध्ये पाऊस आणि आवडता फोटो बॅकग्राउंडला ठेवल्यावर बाहेर पाऊस पडो वा ना पडो, इकडे सतत बरसत राहतो. पावसाची स्वतंत्र फॅशन आपल्याला भिजण्याकडे झुकवते आणि ते भिजणं कुणाला आवडण्यापर्यंत ते टिकवते. म्हणूनच खास पावसात वापरलेले कपडे पुन्हा कपाटातून केव्हा तरी बाहेर काढले जातात.. तो क्षण पुन्हा जगण्यासाठी ! काळ्या रंगाच्या छत्र्या कालांतराने रंगीबेरंगी झाल्या आणि त्या जरी छत्र्यांवरील कॅलिग्राफीपर्यंत पोहोचल्या तरी छत्रीत लिफ्ट मागताना कुणी छत्रीवरील प्रिंट पाहत नाही..छत्रीखालील आसरा शोधतं. त्या निमित्ताने का होईना सगळे रंग एकमेकांत मिसळले जाऊन नवीन रंग तयार होतो. त्या रंगाची उधळण पुढे हिरवळ, निसर्गसौंदर्य, धबधबे ते आयुष्याचे ट्रेक इथपर्यंत होत असते. या सगळ्याची सुरुवात पहिल्या पावसापासून होते. म्हणून प्रत्येक वर्षीचा प्रत्येकाचा पाऊस हा पहिला पाऊस असतो.. कारण मधल्या काळात कदाचित छत्र्या बदललेल्या असतील, ट्रेकची ठिकाणं बदलली असतील अथवा आपली हिरवळ बदलली असेल, पण पहिला पाऊस हा पुन्हा प्रत्येकाला नवी सुरुवात करून देणारा असतो. म्हणून दरवर्षीचा पाऊस हा पहिला पाऊसच असतो. या पहिल्या पावसाच्या सगळ्यांना भिजल्या कागदाने शुभेच्छा!

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश