आपल्या डोक्यात हल्ली फॅशन म्हटल्यावर डिझायनर लेबल्स आणि महागडय़ा ब्रॅण्डेड गोष्टी असाच समज असतो. फॅशन आणि स्टायलिंग यामधला फरक किती जणांना माहिती असतो? हल्लीच्या युगात हाय फॅशन की स्ट्रीट फॅशन हा प्रश्न गौण ठरतोय. तुमचा लुक ‘क्लासी’ असायला हवा आणि त्यासाठी कळीचा मुद्दा असतो स्टायलिंगचा. हाय फॅशन आणि स्ट्रीट फॅशनचा समन्वय साधून स्टायलिंग केलं तर खिशाला परवडणारा ‘क्लासी लुक’ मिळू शकतो. यासाठी हवा थोडा फॅशन सेन्स आणि थोडासा ‘जुगाड’ करण्याची तयारी.

तसा हा सीझन पावसाचा. पण कॉलेजियन्ससाठी हा निकाल लागण्याचा सीझन. घरातल्यांकडून यथेच्छ ‘सत्कार समारंभ’ करून घ्यायचे हे दिवस. त्यात जून महिना म्हणजे कॉलेज सुरू होण्याचे दिवस. कॉलेजचं नवीन वर्ष म्हणजे नवीन लुक, नवीन इम्प्रेशन, नवीन तोरा. त्यामुळे त्यासाठी नवीन फॅशनेबल काही हवंच. दहावीचा निकाल तर आत्ताच लागलाय. या मुलांची कथाच वेगळी असते. कॉलेजपर्व सुरू होणार असतं. शाळेच्या युनिफॉर्मपासून मोकळीक मिळालेली असते. त्यामुळे कॉलेजमध्ये पाऊल ठेवण्याआधी कपडे, फॅशन अॅक्सेसरीज, बॅग, शूज अशी साग्रसंगीत खरेदी करायची असते. थोडक्यात कुठलाही उत्सव नसला, तरीही हा शॉपिंग सीझन नक्की आहे. शहरांमधले बाजाराचे रस्ते भरलेले दिसताहेत. पण हल्ली मॉलमधील चकाचक ब्रँडेड दुकानंसुद्धा खुणावायला लागली आहेत. तुटपुंज्या पॉकेटमनीवर किंवा आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या शॉपिंग बजेटमध्ये सगळी खरेदी हायफंडा मॉलमधून होणं केवळ अशक्य! यातून मार्ग काढण्यासाठी हवा थोडासा फॅशन सेन्स आणि थोडासा ‘जुगाड’ करण्याची तयारी.
स्ट्रीट शॉपिंग कितीही उत्तम वाटत असलं, तरी त्यात क्वालिटीचा प्रश्न येतोच. तसंच ब्रॅण्डेड कपडय़ांना मिळणारा ‘रिच लुक’सुद्धा त्याच्यात नसतो. पण ब्रॅण्डेड कपडय़ांच्या किमती प्रत्येक वेळी खिशाला परवडतील असं नाही. अशा वेळी या दोघांचा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे. कपडे, ज्वेलरी, फूटवेअर कुठून आणि कोणती घ्यावी याचं गणितही जमायला हवं.
सर्वप्रथम सध्या शॉपिंगच्या तयारीत असाल, तर थोडी कळ सोसा. जुलै महिन्यापासून सगळ्या मॉल्समध्ये ‘एंड ऑफ सीझन’ सेल सुरू होतील. ब्रॅण्डेड खरेदी आणि रीझनेबल रेट हे दोन्ही यामधून साधू शकतं. फक्त तुम्ही योग्य वेळी त्याचा फायदा घेतला पाहिजे. मॉलमधल्या एण्ड ऑफ सीझन सेलचा फटका हल्ली स्ट्रीट मार्केटलासुद्धा बसायला लागला आहे. या काळात रस्त्यावर फेरीवालेसुद्धा कपडय़ांच्या, अॅक्सेसरीजच्या किमती कमी करतात. लवकरच सुरू होणारा मान्सून सेल आणि त्यानंतरचा डिसेंबर-जानेवारी महिन्यातला दुसरा सेल हे मॉलमधल्या खरेदीसाठी दोन मोठे किफायतशीर महोत्सव असतात. त्यामुळे खरेदीसाठी हे मुहूर्त कधीच चुकवू नका.
क्वालिटी महत्त्वाची
ब्रॅण्डेड दुकानात आपण जातो, ते दर्जा आणि वेगळेपणासाठी. दर्जामध्ये कापडाचा पोत, दर्जा आणि फिटिंग या तिन्ही गोष्टी येतात. त्यामुळे जास्त काळ टिकतील, वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतील, अशा गोष्टी मॉलमधून विकत घ्या. उदाहरणार्थ जीन्स वॉडरोबमध्ये गरजेची असते. त्यामुळे ती स्टायलिश हवीच पण टिकाऊ देखील असली पाहिजे. अशा वेळी एखादी ब्रॅण्डेड जीन्स वापरणं उत्तम. तीच गोष्ट लेगिंग्ज, स्कर्ट्स, जॅकेट्स यांना लागू आहे. उत्तम डेनिम्स किंवा स्कर्ट तुमच्या संपूर्ण लुकला उठाव आणायचं काम करतात. त्याचं फिटिंग योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या कपडय़ांमध्ये जादाचे पैसे गुंतवणं फायद्याचं ठरतं.
मॉलमधली ब्रॅण्डेड खरेदी ही दर्जासाठी आणि ‘क्लासी’ लुकसाठीदेखील गरजेची आहे. पण एखादा नवा ट्रेण्ड अल्पजीवी ठरू शकतो. त्यामुळे अशा ट्रेण्डी आउटफिट्ससाठी स्ट्रीट शॉपिंग चालू शकते. एका महिन्यात ‘आउट ऑफ ट्रेण्ड’ जाणाऱ्या कपडय़ांवर मॉलमध्ये दुप्पट पैसे खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे टॉप्स, टय़ुनिक्स, गंजी, टी-शर्ट्स स्ट्रीट मार्केटवरून सहज घेता येतात.
शिफॉनसारख्या पातळ कापडांचे ड्रेस, नाजूक एम्ब्रॉयडर ड्रेस यांची खरेदी एखाद्या ब्रॅण्डेड दुकानातून केलेली उत्तम. रस्त्यावर मिळणाऱ्या कपडय़ांची शिलाई चांगली नसते. एम्ब्रॉयडरीमध्ये वापरलेलं साहित्य हलक्या प्रतीचं असतं. त्यामुळे ड्रेसचा लुक पूर्णपणे खराब होतो.

उठावदार रंग
रंगांच्या बाबतीत कपडय़ांच्या दर्जामुळे खूपच फरक पडतो. शक्यतो ब्राइट रंगाचे कपडे स्ट्रीट मार्केटमधून विकत घ्या. जेणेकरून कपडे जुने झाले तरी रंग फ्रेश दिसतात. ब्रॅण्डेड कपडे डार्क, डल शेडचे असले तरी कपडय़ांची प्रत चांगली असल्यास ते उठून दिसतात. प्रिंटेड ड्रेस स्ट्रीट मार्केटवरून घेतले तरी चालू शकतात. एखाद्या ब्रॅण्डचा लोगो कपडे, शूज, बॅगवर मिरवायचा असेल, अशी ब्रॅण्डेड लाइफस्टाइल मिरवायला आवडत असेल तर खरोखर ब्रँडेड आउटलेटमधून खरेदी करणं उत्तम. बनावट लोगो लगेच ओळखता येतात आणि त्यामुळे इम्प्रेशन कमी होतं. बॅग, गॉगल यावर कित्येकदा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी एखाद्या ब्रॅण्डचा लोगो मोडून-तोडून लावलेला असतो. अशा बॅग्स घेणं टाळाच.

पेअरिंगच्या ट्रिक्स
ब्रॅण्डेड कपडे एखाद्या पार्टीसाठी खरेदी करायचे म्हटलं, तरी कित्येकदा बजेटच्या बाहेर जातात. मग रोजच्या वापरातील कपडय़ांची गोष्टच सोडा. पण अशा वेळी स्ट्रीट शॉपिंग आणि ब्रॅण्डेड कपडे यांचा मेळ घालणं गरजेचं आहे.
– दुकानातून सलवार कमीजचा सेट विकत घेण्याचा जमाना आता गेला. आता ट्रेण्ड आहे सेपरेट्सचा. इथेच स्टायलिंग महत्त्वाची ठरते. अशा वेळी तुमचा पूर्ण लुक एका दुकानातून घेण्याचा हट्ट करू नका. तुमचा फोकसमध्ये येणारा मुख्य ड्रेस ब्रॅण्डेड असल्यास उत्तम. बाकी कपडे आणि ज्वेलरीसह इतर अॅक्सेसरीजमध्ये तडजोड करता येते.
* एक छानशी जीन्स, कुर्ता, डे ड्रेस सहज भाव खाऊन जातात. त्यांच्यासोबतचा टॉप, लेगिंग, श्रग तितकंच महागडं असलंच पाहिजे असं नाही. उलट एखादी स्ट्रीट स्टाइल ज्वेलरी ‘कल्ट फॅशन’ म्हणून वेगळा भाव खाऊन जाते.
* लेगिंग, स्कर्ट, जॅकेट, श्रग, पलाझो, कुर्ते नेहमी ब्रॅण्डेड दुकानातून घेतले म्हणजे दर्जाची खात्री असंही नाही. कित्येकदा स्ट्रीट मार्केटमधील एखाद्या जुन्या, ओळखीच्या, ठेवणीतल्या दुकानांत त्याहून चांगल्या प्रतीचे कपडे कमी किमतीत मिळू शकतात. अशी दुकानं हेरून ठेवली पाहिजेत.
* एक चांगली हिल्स तुमचा पूर्ण लुक बदलू शकते. त्यामुळे बेसिक शेडची पण वेगवेगळ्या ऑकेजनला आणि लुक्सवर वापरता येईल अशी हिल्स तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या.
* हँडबॅग्स ब्रॅण्डेड हव्यात हा हट्ट नको. पण स्ट्रीट मार्केटमधून बेसिक ब्लॅक, ब्राउन बॅग घेण्याऐवजी ब्राइट कलरची आणि नजरेत भरणारी बॅग वापरा. हँडबॅग कशी कॅरी करता यावर सुद्धा तुमचा लुक अवलंबून असतो. शूजइतकाच हँडबॅगसुद्धा तुमच्या लुकवर मोठा परिणाम करते.
* जंक ज्वेलरीची खरेदी स्ट्रीट मार्केटमधून केली तरी चालते. पण शक्यतो ब्राइट गोल्ड, सिल्व्हरची ज्वेलरी निवडा. मॅट फिनिशची ज्वेलरी चांगल्या दुकानातून घ्या. मोती, स्टड्स, पेंडंट्स यांची चमक चांगली असेल याची खात्री करून घ्या. गरज असल्यास घरी त्यांच्यावर ट्रान्सपरंट नेलपेंटचा एक कोट द्या. त्यामुळे त्यांचा रंगही कायम राहील आणि ग्लेझसुद्धा येईल.
11

चौकट

‘स्ट्रीट स्टाइल फॅशन’ हा प्रकार हल्ली सेलेब्रिटींमध्येही लोकप्रिय आहे. सेलेब्रिटींची ही स्टाइल फॉलो करायची असेल तर कुठली गोष्ट ब्रॅण्डेड हवी आणि कुठली नसली तरी चालेल हे ओळखलं पाहिजे. जुन्या पण क्लासी अॅक्सेसरीजचा वापर आवर्जून करता येतो, हे सोनम कपूरने ‘कान्स’च्या रेड कार्पेटवरही दाखवून दिलं. तिच्या डिझायनर साडी गाउनची नजाकत तिने घातलेल्या नेकपीसमुळे जास्त वाढली. हा नेकपीस ब्रॅण्डेड नसून तिच्या आईच्या जुन्या कलेक्शनमधला होता, हे विशेष.