मैत्रिणींचा घोळका परीक्षा झाल्यावर मनापासून बेत करतो तो ‘पजामा पार्टी’चा. मनातलं गूज सांगायला, मनसोक्त नाचायला, हसायला, मनमुराद सुट्टी अनुभवायला रात्रभर मैत्रिणीकडे राहणं ‘मस्ट’असतं. मुलीमुलींच्या या ‘स्लीप ओव्हर’ पार्टीला ‘पजामा पार्टी’ असं म्हटलं जातं. त्यात हल्ली थीम नाईट पार्टीचीही भर पडती आहे. काय असते पजामा पार्टीची धमाल?

उन्हाळा आल्याचं कळतं ते सुट्टी लागलेल्या तरुणाईला पाहून. बाकी ऊन, गरम वारे वगैरे नंतरच्या गोष्टी. रात्री मैत्रिणीच्या घरी राहणं, दोन वाजता गच्चीत जाऊन सेल्फी काढणं, मध्यरात्री बनवलेले नूडल्स, ते खात गॉसिप करणं, गाणी लावून नाचणं, थीम पार्टी करणं, विशिष्ट ड्रेसकोड घालून येणं आणि खूप धमाल.. ऐकूनच कसलं भारी वाटतं ना! तर मंडळी आजकाल सुट्टीची धमाल ही अशी असते. रात्री याला बहर येतो. एखाद्या मैत्रिणीच्या घरी रात्री राहायला जाणे, रात्रभर जागणे, धमाल खेळ, नाच-गाणं आणि न संपणाऱ्या गप्पा असे कार्यक्रम आखले जातात. मुलीमुलींच्या या पार्टीला हल्ली ‘स्लीप ओव्हर’ किंवा ‘पजामा पार्टी’ असं म्हटलं जातं. उन्हाळ्याची सुट्टी लागताच सगळी गँग पजामा पार्टीचे वेगवेगळे बेत आखण्यास सुरुवात करते.
‘एम.बी.ए.’ करणारी नित्या बक्षी सांगते की, ‘एकमेकींबरोबर जिव्हाळ्याच्या गप्पांसाठी हे स्लीप ओव्हर्स खूप महत्त्वाचे असतात. मैत्रिणींची छोटी-मोठी सिक्रेट्स याच पजामा पार्टीमध्ये बाहेर येतात. मैत्रिणींसोबत मिळालेल्या या ‘क्वॉलिटी टाइम’मधून खूप एनर्जी मिळते. आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी मिळतात. मध्यरात्री कुलूप लागलेल्या दरवाज्यावर चढून रस्त्यावर जाणं, रस्त्याच्या मधोमध बसून फोटो काढणं अ‍ॅडव्हेंचर्स वाटतं. हे असं मनमुराद जगणं वयाच्या याच टप्प्यात शक्य होतं. पुढे या पार्टीच्या आठवणी आयुष्यात कायम लक्षात राहतील.’
आधी केवळ रात्री मैत्रिणीच्या घरी पार्टी असल्यामुळे याला पजामा पार्टी म्हणत असत, पण आता यामध्ये थीम पार्टीदेखील करण्यात येते. जंगल थीम, प्रिन्सेस थीम, सॅण्टा थीम अशा वेगवेगळ्या संकल्पना ठरवून घेऊन त्यानुसार आपली कल्पनाशक्ती चालवायची. संकल्पनेला अनुसरून गेट-अप हवा. मग त्यासाठी तसा कॉस्च्युम, मेकअप, ज्वेलरी हेदेखील खास ठरवून करण्यात येतं. मुंबईची प्रांजली मनोरे सांगते, ‘मित्रमंडळींसमवेत रात्रभर राहून केलेली मजा म्हणजे खरे स्ट्रेस बस्टर असतात. थकवणाऱ्या परीक्षा, क्लास, अभ्यास, करिअरचं टेन्शन यातून रिलॅक्स होण्यासाठी ते खूप गरजेचं असतं आणि यात वेगवेगळ्या गोष्टी केल्या तर मजा आणखी वाढते. आम्ही ‘सॅण्टा’ची थीम ठेवली होती. सर्व जणी सॅण्टाची लाल-पांढरी टोपी घालून आल्या होत्या.’ गॉसिप गप्पा हा या पजामा पार्टीचा महत्त्वाचा भाग आहे. कॉमन मित्रमैत्रिणी, त्यांचे फर्स्ट क्रश, लव्ह रिलेशनशिप्स, फॅशन अशा किती तरी विषयांवर गप्पाष्टक रंगतं. आम्ही जे बाहेर करू शकत नाही ते घरी करतो आणि यात किती तरी पटीने जास्त आनंद मिळतो.. प्रांजली सांगते.
या ‘स्लीप ओव्हर्स’चा एक आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे ‘मिड नाईट फिस्ट’. रात्रभर मस्ती करायची असेल तर भूक लागणारच. मग यासाठी कधी वेफर्सची पॅकेट्स तयार असतात, तर कधी पॉपकॉर्न्‍सचे पुडे. रात्री ‘हॉरर मूव्ही’चा बेत असेल तर पॉपकॉर्न्‍स हवेच. त्या शिवाय रात्री उठून स्वयंपाकघरात खुडबुड करण्यातदेखील मजा आहे. मॅगी ही आवडती आणि सोपी डिश आहे. त्या शिवाय भुर्जी पाव, पास्ता, पिझ्झा आणि काही नाही तर उकडलेल्या अंडय़ाचे सॅण्डवीचेस असे किती तरी प्रकार ‘नाइट फिस्ट’चा भाग असतात. नंतर आईसक्रीम ठरलेलंच. याबद्दल कृती पंच सांगते, ‘आमच्या डान्स क्लासच्या मैत्रिणींसाठी सगळ्यात धमाल प्लॅन म्हणजे पजामा पार्टी. यामध्ये रात्री हॉरर मूव्ही बघताना पॉपकॉर्न, कुरकुरे खाण्यात खूप मजा येते. नाइट फिस्ट हवीच. मग त्यासाठी साधे वेफर्ससुद्धा चालतात. इंजिनीअरिंग करणारी जोईता चक्रवर्ती सांगते, ‘मैत्रिणीकडे पहाटे तीन वाजता मॅगी खाण्याचा अनुभव मी अजून विसरू शकत नाही.’ मित्रमैत्रिणींना जवळ आणणाऱ्या या रात्रीच्या गप्पा फार महत्त्वाच्या असतात.