हाय,
मी ३० वर्षांची प्रोफेशनल आहे. आय अ‍ॅम मॅरिड लेडी. एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते. माझं वजन ६२ किलो असून उंची ५.४ फूट आहे. माझा वर्ण गव्हाळ आहे. माझे दंड आणि मांडय़ा जाड आहेत. मला कुठल्या स्टाईलचे कपडे सूट होतील त्याबद्दल गाईड करा.    -तृप्ती
प्रिय तृप्ती,
तुझ्या वर्णनावरून तुझी शरीरयष्टी अगदी व्यवस्थित असल्याचं दिसतं. तू खूप बारीक नाहीस आणि लठ्ठदेखील नसावीस. हात, दंड आणि मांडय़ा इथून जाड असणं हा तुझा प्रॉब्लेम आहे. सर्वसाधारण भारतीय स्त्रियांचा अगदी हाच प्रॉब्लेम असतो. तू मल्टिनॅशनल कंपनीत काम करतेस. जनरली, अशा कंपन्यांमध्ये फॉर्मल ड्रेस कोड असतो. सोमवार ते गुरुवार फॉर्मल्समध्ये आणि शुक्रवारी कॅज्युअल्समध्ये यायला परवानगी असते. ऑफिसमध्ये कॅज्युअल ड्रेसिंग पॉलिसी असेल तरीही तुझ्याकडच्या क्लासी कपडय़ांमध्येच ऑफिसमध्ये जावं असं माझं मत आहे. खरं तर प्रत्येक ऑफिसमधलं वातावरण वेगवेगळं असतं. तुमच्याकडे वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या इतर स्त्रियांकडे बघून थोडा अंदाज घेऊ शकतेस. फायनान्स, लॉ किंवा टेक्निकल क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये थोडं जास्त फॉर्मल ड्रेसिंग अपेक्षित असतं; तर मीडिया, जाहिरात, फॅशन डिझाइनिंग सारख्या फिल्डमध्ये काम करणाऱ्या अधिक कॅज्युअल ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसतात. त्यामुळे तुझ्या ऑफिसच्या वातावरणाला साजेशी स्टाईल असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्याकडे प्रथम बघणाऱ्यांचं मत चांगलंच असलं पाहिजे आणि यामध्ये ड्रेसिंगचा भाग मोठा असतो. फर्स्ट इम्प्रेशन बराच काळ मनात राहतं.
आपल्याकडे स्त्रियांच्या फॉर्मल वेअरमध्ये भारतीय आणि वेस्टर्न दोन्हीचा समावेश होतो. कुर्ती आणि टय़ुनिक ट्रॅडिशनल चुणीदार किंवा जेगिंग्जवर घातली आणि वर लाईट सिंपल ज्वेलरीचा एखादा पीस असेल तरी ऑफिससाठी छान फॉर्मल वेअर होऊ शकतं. कॉटन आणि लिनन अशा फॉर्मल वेअरसाठी उत्तम कापड ठरतं. पण कुठल्याही कुर्त्यांवर डिझाइन्सचा अतिरेक नको. फॉर्मल वेअरमध्ये फ्रील, झालर, प्लीट्स अनावश्यक आहे. याउलट साधे पिन टक्स छान वाटतात.
जनरली फॉर्मल ड्रेसिंगमध्ये स्लीव्हलेस ड्रेस गृहीत धरत नाहीत. पण स्लाईट पफवाल्या मेगा स्लीव्हज वापरू शकता. तुझे दंड जाड असल्यानं ही स्टाईल सूट होईल. कोपरापर्यंत, थ्री-फोर्थ किंवा फूल स्लीव्हजचे ड्रेस वापरायला हरकत नाही. पण तुझ्या मते, दंड जाड असतील तर थ्री-फोर्थ लेंथच्या स्लीव्हज सगळ्यात चांगल्या. खोल गळ्याचे ड्रेस टाळायला हवेत. स्टँड कॉलर फॉर्मलसाठी चांगला पर्याय आहे. पण यामध्ये तू अधिक जाड दिसशील. बेसिक गोल गळा किंवा व्ही शेपचा गळा ठेवणं चांगलं. दुपट्टा किंवा स्टोल घेणार असशील तर व्यवस्थित घडी करून केवळ डाव्या खांद्यावर घेणं शोभेल. साधी पण क्लासी कॉटन साडी नेसण्याचा पर्याय आहे. बंद गळ्याचा ब्लाऊज किंवा स्टँड कॉलरदेखील ट्राय करू शकतेस. साडीमध्ये मांडय़ा जाड असण्याचा प्रॉब्लेम आपोआप झाकला जाईल. साडीवर एखादी चेन आणि टॉप्स इतपत ज्वेलरी आणि साधीशी हँडबॅग आणि सँडल्स असले की परफेक्ट फॉर्मल लूक झाला.
आता वेस्टर्न फॉर्मलबद्दल सांगते. शर्टची फॅशन फॉर्मल वेअरमध्ये सध्या फॉर्मात आहे. सॅटिन शर्ट, कॉटन शर्ट आणि त्याबरोबर जीन्स किंवा ट्राऊझर्स घातले की स्टायलिश फॉर्मल लूक येतो. सॅटिन आणि सिल्क ब्लाऊझ स्कर्टबरोबर चांगली दिसतात. फक्त प्लेन शर्टचीच फॅशन आहे असं नाही. व्ही नेक, बटनवाले, प्लेन किंवा प्लीटेड शर्टही वापरू शकतेस. स्कर्टमध्ये कंफर्टेबल असशील तर फॉर्मल स्कर्ट वापरायलाही हरकत नाही. स्कर्टची उंची मात्र गुडघ्याखाली किंवा पोटऱ्यांपर्यंत असावी. तू खूप बारीक नाहीस. त्यामुळे नॉर्मल वेस्टचा स्कर्ट वापर. हाय वेस्ट चांगला दिसतो आणि तू कम्फर्टेबल आहे असं वाटत असेल तर तोही वापर.
ट्राऊझर्स निवडताना मात्र थोडी काळजी घे. रेग्युलर वेस्टची टॅपरिंग पँट निवड. तुझे पाय आणि मांडय़ा जाड असल्यानं खालून घोळदार आणि वर घट्ट अशा पँट नकोत. पलाझो पँटचा अपवादवगळता अशा फ्लेअर्ड बॉटम्स टाळायला हव्यात. बॅगी स्टाईलच्या ट्राउझर्स मात्र अजिबात नको. त्यामध्ये कम्फर्टेबल वाटत असलं तरी गबाळं दिसतं. शर्ट, ट्राउझर्स आणि वर सॉफ्ट प्रिंटचा स्कार्फ तुझा लूक पूर्ण करेल.
रंगाच्या बाबतीत ऑफिससाठी पांढरा, काळा, ब्राऊन, ब्लू, आयव्हरी हे रंग जास्त चालतात. वेस्टर्न फॉर्मल्समध्ये रंगांचा वापर तसा मर्यादित असतो. पण इंडियन फॉर्मल्समध्ये मात्र रंग निवडायला भरपूर वाव आहे. तुझा वर्ण गव्हाळ असल्यानं बहुतेक सगळे रंग तुला सूट होतील. निळा, काळा, ग्रे, रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, ऑलिव्ह ग्रीन, इंग्लीश ग्रीन, लाईट यलो, लाईट ऑरेंज, पीच, रस्ट, रेड, क्रिमसन हे कुठलेही रंग वापरायला हरकत नाही.
ज्वेलरी आणि अ‍ॅक्सेसरीजचा विचार केला तर ऑफिसला जाताना सोन्याचे दागिने घालून जायची आवश्यकता नाही. फार जड नसलेली हलकी ज्वेलरी वापर. ९ ते ५ वागवता येईल आणि आवाजानं दुसऱ्यांचं लक्ष वेधलं जाणार नाही तरीही व्यक्तिमत्त्व उठून दिसेल अशी सिंपल पण क्लासी ज्वेलरी हवी. साध्या इअररिंग्ज आणि एखादी अंगठी एवढे दागिनेदेखील पुरेत. सिंपल पेडंट किंवा ब्रूचदेखील ऐट वाढवेल. मोती चालतील, पण साधेपणा हवा. ऑफिसची बॅग साधी हवी. कलरफूल, गॉडी नको. ट्रॅडिशनल लेदर बॅग्ज चांगल्या आणि क्लासी दिसतात. पम्प शूज आणि स्टिलेटोज घातले की लूक पूर्ण होईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एकूण लूक स्वच्छ आणि नीटनेटका असला पाहिजे. थोडासा मेक-अप चालेल पण कामाच्या ठिकाणी भडक मेक-अप असून उपयोग नाही. स्कीन फ्रेश दिसली पाहिजे आणि केस मागे सारलेले, बांधलेले असावेत. अंगाचा वास येणार नाही, मंद सुगंध येईल याचीही काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या फास्ट जमान्यात लेटेस्ट ट्रेंडबद्दल अपडेट ठेवले पाहिजेत आणि त्यानुसार लूकमध्ये बदल केले पाहिजेत.

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com