बऱ्याच दिवसांनी खाबू मोशाय ठरवून खाद्यसफारीला निघाला. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या पोटाच्या त्रासाचा विचार करून तळण वगैरे टाळण्याकडेच त्याचा कटाक्ष होता. अखेर खाबू मोशायची स्वारी माटुंगा परिसरात पोहोचली आणि तिथे सांबार, रस्सम्, दोसाएँ, इडल्ली आणि कडक कॉफी वगैरेच्या गंधाने खाबू मोशायची समाधी लागली. कोणताही विचार न करता खाबू मोशाय ‘अंबा भुवन’मध्ये प्रवेश करता झाला..

इतके दिवस तुमच्यासारख्या खवय्यांपासून लांब राहिल्याबद्दल खाबू मोशाय दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यात कसूर खाबू मोशायची नाही, तर त्याच्या बिघडलेल्या पोटाची आहे. गेले काही दिवस खाबू मोशाय चक्क पोट खराब असल्यामुळे आडवा होता. आता पोट खराब असण्याचा आणि खाबुगिरीचा परस्पर काहीच संबंध नाही, हे जाणत्या खवय्यांना सांगायलाच नको! कदाचित अनेक दिवस खाबू मोशायने घरच्या अन्नाशिवाय कशालाच तोंड लावलं नाही, म्हणूनही त्याचं पोट खराब झालं असावं, असंही एक मत व्यक्त होत आहे. तर ते असो! मुद्दा हा की, खाबू मोशायच्या बिघडलेल्या पोटाचा आणि खाबुगिरीचा काहीएक संबंध नाही. खराब पोटाचा संबंध खाण्याशी नसून पिण्याशी, आणि तेदेखील पाणी पिण्याशी आहे. पण खूप दिवस ‘उपासा’त काढल्यानंतर अखेर खाबू मोशायला राहावलं नाही आणि त्यातल्या त्यात सात्त्विक म्हणून खाबू मोशायने साउथ इंडियन (मुंबईत उच्चारी सौधेंडियन) पदार्थावर भूक भागवायची ठरवली. त्यासाठी मग माटुंगा गाठण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुंबईत नव्याने आलेल्यांना एक गोष्ट सांगणं क्रमप्राप्त आहे. मुंबईची खाद्यसंस्कृती ही मुंबईच्या भौगोलिक रचनेइतकीच विविधतेने नटली आहे. या मायानगरीत कुठं काय मिळेल, हे समजण्यासाठी तळहातावरच्या रेषांइतकी मुंबईची माहिती व्हावी लागेल. पण फिकर नॉट, कारण खाबू मोशाय इज देअर! तर मुंबईत तुम्हाला उत्तम सौधेंडियन फूड खायचं असेल, तर माटुंगा-चेंबूर आणि काही प्रमाणात घाटकोपर या तीन उपनगरांशिवाय पर्याय नाही. त्यात माटुंगा हे तर अशा पदार्थाचं मोहोळच आहे. तर खाबू मोशाय माटुंग्याला पोहोचला. माटुंग्यातही अनेक सौधेंडियन हॉटेलं असल्याने त्यातही विशेष आवड असणं महत्त्वाचं आहे. खाबू मोशाय इतर हॉटेलांची माहिती तुम्हाला यथावकाश देईलच, पण आजचा आपला विषय आहे अंबा भुवन हे अत्यंत जुनं, तरीही अनोखं असं कॉफी हाऊस!
किंग्ज सर्कल किंवा सध्याच्या परिभाषेत महेश्वरी उद्यानावरून माटुंगा स्टेशनला येण्यासाठी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून उजवीकडे वळलात की, लगेचच उजव्या फुटपाथला अंबा भुवन उभं आहे. हे कॉफी हाऊस १९३५ सालापासून इथं आपला दरबार ठोकून आहे. उडुपीच्या रामचंद्र राव यांनी हे कॉफी हाऊस सुरू केलं. त्यामुळे इथं मिळणारे पदार्थ हे कोस्टल कर्नाटक भागातील पदार्थाशी साधम्र्य राखून आहेत. या कॉफी हाऊसमध्ये शिरल्या शिरल्या मन प्रसन्न होतं. पॉलीश केलेली चकचकीत टेबलं, स्वच्छ लुंगी नेसलेले अण्णा आणि ‘मेण्टेन सायलेन्स’ अशी पाटी. खाबू मोशायची तबियत खूश होऊन गेली.
खाबू मोशायच्या आयुष्यातली काही र्वष याच भागात गेली असल्याने सौधेंडियन पेशल काय मागवायचं, हा प्रश्न त्याला सतावला नाही. त्याने थेट नीर डोसा आणि मुलगापुडी चटणी, अशी ऑर्डर दिली. तांदळाच्या पिठाची गरमागरम फेणी खाणाऱ्यांना आणि ती खायला आवडणाऱ्यांना नीर डोसा हा पदार्थ नक्कीच आवडेल. पापुद्रय़ासारखा हा डोसा उत्तम लागतो. आणि त्याच्यासह मुलगापुडी ही खास दाक्षिणात्यांची स्पेशालिटी असलेली चटणी छान रंग जमवते. माटुंग्याच्या सगळ्या हॉटेलांमध्ये म्हैसूर मसाला डोसा खूप चांगला मिळतो. त्यामुळे मग म्हैसूर मसाला डोसाही मागवणं आलं. डोशाला आतून खास दाक्षिणात्य तोंडावळा असलेली चटणी लावतात आणि त्यात टिपिकल डोशाची भाजी भरून देतात.
या कॉफी हाऊसमध्ये जाऊन हमखास खाण्यासारखा पदार्थ म्हणजे पोंगल आणि बिशाबेल्ली भात! बिशाबेल्ली भात हे एक वेगळंच रसायन आहे. प्रथमदर्शनी घट्ट सांबार आणि भात यांचं मिश्रण असल्यासारखा वाटणारा हा पदार्थ जिभेवर ठेवल्यानंतर एक वेगळीच तृप्ती लाभते. पोंगल हा पदार्थ आपल्याकडे बनणाऱ्या मुगाच्या खिचडीसारखाच.. पण गोडंवरण भाताच्या रंगाचा! चवीला खूपच सात्त्विक आणि तरीही अद्भुत. विशेष म्हणजे हे दोन्ही पदार्थ ३०-३५ रुपयांच्या आतबाहेरचे! हे दोन्ही खाल्ल्यावर खाबू मोशाय अगदी तृप्त झाला. तरीही या सर्वावर अंबा भुवनची कॉफी हा स्वर्गीय अनुभव आहेच. इकडे कॉफी २२ रुपयांना मिळते. पण त्या कॉफीची चव अप्रतिम या कॅटॅगरीत आहे. या कॉफी हाऊसमधून बाहेर पडणाऱ्या खवय्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. खाबू मोशायच्या चेहऱ्यावर होतं, तस्संच!

कसे  जाल?

गाडीने येणार असाल, तर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दादरच्या दिशेने जाताना किंग्ज सर्कलखालून माटुंगा स्टेशनकडे जाणारं उजवं वळण घ्या. या रस्त्यावर लगेचच उजव्या फुटपाथवर अंबा भुवन दिसतं. दादरहून येणार असाल, तर याच सर्कलवरून डावीकडे माटुंगा स्टेशनला जाण्यासाठी वळायला लागेल. ट्रेनने येणार असाल, तर माटुंगा स्टेशनला (मध्य रेल्वे) उतरून कल्याणच्या दिशेच्या ब्रिजवरून खाली या. या ब्रिजवरून बाहेर आल्यावर कोणालाही किंग्ज सर्कल विचारा. तुमच्या नाकासमोर सरळ जाणारा रस्ता त्याच फुटपाथवरून पकडा आणि चालत राहा. उजवीकडे एक दाक्षिणात्य मंदिर लागेल. त्या मंदिराच्या पुढेच अंबा भुवन आहे.