परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. हे कसं साधायचं  या गोष्टींमधून हेच थोडं समजून घेऊ या.

अर्णवच्या घरातले तमाम मेंबर्स जीव मुठीत धरून बसले होते. कारण आज ‘तो’ दिवस होता. सबमिशनच्या आधीचा दिवस त्याचा थयथयाट चालू होता. कॉलेज, प्रोफेसर्स, आई-बाबा, बहीण, तिच्या मैत्रिणी, पोळ्या करणाऱ्या मावशी.. कुणीही सुटलं नाही त्याच्या हल्ल्यातून. ‘माझी फाइल कुणी हलवली इथून? मला पंचिंग मशीन हवंय. गप्प बसा सगळे, किती जोरात बडबड करताय आणि रुही, तो टीव्ही बंद कर आधी. उगीच मैत्रिणींना गोळा करून जोरात टीव्ही लावून बसते. मी आत्ता नाही जेवणार, मला वेळ नाहीये. हे कॉलेज आहे की जोक? अशा कशा असाईनमेंट्स देतात?’ आपल्याबरोबर इतरांनाही तो नाचवत होता.  बऱ्याच उशिरापर्यंत जागून एकदाची असाईनमेंट पुरी केली त्यानं.

दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर मात्र स्वारी मजेत शिट्टी वाजवत होती. अरे, लास्ट मिनिट किंग आहे मी. लोक उगीच आधीपासून मर मर मरतात. मी बघा, एका दिवसात काम फत्ते. बाय द वे, मी फार दमलोय, काल केवढे कष्ट केलेयत. मला झोपू दे आता, त्रास देऊ नका. हे आणि वर.  ही काही पहिली वेळ नव्हती. दरवेळी अर्णव असाच वेळकाढूपणा करायचा.  आधी निवांत आणि ऐनवेळी धावपळ. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, त्यांचा जीव टांगणीला लागतो याच्याशी त्याला काही देणं-घेणं नव्हतं.

आपण सगळेच कधी ना कधी असे वागतो. आज करू, उद्या करू करत चालढकल करत राहतो. काही वेळा जेन्युईन कारण असतं, पण बहुतेकदा असतं नुसतंच निमित्त.  कारणं तयार असतात आपल्या जवळ.  काय होतं नक्की? भीती वाटते? की परफेक्ट व्हावं असा ध्यास असतो? काम चुकण्याची काळजी? लोक काय म्हणतील याची चिंता? आळशीपणा? की काहीच कारण नसतं?

अल्बर्ट एलिस नावाचे एक थोर सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी यावर व्यक्त केलेली मतं ऐकण्यासारखी आहेत. ते म्हणतात की आपल्या डोक्यात सतत, आपल्या नकळत विचारांची रनिंग कॉमेंटरी चालू असते. ही कॉमेंटरी ठरवते आपण काय अ‍ॅक्शन करणार ते. म्हणजे बघा हं, अर्णव काय काय विचार करत असेल असाईनमेंटविषयी? हे एक अत्यंत बोअर, निरुपयोगी काम आहे. ते करताना खूप वेळ जाणार आहे. त्यातून आपल्याला बिलकूल मजा येणार नाहीये. आणि खरं तर ती नक्की किती मोठी असाईनमेंट आहे हे मी अजून पाहिलेलं नाहीये, त्यात काय लिहायचंय हेही मला माहिती नाही. मला ती सुरू करायलाच नको वाटतंय. शिवाय माझं काही चुकलं तर? म्हणजे अर्णवनं या कामाला इतकं नकोसं म्हणून क्लासिफाय केलंय की त्याला तिकडे बघण्याचीही इच्छा नाही. ते न केल्यामुळे तात्पुरतं त्याला बरं वाटतं, पण मागे कुठेतरी रुखरुख वाटत असते. ती टोचणी त्याला काहीच एन्जॉय करू देत नाही. पण त्यानं स्वत:ला कसंबसं कन्व्हिन्स केलंय की शेवटच्या क्षणी केलं तरच त्याचं काम होतं.

अर्णवला कुणी हटकलं की त्याचं आग्र्युमेंट असतं, होतंय ना काम? मग ते कसं केलं हे कशाला बघायचं? करू दे की ज्याला हवं तसं. काम झाल्याशी मतलब. पण संशोधकांच्या मते ही वरवर किरकोळ वाटणारी बाब धोकादायक आहे. एस्पेशली तरुण वयात. कारण त्यामुळे सवय लागते ताणाची. स्ट्रेस असल्याशिवाय काही काम होतच नाही. एखाद्या अट्टल दारुडय़ासारखी परिस्थिती होते. चटक लागते शेवटच्या क्षणी काम करण्याची. अशी नकोशी, त्रासदायक गोष्ट टाळली की त्यामुळे तात्पुरता थोडाफार रिलीफ मिळतो. तो हवाहवासा वाटतो म्हणून आणखी टाळाटाळ केली जाते. कामाचा भार वाढत जातो. त्या ताणाचाही ताण यायला लागतो. चालढकल-ताण-काम न होणे-अधिक ताण-बर्नआऊट असं हे दुष्टचक/ चालू राहातं. शिवाय त्यामुळे बाकीच्यांना ताप होतो तो वेगळाच. हे लोक मदत मागतात, चिडचिड करतात, आधीचे प्लॅन्स कॅन्सल करतात. म्हणजे स्मोकिंगच्या धुराचा जसा स्मोकरपेक्षा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो तसा यांचा त्रास इतरांना सहन करावा लागतो.

अनेक थोर व्यक्तींनाही हा प्रश्न भेडसावतो.  त्यांनी त्यासाठी त्यांचे स्वत:चे काही मार्ग काढलेत. समोरचं काम हे डोंगराएवढं भलं मोठं वाटत असेल तर ते अवाक्यात येईल एवढय़ा छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांत विभागायचं, कामांची प्रायॉरिटीप्रमाणे लिस्ट करायची, टाइमटेबल बनवायचं, आपण ताजंतवानं असताना अवघड कामं संपवायची, नक्की काय अडथळा वाटतोय याचा माग काढायचा अशा अनेक ट्रिक्स वापरतात ते. मगाशी आपण ज्यांच्याविषयी बोललो त्या अल्बर्ट एलिसनी ‘द फाइव्ह मिनिट प्लॅन’ नावाचं टेक्निक वापरलं. जे काम मी टाळतोय ते आत्ता लगेच, फक्त पाच मिनिटांसाठी चालू करायचं.  पुढे चालू ठेवायचं की नाही ते बघू नंतर. कारण कुठलंही काम न होण्यामागे सुरुवातीलाच गाडं अडतं हे एक महत्त्वाचं कारण असतं. शिवाय त्यांनी हे मान्यच केलं मुळी की अभ्यास, असाईनमेंट्स हे एक नकोसं कंटाळवाणं काम आहे. पण नावडतं काम करायचं नाही असा काही नियम नाही, नाही का?  मग, करायचं ते नकोसं वाटणारं काम सुरू? फक्त पाच मिनिटांसाठी?

 डॉ. वैशाली देशमुख

viva@expressindia.com